आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकारात तातडीने करण्यात येणारी प्रायमरी अँजिओप्लास्टी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तातडीने अँजिओप्लास्टी केल्यास आयुष्य वाढते :
जितक्या लवकर हृदयविकारात बंद असलेली रक्तवाहिनी अँजिओप्लास्टी करून उघडता येईल तितके ते रुग्णासाठी चांगले असते. त्यात प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो. कारण जितक्या लवकर रक्तवाहिनी उघडली तितक्या लवकर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे हृदयाचे स्नायू पूर्ववत काम करू लागतात आणि पर्यायाने हृदयाची कार्यक्षमता (पंपिंग) चांगली राहते. त्यामुळे दीर्घकाळाचा विचार केल्यास आयुष्याची लांबी चांगली राहते.

हृदयविकार कसा होतो :
हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी, कॅल्शियम ई घटकांमुळे गाठी होतात व या गाठी रक्तपुरवठ्याला अडथळा पोहोचवतात. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा व ऑक्सिजन कमी पडून रुग्णाला छातीत वेदना होणे, दरदरून घाम फुटणे, दम लागणे इ. प्रकारचा त्रास होतो. या अडथळ्यांना जेवढ्या लवकर दूर करू तेवढे कमी स्नायू या काळात निकामी होतात.

रक्तवाहिनी उघडण्याचे मार्ग कोणते :
ढोबळमानाने तीन मार्ग असतात. 1. सर्वसाधारणपणे भारतात बहुतांश वेळेस वापरण्यात येणारा मार्ग म्हणजे thrombolysis अर्थात हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताच्या गाठी विरघळण्याचे दिलेले इंजेक्शन्स. आपल्याकडे पाश्चात्त्य विकसित राष्ट्रांप्रमाणे दर मोठ्या गावांना अँजिओप्लास्टीचे केंद्र व 24 बाय 7 कार्यरत असणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नसल्यामुळे हे इंजेक्शन देऊन रक्ताच्या गाठी विरघळण्याचे प्रयत्न केले जातात. साधारणपणे साठ ते सत्तर टक्के हे प्रयत्न अंशत: व कधी कधी पूर्णत: यशस्वी होतात. त्यामुळे रुग्णाच्या लक्षणांमध्ये बराच दिलासा मिळतो. पण बहुतांश बराचसा अडथळा हृदयात शिल्लक राहतो व त्याला हृदयविकारातून तात्पुरता बरा झाल्यानंतर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीची पुन्हा आवश्यकता भासते.


2.दुसरा मार्ग, जो ख-या अर्थाने सर्वोत्कृष्ट, पण आपल्या देशात कमी अवलंबला जाणारा म्हणजे अँजिओप्लास्टी व स्टेंटच्या साहाय्याने तातडीने हा अडथळा दूर करणे. याला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतात. पाश्चात्त्य देशांत आजकाल जवळजवळ सर्वच रुग्णांना हृदयविकार झाल्यावर हवाई व रस्त्याच्या माध्यमातून ताबडतोब अँजिओप्लास्टी केंद्रावर पोहोचवले जाते व काही मिनिटांमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी केली जाते. भारतात या प्रकाराबाबत कमी जागरूकता आढळते.

3.तिसरा मार्ग म्हणजे बायपास ऑ परेशन. पण हे चालू हृदयविकारामध्ये करणे खूपच धोकादायक सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याचा वापर फारसा कुठे होत नाही.

प्रायमरी अँजिओप्लास्टी केव्हा व कशी :
हृदयविकार झाल्याबरोबर तातडीने अँजिओप्लास्टी केंद्राशी संपर्क साधून पुढील 90 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पार पाडणे गरजेचे असते. त्यामुळे ती टीम उपलब्ध असण्याची खात्री करणे गरजेचे आहे. अँजिओप्लास्टीच्या आधी क्लोपीडोग्रेल व इतर काही गोळ्या देऊन रुग्णाला अतीव दक्षता कक्षातून तातडीने कॅथलॅबमध्ये हलवण्यात येते. आधी अँजिओग्राफी करून त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये कशा प्रकारचे व किती अडथळे आहेत हे तपासले जाते. वरील रुग्ण हा प्रायमरी अँजिओप्लास्टीसाठी योग्य आहे हे ठरवल्यानंतर त्याच्या रक्तवाहिनीत 0.014 इंच व्यासाची एक सूक्ष्म तार अढथळ्याच्या मधून रक्तवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत टाकली जाते. त्यावर 2 किंवा 2.5 मि.मी. व्यासाचा फुगा सरकवून तो फुगा फुगवला जातो. त्यामुळे हा अडथळा काही प्रमाणात कमी होतो. यावर स्टेंट हा स्प्रिंगसारखा एका धातूने बनवलेला पदार्थ फुगवला जातो. त्यामुळे तो अडथळा पूर्ण बरा होतो व रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा पूर्ववत होतो. यामुळे स्नायू पुन्हा कार्य करायला लागतात. ब-याचदा या प्रकारात रक्ताच्या गाठी शोषणाचे कॅथेटर वापरावे लागते व हॅपेरीन किंवा जी. पी. ब्लॉकर्स नावाची औषधीही त्या वेळेस द्यावी लागतात. नेहमीच्या अँजिओप्लास्टीपेक्षाही कमीत कमी वेळेत संपवण्याचे आव्हान हृदयविकारतज्ज्ञाला पेलावे लागते.

