आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिपक्वतेच्या उंबरठ्यावर भारतीय सिनेमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेमामधल्या तथाकथित रोमँटिसिझमला आव्हान देत वेगळ्या धाटणीचे पानसिंग तोमर, साहिब बीवी और गँगस्टरसारखे चित्रपट देणा-या चित्रपट दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी चित्रपटप्रवासाचा घेतलेला आढावा त्यांच्याच शब्दांत...

साधारणपणे जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर 1993 मध्ये उत्तराखंडातून मी मुंबईत आलो. प्रत्येक जण सुरुवातीला करतो तसा सिनेमात काम मिळवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला नाही. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडलेलो. शेखर कपूर, मणिरत्नम यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं. त्यामुळे बॅँडिट क्वीनच्या कास्टिंग डिरेक्टरपासून लेखन, दिग्दर्शनापर्यंत पोहोचण्याकरिता मला मूलभूत संघर्ष कधीच करावा लागला नाही. विचारांची बैठक पक्की होती, त्यामुळे या क्षेत्रात मी मला नेमके काय करायचे आहे याची तयारी करूनच उतरलो होतो.


पण जे ठरवले होते त्यासाठी प्रस्थापित संकल्पनांना तडा द्यावा लागणार होता. आपल्याकडे रूढ, घासून घासून गुळगुळीत झालेल्या संकल्पना मोडीत काढायला कुणी जात नाही. कैसा है कि उस जमाने में फॉर्म्युला फिल्मे बनती थीं.. एक ही फॉर्म्युला तय था... नायक वही किसम का, खलनायक वही किसम का, नायक की मॉँ भी हर फिल्म् ामें एक जैसी ही लगती थी; खाली चेहरा बदलता होगा। पण असा सिनेमा आपल्या हातात तीन तासांच्या करमणुकीव्यतिरिक्त काहीच ठेवत नाही. अशा चित्रपटातला निदान कॉन्फ्लिक्ट तरी बदलणे अपेक्षित होते, पण तेही झाले नाही. मी या क्षेत्रात आलो तेव्हा ही चौकट मोडायचीच, असाच निर्धार मनात होता. ऑडियन्स आऊट ऑफ द बॉक्स सोचते नहीं ये उनकी प्रॉब्लेम है, उन्हे वैसा सोचने पे मजबूर करना हमारी जिम्मेदारी है। इसलिए हमने आऊट ऑफ द वे सोचना जरुरी है। त्या काळी अर्थात सिनेमा बनवणं मोठं खर्चिक काम होतं. त्यामुळेही रूढ संकल्पनांच्या बाहेर जाऊन सिनेमा बनवणं अवघड वाटत असेल.


त्यामुळे सिनेमाच्या ज्या संस्कृतीत मी प्रवेश केला ती संस्कृती जराही ढळू न देता सिनेमा बनवणं खरोखर अडचणीचं होतं. कारण मला टिपिकल सिनेमा करायचा नव्हता. त्यामुळे जे चित्रपट मला करायचे होते ते करताना मात्र मूलभूत चौकटींना धक्का देताना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यात नुसता आर्थिक संघर्ष नव्हता तर विचारसहमतीचाही संघर्ष होता. लोकांना आपला सिनेमा आवडेल हे कन्व्हिन्स करतानाही खूप लढावे लागले... बट आय डिड इट, सो आय अ‍ॅम हिअर.


या आवडीचा, चॉइसचाच खरे तर आपल्याकडे खूप बाऊ केला जातो. प्रेक्षकांना अमुकच आवडतं, हा समज सिनेमासृष्टीने स्वत:च करून घेतला आहे, जो खरे तर एकांगी आहे. अशा वेळी अगदी सहजपणे समांतर सिनेमा, कमर्शियल सिनेमा अशी वर्गवारी केली जाते. पण मला वाटतं, सिनेमाची वर्गवारी कशासाठी करायची? अमुक एक आर्ट फिल्म वा तमुक एक कमर्शिअल फिल्म, असं वर्गीकरण करण्यापेक्षा आपण एकाच सिनेमाद्वारे मनोरंजनही करू शकतो व नवेदेखील काहीतरी देऊ शकतो, हा समतोल साधण्याचा प्रयत्न करायला हवा. सिनेमा कमर्शियल का बनवला जातो, वा त्याच दृष्टिकोनातून का बनवला जातो. कारण निर्मात्याला किमान त्याचा पैसा परत मिळवणे गरजेचे असते.


