आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषाकौशल्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत आर्थिक प्रगतीमुळे देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेक तरुण मुले-मुली रोजगारांच्या शोधात स्थलांतर करत आहेत, तर चांगली संधी मिळाल्यास ते परदेशातही जाण्याचा मार्ग निवडतात. भाषा हे संपर्काचे माध्यम आहे. परराज्यांत किंवा परदेशात भाषा ही संपर्कासाठी महत्त्वाची ठरते. स्थानिक भाषा कळणे किंवा ती बोलता येणे हे खरे कौशल्य असते. ‘नवी भाषा आली की नवी संस्कृती कळते’ असं म्हणतात. नवी भाषा शिकणे हे करिअर होऊ शकते. भाषेचे उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना भाषा शिक्षक, प्राध्यापक, अनुवादक तसेच दुभाषी (इन्टरप्रीटर) म्हणून संधी मिळू शकते. आजच्या काळात कॉर्पोरेट कंपन्या स्थानिक भाषेतून संभाषण करणार्‍यांवर भर देतात. ग्राहकाशी त्याच्या भाषेतून संवाद साधल्यास ग्राहक हा मनमोकळेपणाने बोलतो व व्यापारामध्येही वृद्धी होते.

या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन तरुणांनी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतीय भाषांचे (द्राविडी सोडून) मूळ संस्कृत भाषेत आहे. देवनागरीचे ज्ञान असलेल्यांना इतर भारतीय भाषा शिकणे फारसे कठीण वाटणार नाही. कोणतीही भारतीय भाषा शिकण्याकरिता विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक अभ्यासक्रम आहेत. अनेक राज्ये त्यांच्या स्थानिक भाषेचा प्रचार व्हावा या उद्देशाने अल्प फी असलेले किंवा नि:शुल्क अभ्यासक्रम चालवत असतात. त्याचप्रमाणे अनेक विद्यापीठांमधून भारतीय भाषांचे सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि ज्यांना सखोल अभ्यास करायची इच्छा असेल त्यांच्याकरिता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतले जातात.

एखादी भारतीय भाषा शिकायची असेल तर 30 दिवसांत भाषा शिकवणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, अशी पुस्तके घेताना त्याच्या योग्यतेची पडताळणी करणे गरजेचे आहे. इंटरनेटच्या युगात विविध भाषा शिकण्याकरिता अनेक संकेतस्थळे आहेत. या संकेतस्थळांवर अनेकदा मुळाक्षरांचे तसेच शब्दांचे योग्य उच्चारही दिले जातात, त्यामुळे भाषा शिकणे सोपे झाले आहे. आपल्या वेळेनुसार आपण भाषा शिकू शकतो. ज्यांना भाषेचा आनंद लुटण्याकरिता भाषा शिकायची आहे आणि प्रमाणपत्राची गरज भासत नाही अशा भाषाप्रेमींसाठी संकेतस्थळांवरून शिकणे सोयीचे ठरते. काही संस्था भाषेचे ऑनलाइन कोर्स चालवतात, ज्यांत ऑनलाइन परीक्षाही घेतली जाते आणि उमेदवारांना प्रमाणपत्रही दिले जाते.

भारत सरकारच्या नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू या संस्थेद्वारे अत्यल्प शुल्क घेऊन उर्दूचे शिक्षण दिले जाते आणि कोर्स पूर्ण करणार्‍यांना प्रमाणपत्रही दिले जाते. विविध भाषातून हिंदी शिकण्याकरिता केंद्र सरकारच्या सीडॉक (सेटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कंप्युटिंग) या संस्थेने लीला म्हणजेच लर्न इंडियन लँग्वेजिस थ्रू आर्टिफिशल इन्टेलिजन्स या शैक्षणिक उपक्रमाची निर्मिती केली आहे. याद्वारे भारतातील अनेक भाषांमधून हिंदी शिकणे सोपे झाले आहे.

जागतिकीकरणाच्या या युगात विदेशी भाषांचे ज्ञान असणे फायदेशीर ठरते. 70-80 च्या दशकांपर्यंत जपानी भाषा शिकण्याकडे लोकांचा कल होता, पण सध्या फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्याकडे कल आहे. दहावीचे विद्यार्थी अनेकदा चांगले गुण मिळावे म्हणून फ्रेंच विषय घेतात. स्पॅनिश भाषाही लोकप्रिय होत आहे. स्पॅनिश भाषा अमेरिकेत जाणारे अनेक विद्यार्थी शिकत आहेत. युरोप आणि लॅटिन अमेरिकेत स्पॅनिश तसेच पोर्तुगीज भाषा बोलली जाते. भारतात असलेल्या अनेक देशांच्या वकिलातींतून त्या-त्या देशांची भाषा शिकवली जाते. इंग्रजी भाषा शिकण्याचेही अनेक अभ्यासक्रम विविध विद्यापीठात शिकवले जातात.

इंग्रजी ही ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने ती शिकणे व महत्त्वाचे आहे. चीन हा देश सध्या आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असून मंदारिन भाषा शिकणे सोयीचे ठरेल. भाषेचे भय असलेल्यांनी आचार्य विनोबा भावे आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. विनोबा भावे यांना चिनी भाषेसहित 14 भाषा येत होत्या, तर राव यांना 17 भाषा येत होत्या. यामध्ये फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिशचा समावेश आहे. अनेक भाषा येणे हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहे.