आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियातील भारताभ्यास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियामध्ये ‘इंडॉलॉजी’ म्हणजेच ‘भारताभ्यास’ या विषयाकडे विशेष आत्मीयतेने बघितले जाते. रशियात भारताभ्यासाचे पहिले केंद्र सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात सुरू झाले. नंतर त्याचे रूपांतर आशियाविषयक केंद्रात झाले.या केंद्रात संस्कृत, तामिळ आणि इतर भारतीय भाषांमधील सुमारे 600 हस्तलिखिते उपलब्ध आहेत. ही हस्तलिखिते काही अन्य युरोपीय राष्ट्रांमधून तर काही भारताला भेट देणार्‍या रशियन प्रवाशांकडून अशा विविध मार्गांनी गोळा करण्यात आली आहेत. भारताभ्यासाचा ऊहापोह करणारी केंद्रे अजूनही सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को या शहरांतच आहेत. 1818 मध्ये स्थापन झालेल्या मॉस्कोतील इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज या केंद्रातील भारताभ्यास विभागात अद्यापही अनेक विद्वान कार्यरत आहेत. तसेच मॉस्को विद्यापीठांतर्गत येणार्‍या ‘इन्स्टिट्यूट ऑफ एशियन अँड आफ्रिकन कंट्रीज’ या केंद्रातही मोठ्या प्रमाणात भारताभ्यास चालतो.

रशियातील आधुनिक इंडॉलॉजीचा जनक म्हणून गिरासिमोन लेबेदेव याचे नाव घ्यावे लागेल. लेबेदेव (1759-1818) हा अत्यंत निष्णात संगीतकार होता. तो सर्वप्रथम 1789मध्ये मद्रासला (आताचे चेन्नई) आला आणि दोन वर्षांत त्याने कोलकात्याला स्थलांतर केले. तेथे संगीताच्या मैफली आणि शिकवण्या करून त्याने उपजीविका केली. संस्कृत, बंगाली तसेच हिंदी भाषांचे शिक्षण घेतले. त्याने अनेक भारतीय विद्वानांशी दोस्ती केली आणि भारतातील पहिले युरोपीय पद्धतीचे नाट्यगृह स्थापन केले. परंतु लेबेदेवचा वाढता प्रभाव पाहून तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्याची भारतातून हकालपट्टी केली. लेबेदेव हा रशियाला परत गेला अणि गेल्यागेल्याच त्याला रशियाच्या परराष्ट्र खात्यात नोकरी मिळाली. या नोकरीदरम्यान त्याने रशियात देवनागरी आणि बंगाली भाषांचा छापखाना सुरू केला. याच सुमारास त्याचे ‘पूर्वेकडील ब्राह्मणांच्या चालीरीती, पवित्र प्रथा आणि परंपरा यांचे नि:पक्ष वर्णन’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले.