सिनेमा ये कोई कविता नहीं की कोई पेंटिंग नहीं जो बंद कमरे में बन सकती है। सिनेमाचा कॅन्व्हास मोठा आहे आणि तितकाच खर्चिक आहे. पण म्हणून केवळ नफ्याचे गणितच घोळवत बसण्यापेक्षा निर्मात्याने घातलेला पैसा किमान परत मिळेल आणि शिवाय प्रेक्षकाला मनोरंजनाबरोबर नावीन्यपूर्ण, संदेश देणारे वा अंतर्मुख करणारेही संचित मिळेल, असा बॅलन्स्ड चित्रपट जमला तर भारतीय सिनेमासृष्टीत अधिकाधिक समृद्धता येऊ शकते. अशा सिनेमांचे उदाहरण द्यायचे म्हटले तर 2012 हे वर्ष या दृष्टीने अधिक चांगले वर्ष ठरले. कहानी, गॅँग्ज ऑफ वास्सेपुर यांसारखे अनेक चांगले, आशयगर्भ चित्रपट 2012 मध्ये आले; ज्यांनी मनोरंजनही केले, सामाजिक आशयही मांडला आणि बॉक्स ऑफिसवरही ते यशस्वी ठरलेत. सिनेमा बदलायला लागले याचे हे वर्ष एक सूचक उदाहरण म्हणून देता येईल.
या सगळ्या प्रवासात पानसिंग तोमर या चित्रपटाने मला खूप काही दिले. माझ्यासाठी हा चित्रपट माझ्या करिअरमधला, आयुष्यातला माइलस्टोन आहे वा माझी दिग्दर्शक म्हणून खरी ओळख आहे. आपल्या आयुष्यात अनेक टप्पे असतात, बालपण मागे टाकून तरुण होणे, लग्न करणे, मूल होणे. त्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी झाल्याचा आपल्याला आनंद असतो. पानसिंग तोमर हा अशाच महत्त्वाच्या टप्प्यांमधील एक. पानसिंग तोमरची निर्मिती होण्यापासूनच तो वादाच्या भोव-यात अडकलेला होता अनेक अंगांनी. चित्रपटाची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी वादग्रस्त होती, हे प्रमुख कारण त्याच्या निर्मितीत अडथळा आणणारे होतेच; शिवाय असा चित्रपट चालेल याची काय शाश्वती, असा प्रश्न त्या वेळी सुरुवातीलाच उपस्थित झाला होता. इरफानने अत्यंत मन लावून त्यात काम केलं खरं; पण हा चित्रपट प्रदर्शित व्हायलाही अनेक अडथळे येत होते, जे माझी व सगळ्याच सहका-यांची कसोटी पाहणारे होते. लोग पूछते थे कब होगी आखिर फिल्म रिलीज. मेरे पास कोई जवाब ही नहीं था उस वक्त। नंतर अखेर फिल्म रिलीज करायचे ठरवले तर केवळ 200 स्क्रीन्स आम्हाला भारतभरात मिळाल्या. सिनेमाच्या बारशालाच इतक्या सतराशेसाठ अडचणी! पण जेव्हा पानसिंग तोमर रिलीज झाला तेव्हा अक्षरश: प्रेक्षकांसह समीक्षकांनी तो डोक्यावर घेतला. राष्टÑीय पुरस्कारापर्यंत या सिनेमाची घोडदौड झाली आणि मी कृतकृत्य झालो.


या प्रवासापर्यंत भारतीय सिनेमानेही शंभरी ओलांडली. सिनेमा खरे तर एक वैज्ञानिक शोध आहे. पाश्चात्त्यांकडून आपल्याला हे तंत्र मिळाले, दादासाहेब फाळकेंनी ते इथे जन्माला घातले. सिनेमा लोकांना पचेल का, या प्रश्नाचा विचार करून पौराणिक समाजमान्य विषयांपासून आपला सिनेमा सुरू झाला. मला वाटते, भारताच्या राजकारणात जसजसे बदल होत गेले तसतसा सिनेमा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बदलत गेला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आनंदाचा माहोल असतानाही 1947 ते 1950 या काळात ट्रॅजिक सिनेमे बनत होते, कारण होतं फाळणी. अप्रत्यक्षपणे फाळणीचे पडसाद त्या वेळी चित्रपटातून उमटत होते. मात्र त्यानंतर हळूहळू यश चोप्रा, करण जोहरपर्यंत सिनेमाने अनेक रंग पाहिले. श्रीमंतीचं कौतुक गाणारा सिनेमा बनायला लागला, दिलवाले दुल्हनियाने अशा सिनेमाचा प्रेक्षकवर्ग म्हणून अनिवासी भारतीयांनाही समोर ठेवले आणि तिथून सिनेमा प्रेक्षकांसाठी परदेशातही जायला लागला. पण सिनेमामध्ये मध्यमवर्ग, दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणारी माणसे अभावानेच दिसत होती, त्यांच्या कहाण्या अपवादानेच मेनस्ट्रीममध्ये मांडल्या जात होत्या, ते आताशा कुठे गेल्या काही वर्षांपासून व्हायला लागले आहे; ज्यात मीही साहिब बीवी और गॅँगस्टर, पानसिंग तोमरसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे. भारतीय सिनेमा आज संक्रमणावस्थेतून बाहेर पडून परिपक्वतेच्या उंबरठ्यावर आहे. हा उंबरठा अधिक सक्षमतेने ओलांडला जावा, हीच फक्त इच्छा.
शब्दांकन - प्रियांका डहाळे