प्रायमरी अँजिओप्लास्टीचे फायदे :
1. हृदयविकारात रक्तवाहिनीतील अडथळा हा पूर्णपणे नष्ट केला जातो. त्यामुळे स्नायूंना रक्तपुरवठा सुरळीत होऊन स्नायू निकामी होत नाही. पर्यायाने रुग्णाच्या हृदयाची कार्यक्षमता बिघडत नाही. हृदयविकार होऊनही लवकर रक्तवाहिनी उघडल्यामुळे आयुष्याच्या लांबीवर त्यामुळे परिणाम होत नाहीत.

2. रक्ताच्या गाठी विरघळण्याच्या इंजेक्शनचा परिणाम केवळ 60 ते 70 टक्के रुग्णामध्येच होतो. उरलेल्या रुग्णांना ब-या चदा आयुष्य गमवावे लागतात. पर्यायाने नंतर त्यांची अँजिओप्लास्टी होऊनही आयुष्याची बरीच लांबी त्यांना गमवावी लागते. कारण तोपर्यंत हृदयाच्या स्नायूंना खूप इजा झालेली असते. ज्या 60 ते 70 टक्के रुग्णांमध्ये हे इंजेक्शन काम करते त्यातही अडथळा पूर्ण निघून पुढे अँजिओप्लास्टी न लागणयाची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे आधीच अँजिओप्लास्टी केलेली काय वाईट.

3. रक्ताच्या गाठी विरघळणारे इंजेक्शन काही वेळेस शरीरात गंभीर प्रमाणात रक्तस्राव करतात, जे क्वचितप्रसंगी जीवघेणे ठरू शकते. ती भीती प्रायमरी अँजिओप्लास्टीमध्ये जवळजवळ नसते.

4. ब-याचदा काही कारणांनीही रक्ताच्या गाठी विरघळणारी इंजेक्शन्स देता येत नाहीत. अशा वेळेस तर प्रायमरी अँजिओप्लास्टी हाच पर्याय असतो.
5. रक्ताच्या गाठी विरघळवणा-या इंजेक्शननंतर सुरुवातीला सुरू झालेला रक्तपुरवठा पुन्हा एकदा गाठी बनून बंद पडू शकतो. त्यामुळे रुग्णाला पुन्हा एकदा हृदयविकार होऊ शकतो.अँजिओप्लास्टीनंतर असे होण्याची शक्यता फारच कमी असते.
6. रक्ताच्या गाठी विरघळणा-या इंजेक्शनचा फायदा अंशत: 60 टक्के रुग्णांना होतो. प्रायमरी अँजिओप्लास्टीमध्ये पूर्णत: 95 टक्के रुग्ण बरे होतात.
7. प्रायमरी अँजिओप्लास्टीनंतर काही मिनिटांपूर्वी जीवनमरणाशी झुंजणारा रुग्ण हा तोच आहे हे ओळखणेही कठीण जाते. तो आता अतीव दक्षता कक्षामध्ये का आहे, असे काही वेळाने वाटायला लागते.

प्रायमरी अँजिओप्लास्टीसाठी आवश्यकता हवी पुढील बाबींची :
1. निष्णात हृदयविकारतज्ज्ञ व टीमची 24 बाय 7 उपलब्धता. 2. बायपास सर्जरीचे बॅकअप. 3. रुग्णांच्या लक्षणांपासून पुढील 90 मिनिटांमध्ये अँजिओप्लास्टी करण्याची टीमची तयारी. 4. हृदयविकारतज्ज्ञ व त्याची टीम तेथे पूर्णवेळ कार्यरत असणे हे रुग्णांसाठी गरजेचे. त्यामुळे रुग्णाला वेळेत अँजिओप्लास्टी होऊन पुढील उपचारप्रणाली ही सुरळीत होते. प्रायमरी अ‍ॅँजिओप्लास्टीसाठी साधारणपणे 1 ते 1.5 लाख खर्च येतो. परदेशात आज प्रत्येक हृदयविकाराच्या रुग्णाला तातडीने अँजिओप्लास्टी केंद्रावर पाठवून त्याची प्रायमरी अँजिओप्लास्टी केली जाते. आपल्याकडेही ही उपाययोजना हळूहळू नियमित वापरली जाऊ लागली आहे. हृदयविकार रुग्णाची रक्तवाहिनी तातडीने उघडून त्याच्या स्नायूंना मोकळा प्राणवायू देणे ही प्रत्येक डॉक्टराची नैतिक जबाबदारी आहे.

(लेखक एका मोठ्या रुग्णालयात हृदयरोग विभागप्रमुख असून त्यांनी स्वत: भारतात पहिला बायोअ‍ॅब्सॉर्वेबल स्टेंट हृदयविकाराच्या रुग्णात 100 टक्के ब्लॉक असलेल्या रक्तवाहिनीत टाकला आहे.)

drvilas2007@rediffmail.com