आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Dnyandev Chopade\'s Artical On Mportant Of DNA

‘डीएनए’ची महती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुणसूत्रांवरील जीवनाची भाषा डीऑक्सिरायबोनुक्लिइक अ‍ॅसिड (डीएनए) या जैवरासायनिक द्रव्यांनी लिहिली आहे हे क्रीक आणि वॉटसन यांच्या संशोधनानंतर लक्षात आल्यानंतर 20 वर्षांपूर्वी आपण फक्त गुणसूत्रांच्या तपासण्या काही विशिष्ट आजारांसाठी करून निदान करीत होतो. गुणसूत्रांचे हे दोष काही जन्मजात आजारांसाठी कारणीभूत आहेत हे आपल्याला तेव्हाच समजू लागले. गेल्या दोन दशकांमध्ये मात्र जनुकीय शास्त्रात प्रचंड प्रमाणात संशोधन होऊन आपल्या जीवनातील जनुकीय शास्त्राचे महत्त्व लक्षात आले. दहा वर्षांपूर्वी मानवी जीवनासाठी निसर्गाने वापरलेली जनुकीय भाषा, संपूर्ण जनुकीय आराखडा पूर्णपणे लक्षात आला आणि एकेक करून अनेक आजारांसाठी कारणीभूत असलेल्या दोषी जनुकांचा शोध लागत गेला. आजमितीला वैद्यकीय साहित्यानुसार तब्बल 11 हजार जनुकीय आजारांची आपल्याकडे नोंद आहे आणि 30 हजार जनुकांद्वारे आपले शरीर नियंत्रित केले जाते. अर्थात हे सगळेच विकार घातक नसतात, पण काही मात्र जीवनाशी सुसंगत नसतात व अत्यंत घातक असतात. अज्ञानामुळे अशा विकारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विशेषत: महिलावर्गाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पूर्ण कुटुंबाला या घातक जनुकीय आजारांची झळ पोहोचते. अशाच माझ्याकडे आलेल्या काही केसेसची उदाहरणे बघितल्यास याचे गांभीर्य पटू शकते.


एका शेतकरी कुटुंबातील एक जोडपे आनुवंशिक सल्ल्यासाठी माझ्याकडे आले होते. लग्न होऊन 13 वर्षे झाली होती, पण मूल होत नव्हते. महिलेस तब्बल 11 वेळा गर्भधारणा झाली होती आणि प्रत्येक वेळी गर्भपात झाला होता. गर्भपात होऊ नयेत म्हणून नांदेड, हैदराबाद, औरंगाबाद आणि मुंबईमधील ब-याच डॉक्टर्सकडून त्यांनी औषधोपचार केले होते. नियमित तपासण्या केल्या गेल्या होत्या, त्यात कुठलाही दोष आढळला नव्हता. मात्र, गुणसूत्रांची तपासणी करण्यात आली नव्हती. ती केल्यानंतर लक्षात आले की त्यांच्या गुणसूत्रांची रचना संतुलित, पण विचित्र पद्धतीची झाली आहे. ज्यामुळे 23 जोड्यांऐवजी 22 क्रमांकाच्या जोडीची दोन गुणसूत्रे एकमेकांना चिकटली आहेत हे लक्षात आले, ज्यामुळे त्या महिलेस स्वत:चे मूल कधीच होऊ शकणार नव्हते. ही तपासणी वेळीच केली असती तर? वेगवेगळे डॉक्टर्स, देवस्थाने, बाबा, अंगारे, धुपारे सगळे केल्यानंतर सगळा पैसा संपुष्टात आल्यानंतर त्यांना माझ्यासारख्या जनुकीयशास्त्रात तज्ज्ञ असलेल्याकडे यावेसे वाटले! मी हतबल होतो, काहीच करू शकत नव्हतो. सुविधा उपलब्ध असूनही ती सुविधा कुणासाठी, केव्हा व कशा वापरायची याची जाण वैद्यकीय सेवा पुरवणा-या डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही असमर्थ ठरलो, याचं त्या वेळी मला वैषम्य वाटलं.


