आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन बेटिंग लीग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिशांनी भारताला खरे तर अनेक गोष्टी दिल्या. उदाहरणच द्यायचे तर वीज, रेल्वे, पोस्ट, आधुनिक शिक्षण पद्धती, न्यायव्यवस्था, इंग्रजी भाषा, हॉकी, टेबल टेनिस, टेनिस, बॅडमिंटन वगैरे वगैरे. पण भारतीय समाजमनामध्ये खोलवर रुजल्या, त्या दोनच गोष्टी - संसदीय लोकशाही आणि क्रिकेट!


या दोन गोष्टी आणि त्याच्या भारतीय समाजमनावरील परिणामाबाबत सांगण्याचे कारण म्हणजे सध्या आयपीएलमधील बेटिंग व त्या निमित्ताने होणारे सामन्यांचे फिक्सिंग यावर नाक्यानाक्यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. क्रिकेटमध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये आलेला अवाढव्य पैसा, त्यातील राष्ट्रीय भांडवलदारांची वाढलेली गुंतवणूक, त्यात असणारी झगमगीत प्रतिष्ठा, बॉलीवूड सिने तारे-तारकांचे संबंध, हे सामान्य माणसाच्या भावविश्वावर प्रचंड प्रभाव टाकत असतात. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले की त्याबद्दलचा रोषदेखील तितक्याच प्रमाणात व्यक्त केला जाणे स्वाभाविक आहे.


त्यामुळेच या सगळ्या घटनेकडे पाहताना थोडासा इतिहास, थोडा भूतकाळ व ब-यापैकी वर्तमानकाळ सजगतेने तपासून पाहणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटचा रामचंद्र गुहांनी सामाजिक-राजकीय अंगाने लिहिलेला इतिहास खूपच रंजक माहिती देणारा आहे.


भारतीय क्रिकेटबाबतचा पहिला उल्लेख साधारणत: 1721 मध्ये झालेला आढळतो. ब्रिटिश खलाशी हा खेळ खेळत असल्याचे दाखले इतिहासात आहेत. पुढे 1792 मध्ये कोलकाता क्रिकेट क्लबची स्थापना झाली व क्रिकेटची मुहूर्तमेढ या देशात रोवली गेली. मात्र क्रिकेट या देशात रुजले, फुलले व बाटले ते मुंबई शहरात! एकेकाळी भारतीय क्रिकेट चमूतील अर्ध्यापेक्षा अधिक खेळाडू ज्या शहराने दिले त्याच शहरात क्रिकेटवरील सट्ट्याची सुरुवातदेखील झाली. क्रिकेट व राजकारणाचा संबंध तर फार पूर्वीपासूनचा आहे. हिंदू जिमखाना, इस्लाम जिमखाना, पारशी जिमखाना असे या खेळामध्ये धर्मावर आधारित जिमखाने निघण्यामागेही ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरणच कारणीभूत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात चार दिवसांचे सामने या जिमखान्यांमध्ये खेळवले जात असत, तेव्हा हिंदू विरुद्ध मुस्लिम भावना शहरात उफाळून येत असत. पुढे बॉबी तल्यारखान यांनी 1930च्या दशकात ऑल इंडिया रेडिओवरून पहिल्यांदा सामन्यांचे थेट समालोचन करण्यास सुरुवात केल्यावर या भावनांचा उद्रेक देशभरात होऊ लागला होता.


पुढे तर 1937 मध्ये मुंबई संयुक्त मतदारसंघातून बाळू पालवणकर या विख्यात क्रिकेटपटूला काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात निवडणुकीमध्ये उतरवले होते. काँग्रेसने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती आणि अगदी वल्लभभाई पटेलही पालवणकरांच्या प्रचारासाठी आले होते. अर्थात, बाबासाहेबांनाच या निवडणुकीत विजय मिळाला होता. क्रिकेटचे चाहते व कट्टर विरोधक यांचीही भारतीय राजकारणात मोठी मांदियाळी आहे. 1950 मध्ये गोळवलकर गुरुजींनी क्रिकेटला विरोध करताना म्हटले होते की, ‘कोट्यवधी रुपये खर्चून आपल्या देशात क्रिकेट खेळले जाते. इंग्रज आपल्या देशातून गेलेत की नाही, अशीच यावरून शंका यावी. पं. नेहरू व त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी काही वर्षांपूर्वी खेळलेला क्रिकेटचा सामना हे त्यांच्यावरील इंग्रजी प्रभावाचेच द्योतक आहे, यापेक्षा ते कबड्डी वा खो-खो का खेळले नाहीत?’


