आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित कलेच्या क्षेत्रात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘काय गाणी गात बसला आहेस?’ किंवा ‘दिवसभर नाचतच राहा!’ असे टोले संगीत किंवा नृत्यकलेत रुची असणा-यांना अनेकदा ऐकायला मिळतात. पण संगीत आणि नृत्य या कलेविषयीचे गैरसमज आता पुसत निघाले आहेत. या कलाक्षेत्रात आपण चमकाल की नाही हे सांगणे कठीण असले तरी या कलांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, चिंतन आपण करू शकता. संगीत आणि नृत्य नव्हे तर अनेक ललित कलांचे अभ्यासक्रम आता सर्वच विद्यापीठांत शिकवले जातात. या ललित कलांमध्ये अधिक प्रावीण्य मिळवण्यासाठी पीएचडीही करणा-यांची संख्या वाढत आहे.


ललित कला हा मानवी जीवनाचा अभ्यास असल्याने या क्षेत्राबद्दल नुसती आवडच नव्हे तर त्यावर सखोल अभ्यास करण्याची अनेकांची इच्छा आहे. आपण ललित कलेमध्ये केवळ कलाकार नव्हे तर त्याचे अभ्यासक म्हणून मोलाचे योगदान देऊ शकता. अशा ललित कलांविषयी आपण या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.


नृत्यकला, चित्रकला, छायाचित्रकला, नाट्यकला, रंगकर्मी, सिनेक्षेत्रातील विविध विभागातील क्षेत्रांमध्ये काम करण्याची इच्छा असणा-यांसाठी ललित कला (फाइन आर्ट्स) मध्ये शिक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत. फाइन आर्ट्स घेऊन बीए किंवा बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (बीएफए) हा पदवी कोर्स करता येतो. या कोर्सला काही ठिकाणी बीव्हीए असेही म्हटले जाते. बीव्ही म्हणजे बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स. बीव्हीए आणि बीएफए हे दोन्ही एकच आहे. कोणत्याही विद्याशाखेत बारावी केल्यानंतर बीएफएमध्ये प्रवेश मिळू शकतो. बीएफएला प्रवेश मिळविण्याकरिता सहसा प्रवेश चाचणी घेतली जात नाही. तरी काही मोजक्या ठिकाणी अशा कोर्सची वाढती मागणी लक्षात घेऊन आता प्रवेश चाचणी घेतली जाते.


या कोर्समध्ये प्रवेश मिळविण्याकरिता पात्रता काय आहे आणि जर तिन्ही विद्याशाखांतल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो, तर हा कोर्स कोण करू शकतो, असा एक प्रश्न मनात पडू शकतो. काही विद्यार्थी ज्यांना फाइन आर्ट्सव्यतिरिक्त कोणत्याही विषयात रस नाही, त्यांना हा निर्णय घेणे सोपे असते. पण ज्या विद्यार्थ्यांना फाइन आर्ट्स घ्यावे की नाही असा प्रश्न पडतो त्यांनी करिअरचा विचार केला पाहिजे. याचा अर्थ असा की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जर नृत्याची आवड असेल आणि त्याला त्यातच करिअर करायचे असेल तर त्यांने इतर पदवी कोर्समध्ये वेळ न घालवता बारावीनंतर नृत्य विषयात बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स करावे.


हल्ली करिअरची व्याख्या बदललेली आहे. करिअर फक्त पैसे कमवायला नव्हे, तर आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करून त्यातून उत्पन्न मिळवणे हे महत्त्वाचे आहे. म्हणून आधी कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल हे ठरवून मग अभ्यासक्रम निवडला, तर कोर्स निवडण्यात चूक होत नाही. शाळेत शिकत असताना असे खूप विद्यार्थी असतात, जे वेगवेगळ्या स्पर्धांत सहभागी होऊन पारितोषिक मिळवून आपले व शाळेचे नाव काढतात, अशा विद्यार्थ्यांनाही बीएफएमध्ये जायचा विचार करायला हरकत नाही.


बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हा चार वर्षांचा संकलित अभ्यासक्रम आहे. बीएफएच्या सुरुवातीच्या काही वर्षांत ड्रॉइंग, पेंटिंग, फिगर ड्रॉइंग, पोर्ट्रेट, वॉटर कलर, आर्ट मेकिंग, कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट, आर्ट हिस्ट्री क्रिटिक इत्यादी विषयांचा अभ्यास असतो. हा कोर्स कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून फुल टाइम किंवा पार्ट टाइम करता येतो. ज्या विद्यार्थ्यांना ललित कलांची आवड आहे आणि ज्यांच्यात चित्रकला, व्हिज्युलायझेशन, आरेखन (स्केचिंग) या किंवा इतर कलांची आवड आहे, असे विद्यार्थी या अभ्याक्रमाला पात्र ठरू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की इतरांना हा कोर्स करता येता नाही. ज्या विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मकता असेल, ज्यांना कला क्षेत्रात काही नवीन करायची इच्छा असेल किंवा ज्यांची कल्पनाशक्ती चांगली असेल त्यांच्याकरिता हा कोर्स उपयुक्त ठरतो.


बॅचलर ऑफ फाइन आर्ट्समध्ये खालील विषयांचा अभ्यास असतो
डिझाइन इन अप्लाइड आर्ट्स, ड्रॉइंग अँड पेंटिंग, फंडामेंटल्स ऑफ व्हिज्युअल आर्ट, हिस्ट्री ऑफ आर्ट (इंडियन आर्ट), लाइफ स्टडी, मटेरियल्स अँड मेथड्स, फोटोग्राफी, क्रिएटिव्ह कम्पोझिशन, क्रिएटिव्ह ड्रॉइंग, हिस्ट्री ऑफ आर्ट 2 (वेस्टर्न आर्ट), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी.


खालील विषयांपैकी कोणत्याही विषयात स्पेशलायझेशन करता येते
आर्किटेक्चर, कॅलिग्रॅफी, कार्टूनिंग, डान्स, ग्राफिक डिझायनिंग, इलस्ट्रेशन, पेंटिंग, म्युझिक, फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, स्कल्प्चर, थिएटर, अ‍ॅनिमेशन.बीएफए केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे शिकायची इच्छा असेल त्यांना मास्टर ऑफ फाइन आर्ट्स पण करता येते किंवा काही विशिष्ट विषयांमध्ये पदविका कोर्स पण करता येतो. पेंटिंग, ड्रामा, स्कल्प्चर आणि म्युझिक ही क्षेत्रे खूप मोठी आहेत. त्यामध्ये विपुल संधी आहेत. पब्लिशिंग फर्म, स्टुडिओ, अ‍ॅडव्हर्टायझिंग फर्म, फॅशन हाऊस, आर्ट स्टुडिओ, बुटीक, टेलिव्हिजन इंडस्ट्री, थिएटर आणि वेब डिझायनिंग अशा ठिकाणी फाइन आर्ट्सची पदवी मदतीला येते. हे शिक्षण घेतलेले विद्यार्थी अ‍ॅनिमेटर, थ्रीडी आर्टिस्ट, आर्ट डिरेक्टर, क्रिएटिव्ह डिरेक्टर, म्युझिक टीचर, प्रॉडक्शन आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर, सेट डिझायनर, फर्निचर डिझायनर या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतात. बीएफए केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करायची इच्छा नसेल किंवा ज्यांना या कलांमध्ये स्वयंरोजगार करायचा आहे, अशांना हा उत्तम पर्याय आहे.


महाराष्‍ट्रात बीएफए हा पदवी कोर्स पुणे, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर आणि मुंबईत (जेजे महाविद्यालय) उपलब्ध आहे. पुण्यातील गणेशखिंड येथील महाविद्यालयात ललित कला या विषयात बीए आणि एमए करता येते. याशिवाय बारावी केलेल्या विद्यार्थ्यांकरिता फाइन आर्ट्समध्ये डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. फाउंडेशन डिप्लोमा कोर्स इन फाइन आर्ट्स नावाचा एक वर्षाचा कोर्स नांदेड येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समध्ये आहे. महाराष्‍ट्रात फाइन आर्ट्सच्या सर्टिफिकेट व पदविका कोर्सेससाठी खूप पर्याय नसून देशातील इतर राज्यांत आणि शहरातील विद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत असे कोर्सेस उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठात लोककलांचा अभ्यासक्रम शिकवला जातो.
छत्तीसगडच्या एका विश्वविद्यालयात कथक, भरतनाट्यम, लोककला आणि वाद्य संगीतमध्ये अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. याशिवाय हरियाणा, कोलकाता, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे काही अल्प कालावधीचे पदविका कोर्स फाइन आर्ट्सच्या विषयात उपलब्ध आहेत. फाइन आर्ट्सकरिता उत्तम विद्यालयांपैकी काही केरळमध्ये आहेत. येथे नृत्य, संगीत या विषयात बीए पदवी घेता येते.