आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय लोकसंगीत-वेस्टर्नच्या फ्यूजनचा राजा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध भाषांतील 100च्या वर चित्रपट, 5000 हून अधिक गाणी, उत्कृष्ट संगीतासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार ! ही आहे संगीतकार इलया राजा यांच्या संगीत प्रतिभेची ओळख. लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम जाण असणारा एक गुणी संगीतकार म्हणून इलया राजाने जगभर नाव कमावले आहे. विविध भाषांचा अडथळा पार करत, त्या भाषेतील गाणी आपल्या संगीताने सजविणारा आणि ती गाणी सर्वसामान्यांच्या ओठी रुळवणारा एक अवलिया संगीतकार आहे, इलया राजा. भारतीय लोकसंगीत अन् वेस्टर्न म्युझिक यांचे अफलातून ‘फ्यूजन’ साधत राजाने अनेक गाणी अविस्मणीय केली आहेत.
लंडन येथील ट्रिनिटी म्युझिक कॉलेजचे क्लासिक गिटार वादनाचे सुवर्णपदक राजाने अगदी लीलया मिळवले. तामिळनाडूतील पन्हाईपुरम या खेड्यात जन्मलेल्या इलया राजा यांना संगीताचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळाले. तामिळ लोकगीतांची शिदोरी आईकडूनच त्यांना मिळाली. भावाच्या फिरत्या मेळ्यात राजाने लहानपणापासून सहभाग नोंदवला. हा मेळा दक्षिण भारतातील गावागावांत फिरून लोकांचे मनोरंजन करायचा. यातूनच गीत-संगीतावरची त्यांची पकड मजबूत झाली. गाावागावांतील या संगीताचा चपखल वापर राजाने आपले संगीत श्रवणीय करण्यासाठी खुबीने केला. धनराज मास्टर यांच्याकडेही त्यांनी गीत-संगीताचे धडे गिरवले. आपल्या संगीत-मेळ्याच्या माध्यमातून ग्रामीण दक्षिण भारतातील रसिकांची मने जिंकणाºया इलयाला रूपेरी पडद्यावर संधी मिळाली नसती तरच नवल. तामिळ भाषेतील ‘अण्णाकिली’हा इलयाच्या संगीताने नटलेला पहिला चित्रपट. त्यानंतर राजाची कारकीर्द बहरत गेली, ती त्यांच्या अभिजात संगीत शैलीमुळे. उत्तम गिटारवादक असलेल्या इलया राजाने अनेक वाद्यांचा आपल्या रचनेत पुरेपूर आणि समर्पक वापर केला आहे. वीणा, बासरी, नादस्वरम, ढोलकी, मृदंग आणि तबला या पारंपरिक वाद्यांचा इलयाने खुबीने वापर केला. त्याच चपखलतेने इलयाने इलेक्टॉनिक वाद्यांच्या वापराने आपण काय किमया साधू शकतो हे दाखवून दिले. सिंथेसायजर, इलेक्ट्रिक गिटार,कि -बोर्डस, ड्रम मशीन्स, रिदम बॉक्सेस यांच्या श्रवणीय सुरांनी इलायाने अनेक गाणी खुलवली. जगातील अनेक शैलींचा इलयाच्या गाण्यातील मिलाप निव्वळ थक्क करणारा आहे. आक्रो-ट्रायबल, बोस्सा नोव्हा, डिस्को, फंक, इंडियन क्लासिक, भारतीय लोकसंगीत, जॅझ, पॉप आणि रॉक अँड रोल आदी विविध शैलीने नटलेली इलयाची गाणी ऐकणे हा अनुभव आनंददायी आहे.
इलयाच्या संगीताने सजलेले ‘थलपती फोर्थ’मधले ‘रक्कम्मा कैया थट्टू’ हे गाणे बीबीसीने निवड केलेल्या जगभरातील टॉप टेन गाण्यात वरच्या क्रमांकावर आहे. यावरून इलयाच्या संगीत प्रतिभेची महती लक्षात यावी. उगाच नाही इलयला उत्कृष्ट संगीतासाठी तीन वेळा राष्ट्रीय
पुरस्कार मिळाला. एवढेच नव्हे तर इलया उत्कृष्ट गीतकारही आहे! तामिळमध्ये अनेक गाणी त्यांनी लिहिली आहेत.
चित्रपटात पार्श्वसंगीताचे महत्त्व ओळखणारा आर.डी.बर्मननंतरचा इलया हा दुसरा संगीतकार. उत्कृष्ट पार्श्वसंगीताने चित्रपटातील एखाद्या दृश्याचे सोने करणारा इलया, हा म्हणूनच अधिक लोकप्रिय आहे. केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटातील त्याची गाणी लोकप्रिय आहेत सदमा, अप्पुराजा, शिवा, महादेव, अंजली, हे राम, लज्जा, चिनी कम, पा अशा अनेक हिंदी चित्रपटांना इलयाच्या संगीताने चार चाँद लावेले. लंडन फिलहार्मोनिक आॅर्केस्ट्रासाठी संगीतकार आहे. 20 वर्षाची कारकीर्द आहे.