रशियातील आधुनिक इंडॉलॉजीचे हे पहिले पुस्तक होते. भारताकडे पाहण्याचा सहानुभूतीचा दृष्टिकोन बाळगणार्‍या हॉलवेल, रॉबर्टसन, जोन्स किंवा डोव्ह यांच्यासारख्या तत्कालीन भारताभ्यासींना हे पुस्तक अतिशय जवळचे वाटले. या पुस्तकात लेबेदेव याने केवळ तत्कालीन भारतीय विद्वानांची किंवा कालिदासासारख्या ख्यातनाम प्राचीन विद्वानांचीच स्तुती केली नव्हती, तर तत्कालीन भारतीय समाज गतिमान, विकसित अर्थव्यवस्था असलेला, लवचीक समाजजीवनाचा आणि उच्च संस्कृती व नीतिमत्ता असलेला असल्याचे म्हटले होते. तसेच तत्कालीन भारतातील शहरांत आणि खेड्यांतही शिक्षणाचा उच्च दर्जा असल्याचेही म्हटले होते. लेबेदेव याने चितारलेले चित्र अन्य काही पाश्चात्त्य प्राच्याभ्यासींप्रमाणे काळेकुट्ट आणि निराशाजनक नव्हते. त्या वेळी भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिश राजवटीचे त्याने ‘भारताबाबत घडलेली शोकांतिका’ असे वर्णन केले होते. एकोणिसाव्या शतकात रशियन जनतेने ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेल्या भारताविषयी बर्‍याच प्रमाणात सहानुभूती दाखवली होती. रशियातील बौद्ध आणि जैन धर्माचा अभ्यासक पी. आय. मिनाचेव (1840-1890) याने भारताचा प्रवास करून आल्यावर भारतातील ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या राजेशाही राहणीवर टीका केली होती. लेबदेवनंतरच्या रशियन भारताभ्यासींमध्ये कोसोविक, मिनायेव, ओल्डेनबर्ग आणि शेर्बात्स्की यांचा समावेश होतो. इ. स. 1901 मध्ये ताश्कंद येथील विशेषत: लष्करी लोकांकरिता हिंदुस्थानी भाषांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेमधून पदवी धारण केलेल्या लेफ्टनंट कर्नल आय. सेरेब्य्राष्टिकोव याला पाच महिन्यांसाठी सरावाकरिता भारतात पाठवण्यात आले होते.

भारताच्या अनेक संस्कृत ग्रंथांचीही रशियन भाषेत भाषांतरे झाली आहेत. ही भाषांतरे प्रामुख्याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. पंचतंत्र आणि हितोपदेश यामधील गोष्टींचा अनुवाद 1788 मध्ये झाला. याच सुमारास श्रीमद्भगवद्गीतेचाही अनुवाद झाला, तर शाकुंतलचा अनुवाद 1792 मध्ये झाला. पण ही भाषांतरे मूळ संस्कृत भाषेतून करण्यात आली नव्हती. त्या वेळी उपलब्ध असलेल्या इंग्रजी अगर अन्य भाषेतील भाषांतरांवरून हे अनुवाद करण्यात आले होते. मूळ संस्कृत ग्रंथांवरून प्राचीन भारतीय ग्रंथांचे अनुवाद करण्याचे काम 1840 नंतरच सुरू झाले. थेट संस्कृत भाषेतून रशियन भाषेत अनुवादित झालेल्या ग्रंथांमध्ये संस्कृत पंडित प्रा. योलिकाझारे कोवा यांचे ऋग्वेदाचे संपूर्ण भाषांतर, संस्कृत विद्वान के. ए. कोस्सोविचा(1815-1883) यांची सोमदेवाच्या ‘कथासागरा’तील भाषांतरे, तसेच ए. पी. बारान्निकोव व आय. डी. सेरेब्य्राकोव 1917-1998 यांच्या भर्तृहरीचे ‘शतकत्रयम्’ यांचा समावेश होतो.

रशियात पाली, प्राकृत आणि तामिळ भाषेचाही मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यात आला आहे. तसेच गेल्या काही वर्षांत हिंदी, मराठी आणि उर्दू भाषांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

डॉ. इरिना ग्लुश्कोवा या मराठी भाषेच्या विद्वान असून त्यांचा संत तुकाराम व संत रामदास यांचा विशेष अभ्यास आहे. ए. पी. बारान्निकोव यांनी तुलसीदासाच्या ‘रामचरितमानसा’चा रशियन भाषेत अनुवाद केला आहे. रशियाने भारताच्या केवळ इतिहासाचाच अभ्यास केला आहे असे नाही, तर भारतातील अलीकडच्या राजकीय प्रवाहांचाही रशियात अभ्यास सुरू आहे. कै. डॉ. ए. डी. लिटमन यांनी संपादित केलेल्या आणि डॉ. इरिना ग्लुश्कोवा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘हिंदुत्वाचा वृक्ष’ या पुस्तकाची रशियन भाषेतील आवृत्तीही बाजारात उपलब्ध आहे. दरम्यान, रशियातील भारताभ्यासाचा वृक्षही यापुढील काळात असाच बहरेल, अशी आशा आहे.