आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावादाची नवी आवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले शेजारी देश हे चिंतेत भर टाकीत आहेत. चीन त्यात आघाडीवर असला तरी सध्या मात्र चीनने आपले सैनिक मागे घेतले आहेत. त्या देशाचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर लवकरच येत आहेत. त्या भेटीत आता अडथळा येण्याचे कारण नाही. चीनची सीमा आपल्या सीमेला काही भागांत भिडत आहे आणि ती निश्चितपणे आखलेली नाही. गेल्या सीमा युद्धानंतर काही वर्षे दोन्ही देशांत व्यवहारच बंद असल्यामुळे सीमा निश्चित करणे शक्य नव्हते. नंतरही या संबंधात पूर्वीप्रमाणेच सर्व काही आहे. आपणापाशीच नव्हे तर जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया अशा अनेक देशांबरोबर चीनने अनेक वाद निर्माण केले असून त्याच्या आक्रमक धोरणाचे हे निदर्शक आहे. लडाखमध्ये सीमा आखलेली नाही. याचा फायदा घेऊन चीनचे काही सैनिक आपल्या हद्दीत आले व त्यांनी तीन तंबू ठोकले. यामुळे दोन प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. एक सरकारी व दुसरी भाजपची. दोन्ही अवास्तव आहेत!
पंतप्रधान मनमोहनसिंग हे अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि वैयक्तिकरीत्या भ्रष्ट नाहीत. पण पंतप्रधान म्हणून निदान गेल्या चार वर्षांत त्यांचा कारभार समाधानकारक नाही. पक्ष व लोक यांच्याशी त्यांचा काही संबंध असल्याचे दिसत नाही.

चीनने लडाखमधून माघार घेतल्यामुळे परिस्थिती बदललेली आहे. तथापि चीनच्या घुसखोरीस बारा दिवस झाल्यानंतर ते जाहीर वक्तव्य करतात, हेच मुळात आक्षेपार्ह आहे. वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी बरेच वादळ उठवले तरी हे मौन पाळून होते. चीनच्या घुसखोरीवर संरक्षणमंत्री बोलतील, असे समजून चालणारे नाही; लोकभावना प्रक्षुब्ध होण्याच्या प्रसंगी गप्प राहण्यास मनमोहनसिंग हे प्राध्यापक नाहीत, तर लोकशाही देशाचे पंतप्रधान आहेत. चीनच्या घुसखोरीचा नेहमीप्रमाणे राजकीय फायदा उठवण्यासाठी भाजप उतावीळ झाला आहे. भारत सरकारने चढाईचे धोरण स्वीकारण्याची त्याची मागणी आहे. जवळजवळ पाच वर्षे तो पक्ष आघाडीचा प्रमुख म्हणून सरकार चालवत होता. तेव्हा चीनबरोबरच्या सीमेत तसूभरही बदल करून घेण्याची हालचाल त्याच्याकडून झाली नव्हती.

पंतप्रधान म्हणतात की, लडाखमधील घुसखोरी हा स्थानिक स्वरूपाचा प्रश्न आहे. तथापि अशा स्थानिक प्रश्नांतून देशादेशांत युद्ध होण्याचा धोका असतो. 1962मध्येही युद्ध झाले तेव्हा घुसखोरी स्थानिकच होती. भाजपचे नेते तर पाकिस्तान व चीन यांच्याशी नेहमीच अस्तन्या सरसावून बोलत असतात. चीनबरोबरचा संघर्ष सोडल्यास तीन युद्धे पाकिस्तानबरोबर झाली व तेव्हा नेतृत्व काँग्रेसकडे होते. यासंबंधात जे काही लेख आपल्याकडील वृत्तपत्रे व नियतकालिके यांत लिहून आले, त्यातल्या दोन-तीन लेखांची दखल घेणे जरूर आहे, असे वाटते. एक आहे के. पी. नायर यांचा. ते ‘टेलिग्राफ’ या कोलकात्याहून निघणार्‍या वर्तमानपत्राचे वॉशिंग्टनमधील प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे काम करत आले आहेत. पूर्वी ते दुबई इत्यादी ठिकाणी पत्रकारिता करत होते. त्यांना रशियन, अरबी, फ्रें च इत्यादी पाच-सात भाषा येतात आणि वॉशिंग्टनच्या राजनैतिक वर्तुळात त्यांचा वावर आहे. ‘पर्यंक-पंडित’ अशी एक संज्ञा आहे. त्या धर्तीवर ‘पर्यंकयुद्धवीर’; लष्करी डावपेच तज्ज्ञ अशाही संज्ञा प्रचलित करायला हरकत नाही. अशा या वाचिवीरांना काही अप्रिय वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायला हवी, असे नायर यांना वाटते. आपल्या संरक्षणमंत्र्यांच्या निरनिराळ्या वक्तव्यांतील बदललेला सूर त्यांनी दाखवून दिला आहे. परराष्टÑ खात्यांत काही युद्धवीर आहेत, असे सांगत नायर यांनी म्हटले आहे की, चीन व भारत यांच्यातील मधूनमधून होणारे हे वादंग एकंदरच सीमेचा प्रश्न अनिर्णीत ठेवण्यामुळे निर्माण झाले आहे, याकडेच नव्या वादंगामुळे लक्ष वेधले गेले आहे. तथापि आताचा हा वाद उकरला गेला असता आपल्या सरसेनापतींनी सीमाभागास भेट दिल्यानंतर संरक्षणमंत्र्यांचा सूर सौम्य का झाला, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