थॅलसेमिया हा भारतात सामान्यपणे आढळणारा जनुकीय आजार आहे. ज्या कुटुंबात थॅलसेमिया होण्याचा धोका आहे त्यांच्यामध्ये महिलेच्या गर्भधारणेदरम्यान आजाराचे निश्चित निदान करून आजार असलेले बाळ जन्माला येऊ नये यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो. असेच बाळाला थॅलसेमिया आजार होण्याचा धोका असलेले, लग्नाला वीस वर्षे उलटून गेलेले एक जोडपे माझ्याकडे आनुवंशिक समुपदेशनासाठी पाठवण्यात आले होते. या जोडप्याचे नात्यातील लग्न होते. स्त्रीचे वय 37, तर पुरुषाचे 44 होते. माझ्याकडे आले तेव्हा स्त्री गर्भवती होती. मी कुटुंबाची माहिती घेतली तेव्हा लक्षात आले की स्त्रीची आठवी गर्भधारणा होती. यापूर्वी 7 अपत्ये जन्माला येऊन त्यांचा 2-3 वर्षांच्या दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचे निश्चित निदान मात्र केले नव्हते. सातव्या बाळाची मात्र थॅलसेमियासाठी साधी रक्ततपासणी केली होती व त्यास आजार आहे हे लक्षात आले होते. मात्र, मृत्यूपूर्वी ते निदान होणे आवश्यक होते. आठव्या वेळेस या जोडप्यास जाग आली. तपासणी केल्यानंतर येणारे अपत्य सामान्य असल्याचे लक्षात आले व त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हीच जाणीव त्यांना पहिल्या वा दुस-याच गर्भधारणेवेळेस झाली असती तर...


अशी किती तरी उदाहरणे देता येतील. जनुकीय चाचण्यांच्या आवश्यकतेचे महत्त्व न समजल्यामुळे वा ठाऊकच नसल्यामुळे एका अर्थाने कुटुंबाला जन्माला घालण्यापासून त्यास सांभाळणा-या महिलेला व पर्यायाने तिच्या संपूर्ण कुटुंबाला निरोगी आयुष्याला मुकावे लागते. यासाठी याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. डाउन्स सिंड्रोमसारखे अनेक गंभीर विकार केवळ अज्ञानामुळे आपल्या देशात बळावत आहेत. या सगळ्याचा त्रास अशी अपत्ये जन्माला घालणा-या स्त्रीला सर्वाधिक सहन करावा लागतो.


गर्भपात, बालमृत्यू या सगळ्याचा धक्का स्त्रीला सहन करावा लागतो. मात्र, वेळीच जनुकीय शास्त्रावर आधारित तपासण्या केल्यास मानसिक त्रास, पैशाचा अपव्यय, धोके टाळता येतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
नजीकच्या भविष्याचा अंदाज लावता असे लक्षात येते की कर्करोग, अल्झायमर्स, हंटिंग्टन, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार होण्याची शक्यता वर्तवून आवश्यक ते प्रतिबंधक उपचार अमलात आणणे, एखाद्या आजाराचे अचूक निदान करणे, जनुकीय उपचार करणे हे जनुकीय शास्त्राचे भविष्यातील उपयोग आहेत. प्रत्येकाजवळ आपले जनुकीय आराखडा असलेले जैविक ओळखपत्र असेल ज्यानुसार आपली कार्यक्षमता ठरवली जाईल. एखाद्या व्यक्तीला राजकारणात पाठवायचे की कलाक्षेत्रात हेदेखील त्यानुसार ठरवता येईल. अगदी कोण खोटारडे आहे, लबाड आहे हेही या आराखड्याच्या आधारे सांगता येईल, ही जनुकीय शास्त्राची भविष्यातील फार मोठी देणगी असणार आहे.


(लेखक नाशिकच्या जेनेटिक्स अँड हेल्थ रिसर्च सेंटरचे संचालक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी drchopde@hotmail.com
आहे.)