1960 मध्ये पाकिस्तानी टीम भारतात आली असताना
डॉ. राममनोहर लोहिया यांनी क्रिकेट व नेहरू यांना जोडून अशीच टोकाची टीका केली होती. ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरू असताना त्याच्याच शेजारील एका उपाहारगृहात पत्रकार परिषद घेऊन या खेळावर कठोर टीका करताना लोहिया म्हणाले होते, ‘क्रिकेटमुळे या देशात अजूनही इंग्रजांचेच राज्य असल्याचे वाटते आहे. हे असे काँग्रेसच्याच साम्राज्यवादी धोरणांमुळेच होते आहे. जनतेने नेहरूंना फेकून द्यावे. त्यानंतर संपूर्ण देश आनंदाने कबड्डी खेळू लागेल.’


आज मात्र गोळवलकरांचे शिष्य अरुण जेटली बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत आणि लोहियांचे शिष्य लालूप्रसाद यादव बिहार क्रिकेट बोर्डाच्या राजकारणात सक्रिय आहेत. क्रिकेटचा अनाकलनीय महिमा म्हणतात तो हाच!
तर अशा या क्रिकेटमध्ये सट्ट्याचा प्रवेश झाला तो साधारण 1980 च्या दशकात. शोभन मेहता याने क्रिकेटवर बेटिंग घ्यायला सुरुवात केली. मुंबईत पूर्वी अमेरिकन कॉटन एक्स्चेंजच्या रेटवर सट्टा खेळला जायचा. पुढे रतन खत्रीने मटक्याची शक्कल लढवली व या सट्ट्याची व्याप्ती सर्वदूर पसरवली. मलबार हिलवरील शेठजींपासून लालबाग-परळच्या कामगारांपर्यंत अनेकांना मटक्याचे वेड लागले. या मटक्याच्याच धंद्यात असणा-या शोभनने सर्वाधिक लोकप्रिय खेळ व जुगार यांचे प्रभावी मिश्रण करून बेटिंग घ्यायला सुरुवात केली व त्याची व्याप्ती हा हा म्हणता सर्वदूर पसरली.


धंदा इतका वाढला की तो शोभनला सांभाळणे अशक्य झाले. धंदा वाढला तसे धंद्यातील धोकेही वाढले. अनेक जण क्रिकेटवर खेळलेला सट्टा हरल्यावर पैसे द्यायला नकार देऊ लागले. त्यातूनच मग पहिल्यांदा यात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये नव्याने उदयास येणा-या दाऊद कासकरचा प्रवेश झाला.


दाऊदने सुरुवातीला शोभनच्या वसुलीसाठी त्याला संरक्षण देण्याचे मान्य केले. पुढे या धंद्यात येणा-या प्रचंड पैशाचा दाऊदला अंदाज आल्यावर त्याने शोभनकडून या धंद्यात भागीदारीच घेतली व पुढे कंपनी दुबईला स्थिरस्थावर झाल्यावर शरद शेट्टीच्या ‘कल्पकतेचा’ वापर करत अख्खे क्रिकेटच आपल्या दावणीला बांधले. याच दरम्यान शारजा कपची सुरुवात झाली होती. भारतीय, पाकिस्तानी क्रिकेटर्सशी दाऊदचा अनेक पार्ट्यांमधून थेट संबंध येऊ लागला. खेळाडूंना महागड्या भेटवस्तूंबरोबरच थेट रोकडही देण्यात येऊ लागली व हळूहळू एकेक करत अनेक मासे दाऊदच्या गळाला लागू लागले. इकडे बेटिंगचे रॅकेट मुंबईबरोबरच इंदूर, अहमदाबाद, बंगळुरू या शहरांतून तर पसरवले गेलेच, पण युरोपातील हॉलंडमध्येही क्रिकेटवरील सट्ट्याची जोरदार दुकाने उघडली गेली. कंपनीतून छोटा राजन फुटून बाहेर पडल्यावर 2002 मध्ये दाऊदला मिळणा-या या बेटिंगच्या पैशाची रसद तोडण्यासाठी शरद शेट्टीची त्याने दुबईत हत्या करवली. त्यानंतरच दाऊदच्या बेटिंगचा हा व्यवहार सुनील दुबईच्या हातात गेला.