नायर यांनी चिनी नेतृत्वाच्या पूर्वीच्या हालचालींची दखल घेण्यास सांगितले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे, की चीनचे नवे पंतप्रधान ली केक्वियांग भारताच्या भेटीस येत आहेत. ही भेट नव्या वादामुळे ठरलेली नाही. ती कितीतरी आधी ठरली. पंतप्रधान म्हणून आपण इतर देशांच्या भेटीच्या आधी भारतास भेट देणार, असे ली यांनी जाहीर केले होते. त्यानंतर मनमोहनसिंग यांची चीन भेट ठरली आहे. 14 मार्च रोजी दरबान इथे चीनचे अध्यक्ष जिनिपंग व मनमोहनसिंग यांची भेट झाली, तेव्हा सीमाप्रश्नाचा उल्लेख करून शक्य तितक्या लवकर हा राष्‍ट्रीय प्रश्न सुटला पाहिजे, असे आपण सांगितल्याची माहिती जिनिपंग यांनी वार्ताहरांना दिली.

या अशा वाटाघाटी व्हाव्यात, या दृष्टीने आपले सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन प्रयत्न करत आले आहेत. चिनी अध्यक्षांच्या या वक्तव्यामुळे शिवशंकर मेनन यांच्या प्रयत्नांना काही यश येत आहे, असे मानण्यास जागा आहे. नायर यांच्या म्हणण्याप्रमाणे असे दिसते की, आपले लष्कर आणि सत्ताधारी राजकीय नेतृत्व यांच्यात लडाखमधील वास्तव परिस्थितीसंबंधात कितपत देवाणघेवाण होते, याची चाचपणी चिनी नेतृत्व करत असावे. सियाचीन भागात भारताने तीन हवाई धावपट्ट्या बांधल्या आहेत. काराकोरमचा हमरस्ता आणि सिंकिंयांगला जोडणारा रस्ता यावरून होणार्‍या हालचालींवर भारतास लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. आता जी घुसखोरी झाली आहे, तिच्यामुळे सर्व सीमाप्रश्नच विचारात घेण्यास चालना मिळेल, असे चीनला वाटत असावे. तसे झाले तर आपल्या सरकारने तपशीलवार माहिती जमवली पाहिजे आणि कायद्याच्या जंजाळात न पडता राजकीय तोडगा काढण्याची आपली तयारी हवी. यासाठी उगाच भावनात्मक वक्तव्ये न करत बसता सर्व विरोधी पक्षांना स्वतंत्रपणे व वैयक्तिकरीत्या विश्वासात घेणे हिताचे होणार आहे. चीनला विविध राजकीय पक्षांचा प्रश्न नाही, पण आपल्यापुढे आहे. पर्यंक युद्धवीरांनी दंड थोपटण्यापूर्वी लडाखच्या ज्या भागांत घुसखोरी झाली आहे, त्याची माहिती करून घेतलेली बरी. अत्यंत उंच भागी असलेल्या या भागाचे हवामान भरवशाचे नाही. त्याच्या खालच्या लडाखच्याच भागात आपल्याकडून जे जातात, त्यांची वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. कारण विरळ हवामानामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. बी. रामन हे एक काळ केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयाचे अतिरिक्त सचिव होऊन मग निवृत्त झाले. ते चेन्नईत वास्तव्य करतात आणि तिथेच ट्रॉपिकल स्टडीज आणि चायना स्टडीज मिळून एक संस्था चालवली असून तिचे ते संचालक आहेत. या संस्थेतर्फे बरेच लेखन, संशोधनात्मक प्रकाशन प्रसिद्ध होत असते. ‘आऊटलूक’ या साप्ताहिकात त्यांचे एक सदर आहे. त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या लेखात अशी माहिती दिली आहे, की मलिक यांच्या नेतृत्वाखाली इंटेलिजन्स ब्युरो असल्यापासून आणि आर. एन. कौ हे रॉचे प्रमुख असल्यापासून लडाख भागात गुप्तचर विभागात नेमणूक व्हावी अशी तरुण अधिकार्‍यांची प्रबळ इच्छा असे. लेहमध्ये नेमणूक करण्यापूर्वी कसून वैद्यकीय तपासणी केली जाते. रामन यांनी स्वानुभवाने सांगितले आहे की, सन्टुक या नावाच्या अधिकार्‍यास खास विमानाने परत धाडावे लागले होते. कारण हवेचा दबाव कमी झाल्यावर त्याच्या छातीत पाणी साचले व जिवावरच बेतले होते. सीमा आखलेली नसल्यामुळे अनेकदा भारतीय व चिनी अधिकारी एकमेकांच्या हद्दीत प्रवेश करत. काही वेळा हे ठरवून होत होते आणि पलीकडे असलेल्या माहीतगारांशी संपर्क साधला जात असे. एक अधिकारी खेचरास दौडायला लावण्याच्या भरात चीनच्या हद्दीत बराच आत गेला होता. पण लक्षात आल्यावर तितक्याच जलदीने सुखरूप परतला. अशी ही सीमा असून ती न आखल्यामुळे अनर्थास आमंत्रण देणारी आहे. तेव्हा हा भावना भडकवण्याचा प्रश्न होता कामा नये.
(gtalwalkar@hotmail.com)