आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय ‘कला संगीता’चे सूररंग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संगीताला शास्त्रीय म्हणायला कुठलाच वैज्ञानिक आधार नाही. कारण पश्चिमेतले गाणे-बजावणे हे तिथल्या ‘क्लासिकल पीरियड’चे होते...मोझार्ट, हेडन आणि बिथोव्हन यांच्या जमान्यातले. भारतीय संगीताला ‘शास्त्रीय’ अशी ओळख (चुकीची) मिळाल्याने साधारण व्यक्तीला ते समजणे अवघड होते आणि म्हणूनच या कला प्रकारास ‘भारतीय कला-संगीत’ अशी ओळख देणा पुस्तकाविषयी...

हिंदुस्थानी संगीत या विषयावर भारतात आणि परदेशातही विपुल आणि दर्जेदार लिखाण झालेले आहे, होत आहे. तरीही नव्या संशोधक लेखकांची पुस्तके वाचकांना हवीच असतात. या घटकेला संगीत वाजवणारे आणि ऐकणारे यांची संख्या लाखाच्या घरात आहे. गुरू-शिष्य ही सुंदर परंपरा पुढे चालू राहावी यासाठी अनेक संगीतज्ञ, नर्तक व कलाकार कष्ट घेत आहेत. विविध शहरांत त्यांनी गुरुकुल उभारले आहेत!
‘हिंदुस्तानी म्युझिक टुडे’ या पुस्तकाचे लेखक दीपक राजा हिंदुस्थानी (शास्त्रीय) संगीतातील बडे प्रस्थ. ते फक्त संगीताचे गाढे अभ्यासकच नव्हे तर स्वत: सतार आणि सूरबहार या वाद्यांचे इटावा घराण्याचे प्रसिद्ध वादक आहेत. पुलिनदेव बर्मन व पंडित अरविंद पारिख यांचे ते शिष्य. त्यांनी अहमदाबादच्या ‘आयआयएम’मधून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन व इंग्लंडच्या वॅटफोर्ड कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजीमधून जाहिरातींवरची पदवी मिळवली आहे. संगीत त्यांचे वेड असले तरी ‘बिझनेस इंडिया’चे संपादकपद त्यांनी भूषवले आहे आणि इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे (आयएनएस) ते महासचिवही होते. अशा बहुविध कामांचा, अनुभवांचा वारसा लाभलेला असून त्यांचा जीव संगीतातच रमतो, हे या पुस्तकावरून दिसते. ते फक्त सतार व सूरबहार वाजवत नाहीत, तर संगीताचे मोठे शास्त्रज्ञ आहेत. प्रस्तुत छोटेखानी पुस्तकात त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला कला-संगीत म्हणून संबोधले आहे, शास्त्रीय म्हणून नव्हे; हा वाचकांना एक छोटा धक्का असू शकेल. त्यांनी त्याची कारणे देत म्हटले आहे की पश्चिमेतल्या संगीत शास्त्रज्ञांनी 400-500 वर्षे त्यांच्या संगीतावर संशोधन वगैरे करून जे संगीत गायन-वादन केले, त्याला शास्त्रीय (क्लासिकल) हे नाव मिळाले. भारतीय संगीताला शास्त्रीय म्हणायला कुठलाच वैज्ञानिक आधार नाही. कारण पश्चिमेतले गाणे-बजावणे हे तिथल्या ‘क्लासिकल पीरियड’चे होते...मोझार्ट, हेडन आणि बिथोव्हन यांच्या जमान्यातले. भारतीय संगीताला ‘शास्त्रीय’ अशी ओळख (चुकीची) मिळाल्याने साधारण व्यक्तीला ते समजणे अवघड होते आणि म्हणूनच या कला प्रकारास ‘भारतीय कला-संगीत’ असे नाव लेखक देतात.
