आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यनमस्काराचे महत्त्व व नियम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. हिवाळ्याच्या दिवसात व्यायामास फारच महत्त्व असते. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक भाग आहे. मात्र सूर्यनमस्कार करण्यापूर्वी, करताना व केल्यानंतरही काही नियम पाळायचे असतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.

1) जागा- ज्या ठिकाणी सूर्यनमस्कार करायचे आहेत ती जागा स्वच्छ व हवेशीर असावी. तशी जागा उपलब्ध नसल्यास सूर्यनमस्कार घरात घातले तरी चालतात. यासाठी योग्य अशी जागा निश्चित केल्यानंतर शक्यतो तिच्यात बदल करू नये.
2) वेळ- सूर्यनमस्कार शक्यतो सकाळी कोवळ्या उन्हात घालावेत. कडक उन्हात घालू नयेत. यासाठी सकाळी प्रातर्विधी व स्नान आटोपल्यानंतर साधारणत: 6 ते 7 ची वेळ सर्वोत्तम आहे. दिवसातील इतर कोणतीही वेळ या वेळेच्या तुलनेत गौणच आहे. या वेळेत यासाठी पाळावी लागणारी अनेक पथ्ये आपोआपच पाळली जातात. सूर्यनमस्कारासाठी एक वेळ निश्चित केली की तिच्यात बदल करू नये.
3) आसन - सूर्यनमस्काराचा अभ्यास करताना जमिनीवर काहीतरी आच्छादन घालून त्यावर अभ्यास करणे श्रेयस्कर आहे. ग्रंथांमध्ये ‘मृगाजिन’ हे सर्वात उत्कृष्ट आसन सांगितले आहे. ते नसेल तर ‘व्याघ्राजिन’ चालेल. सध्या तर मृगाजिन व व्याघ्राजिन मिळणे अशक्यच आहे. प्रचलित कायद्यांचा विचार करता ही आसने मिळवण्याचा प्रयत्न करू नये. मृगाजिन व व्याघ्राजिन नसेल तर कांबळे वापरावे व तेही नसेल तर सतरंजी वापरावी. मात्र ती स्वच्छ धुतलेली असावी. शक्यतो याच अभ्यासाकरिता वापरण्यासाठी ठेवलेली असावी.
4) पोशाख - पोशाख सैलसर पण त्याचबरोबर शरीराच्या अवयवांच्या हालचाली सर्व दिशांना मोकळेपणाने करता येतील असा असावा.
5) वय - आबालवृद्धांना करता येण्यासारखा हा अभ्यास आहे. परंतु असे असले तरी व्याधित, दुर्बल आदी व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा अभ्यास करावा.
6)आहार- विहार- सूर्यनमस्कारांचा अभ्यास रिकाम्यापोटीच करावा. मलमूत्र निस्सारणानंतरच सूर्यनमस्कार करावेत. सूर्यनमस्कार करण्यापूर्वी साडेतीन तासांपर्यंत घन आहार व अर्धा ते पाऊण तास द्रव आहार घेऊ नये. तसेच सूर्यनमस्कार केल्यानंतर 2 तासांपर्यंत घन आहार व 1 तासापर्यंत द्रव आहार घेऊ नये. हा अभ्यास करणा-या ंनी शाकाहार करणे जास्त श्रेयस्कर आहे. तसेच धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने कटाक्षाने टाळली पाहिजेत.
7) स्त्रियांनीही सूर्यनमस्काराचा अभ्यास करावा का - स्त्रियांनीही सूर्यनमस्काराचा अभ्यास जरूर करावा, परंतु मासिक पाळीच्या काळात गर्भिणी अवस्थेत सूर्यनमस्कार करू नयेत. तसेच प्रसूतीनंतर 2 ते 3 महिन्यांनी हा अभ्यास करावा. वैद्यकशास्त्रातील व योगातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार सूर्यनमस्काराच्या अभ्यासाला सुरुवात करावी.
8) श्वसन- सूर्यनमस्कार करत असताना श्वसन नाकानेच करावे, तोंडाने करू नये. सूर्यनमस्कार करताना ते सावकास, सम व संथ गतीने श्वासावर योग्य ते नियंत्रण ठेवून करावेत.
9) पूरक हालचाली- सूर्यनमस्कार करण्यापूर्वी पूरक हालचाल करण्याची पद्धतही काही ठिकाणी प्रचलित आहे.
त्यामुळे सूर्यनमस्कार करणे अधिक सोपे होते. या सर्वसामान्य नियमांव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या शरीररचना, क्षमता, आजार इत्यादी अनेक घटकांनुसार अनेक बाबींचा विचार सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्गात केला जातो.

सूर्यनमस्कार करणे सोपे असले तरी केवळ वाचून अथवा सीडी पाहून ते करण्याचा प्रयत्न करू नये. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या देखरेखीखाली ते शिकून घ्यावेत. त्यांचा व्यवस्थित सराव करावा. त्यानंतर सूर्यनमस्कारांचे सर्व फायदे मिळवण्यासाठी त्यांचा अभ्यास नियमितपणे करणे अत्यावश्यक आहे.