बेटिंगसाठी टेस्ट मॅच कुचकामी असते. इतक्या हळू खेळावर जुगार खेळणा-यांना रस नसतो. बेटिंगला पूरक असे क्रिकेटमध्येही बदल व्हायला लागले. ज्या ऐंशीच्या दशकात बेटिंग सुरू झाले त्याच काळात एकदिवसीय सामन्यांचेही फॅड आले आणि आता तर ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमुळे बेट घेणारे व लावणारे या दोघांनाही यात प्रचंड नशा येते.
आयपीएल सामने सुरू करण्यामागे क्रिकेट खेळाडूंचा, बीसीसीआयचा वा अन्य कुणाच्याही फायद्याचा जो काय हिशेब असेल तो असो; पण आयपीएलची कल्पना अस्तित्वात आली, त्याच वेळी या स्पर्धेमुळे बेटिंगला खूप मोठा फायदा होणार, असे जाणकार उघडपणे बोलत होते. आजघडीला गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजाप्रमाणे, एका आयपीएल सीझनमध्ये बेटिंगची उलाढाल असते, तब्बल 40 हजार कोटी रुपयांची!


आता एवढी मोठी उलाढाल व्यवस्थेला अंधारात ठेवून किंवा त्यांना फसवून होते, असे मानायचे झाल्यास मूर्खाच्याच नंदनवनात वावरल्यासारखे होईल. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणा-या रोकड पैशाचा व्यवहार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर हवालाच्या मार्फतच केला जातो. बेटिंगच्या या धंद्याचा बादशहा कराचीत, तर त्याच्या या कंपनीचा सीईओ दुबईत बसून या हजारो कोटींचे व्यवहार हवालामार्फत चालवतात ते पोलिस, प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्याच आशीर्वादाने, हे उघड गुपित आहे. म्हणजेच, हजारो कोटींच्या सट्ट्याचा व्यवहार व्यवस्थेतील बड्या धेंडांच्या मदतीशिवाय चालणे अशक्य ठरते. त्यासाठीच सर्वपक्षीय शक्तिशाली नेत्यांची मोट या क्रिकेटच्या दावणीला बांधली गेली. अशा वेळी प्रश्न आहे तो या संपूर्ण प्रकरणाचे भारतीय सूत्रधार शोधून काढण्याची ताकद व इच्छा व्यवस्थेमध्ये आहे का, याचा. खरे सूत्रधार शोधून काढले, तर देशातील क्रिकेट सोडाच; भारतातील संसदीय लोकशाहीलासुद्धा 15 रिश्टर स्केल एवढ्या भूकंपाचा धक्का सहन करावा लागेल. या सगळ्यात महत्त्वाचं राहिलंच की, रोज नव्या नव्या राजकीय भ्रष्टाचाराच्या स्टो-यांना कंटाळलेल्या दर्शकांना आणि या स्टो-यांनी हवालदिल होणा-या नेत्यांना ही आयपीएलच्या निमित्ताने आलेली मधली सुटी मन प्रफुल्लित करणारीच वाटत असेल, की नाही? आता तरी आली का आयडिया सगळ्या गेमची?!!


samarkhadas@gmail.com