या पुस्तकात पुढे म्हटले आहे की, संगीत जरी एक कला असली तरी ‘कला-संगीत’ हा प्रकार खूप वर्षांपासून भारतात विविध रूपांनी अस्तित्वात आहे. आजच्या संगीताचे संबंध अत्यंत प्राचीन (प्रिमिटिव्ह), लोकसंगीत, लोकप्रिय संगीत, आध्यात्मिक आणि लढाई-झुंज या पाचही प्रकारांशी फार जवळचे आहेत. संगीताची परिभाषा देताना लेखक सांगतात, ‘स्ट्रक्चर्ड साउंड’ म्हणजेच संगीत आणि ते समजण्यासाठी आवाज (साउंड) आणि स्ट्रक्चर (व्यवस्था, संरचना) समजणे गरजेचे आहे. कला-संगीत समजणारे समाजात कमीच असतात. संगीताकडेच ओढले जाणारे मुळात कमी असतात आणि त्यातले अनेक ‘अपघातानेच’ गायनाकडे खेचले गेलेले असतात. मग संगीताच्या ताकदीवर ते तिथेच खिळून राहतात आणि सतत त्याचा आस्वाद लुटत राहतात. लेखक म्हणतात, भारतीय संगीतात अंदाजे 1000 वेगवेगळे राग असल्याचे मानले जाते आणि सुमारे 150 राग एका विशिष्ट वेळेत प्रयोगात येत राहतात. खूपच कमी संगीतज्ञांना 50 पेक्षा जास्त राग येतात-समजतात. दीपक राजा लिहितात, जास्तीत जास्त 25-30 राग हे साधारणपणे वाजवले जातात. पुढे लेखक राग, ताल, बंदिश याबद्दल लिहून सांगतात की संस्कृतमध्ये ‘राग’ या शब्दाचा संगीताशी काहीच संबंध नाही. राग हा शब्द भावनेशी निगडित आहे आणि त्याचा संबंध ‘रस’ (रसास्वाद)शी जोडला जातो. संगीत भावनेला साद देत असते. म्हणून संगीताने मनुष्याला बरे वाटते, तो एका वेगळ्याच विश्वात जातो. कुठला राग केव्हा गायला जातो, त्याची कारणे... संध्याकाळ ते मध्यरात्रीपर्यंत विशिष्ट असे रागच गायक मंडळी का गातात? भैरव हा राग सूर्योदयाच्या वेळेचा राग असूनही मध्यरात्री का गातात (अनेक भारतीय संगीतज्ञांना हे पटत नाही की भैरव रात्री गायला जातो). लेखक थोडक्यात सांगतात की हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये रागांची शिस्त किंवा गाण्याची वेळ-परंपरा पाळली जाते, तशी कर्नाटकी संगीतात नाही. दुसरे म्हणजे, आजकालचे संगीत समारंभ हे वातानुकूलित हॉल्समध्ये होतात. त्यामुळे नैसर्गिक वातावरणाचा प्रभाव गायकांवर पडत नाही. तेव्हा विशिष्ट राग (जसा तो जुन्या काळात गायला जायचा खुल्या वातावरणात) सकाळी किंवा संध्याकाळी गायला जाऊ शकतो, असे लेखक सुचवतात.
भारतीय सौंदर्यशास्त्र, त्यावरचा विश्वास, राग गायनाची वैज्ञानिक बैठक, भारतीय राग विदेशी लोकांनी भलत्याच वेळेला गायला-वाजवला तर काय फरक पडतो, असे अनेक विषय लेखकाने थोडक्यात लिहून संगीत शौकिनांना वेगळा विचार करायला भाग पाडले आहे. ‘हिंदुस्तानी म्युझिक टुडे’ या पुस्तकात वेगवेगळी संगीताची घराणी, त्यांचा उगम, इतिहास याबद्दल लिहून ध्रुपद (गुंदेचा बंधू), ख्याल गायकी (किशोरी अमोणकर, भीमसेन व कुमारजी), ठुमरी (सिद्धेश्वरी देवी, फय्याज खान) व टप्पा (मालिनी राजूरकर) याबद्दल छान माहितीपूर्ण लेख आहेत. लेखक स्वत: वाद्य वाजवतात आणि पुस्तकातून त्यांनी मुख्य वाद्य जशी रुद्रवीणा (झिया मोहिनुद्दीन डागर व शमसुद्दीन फरिदी), सतार (विलायत खान व रविशंकर), सूरबहार (इनायत खान, इम्रत खान), तसेच सरोद (अली अकबर खान व अमजद अली) आणि गिटार (ब्रिजभूषण काबरा), संतूर (शिव शर्मा) तानपुरा-स्वरमंडल, सारंगी, व्हायोलिन (व्ही. जी. जोग) आणि बासरी, हार्मोनियम, पखवाज व तबला याबद्दल वेगवेगळे अध्याय लिहून साधारण संगीतप्रेमीला व वाचकालासुद्धा संगीताच्या सगळ्या अंगांबद्दल शास्त्रीय, संशोधनपूर्ण लेखनाद्वारे ओळख करून दिली आहे.
हिंदुस्तानी म्युझिक टुडे, लेखक : दीपक राजा
प्रकाशक : डीके प्रिंटवर्ल्ड, पाने : 138 ।
किंमत : 600 रुपये