आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाणिवेच्या मर्यादित परिघात माणुसकीला आव्हान देणाऱ्या घटना घडतच राहतात, तेव्हा नकारात्मकतेच्या अतिरेकाला उत्तर म्हणून जाणिवा बोथट करणारा सकारात्मकतेचा आभासी अट्टाहास नाही धरता येतं. कारण घडलेली घटना संवेदनशील माणसाला मुळांसकट हादरवणारी असते. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातल्या रामटेकमध्ये घडली.वैकुंठ चतुर्दशीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची (विभागीय आयुक्त कार्यालयाच्या  ताज्या आकडेवारीनुसार सरत्या वर्षात मराठवाड्यात ८१४ तर विदर्भात ११३३ आत्महत्या झाल्या). व्यथा मांडण्यासाठी  एक देखावा उभा करण्यात आला. त्यात मनोज धुर्वे नावाचा स्थानिक नट फास लावलेल्या शेतकऱ्याचा रुपात सामील झाला. पण वाहन पुढे जाताना एका क्षणी झटका बसला आणि दोर धुर्वेच्या गळ्याभोवती घट्ट आवळला गेला. तो तडफडू लागला. आणि एका क्षणी त्याची तडफड थांबली. बघ्यांना वाटले, हा अभिनय करतोय... पण प्रत्यक्षात तो मरण पावला होता. बराच वेळ लोक मात्र त्या सगळ्या प्रकाराकडे अभिनय म्हणून पाहात होते. शोकांतिकेची ती एक शोकांतिका ठरली होती... या हेलावून टाकणाऱ्या घटनेवर भाष्य करणारी ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांची ही विशेष दीर्घ कविता... गद्य आणि पद्याची लय सांभाळत मनाला भिडणारी...


लोक वास्तवाकडं लक्ष देत नाहीत
लोकांना सोंग-ढोंग फार आवडतं
म्हणून त्यानं शेतकऱ्यांच्या 
आत्महत्येकडं लक्ष वेधण्यासाठी 
आत्महत्येचा देखावा केला 
आणि लोक त्याला दाद देऊ लागले
दाद ऐकून तोही भारावला
नकली फास कधी खरा झाला
त्याच्या लक्षातही आलं नाही
फास गळा घोटू लागला
तसतसा तो जास्तच केविलवाणा झाला
काय जिवंत सोंग वठवतोय म्हणून
लोक टाळ्या वाजवत चित््कारत राहिले
लोकांच्या लक्षात येईपर्यंत
सोंगाचं पार सोंग होवून गेलेलं होतं.


नवं आहे तोपर्यंत
बुजगावण्याला घाबरतात पाखरं
मग त्याच्या डोक्यावर बसायला लागतात
आणि बुजगावणं केविलवाणं होत जातं
तसं झालं शिवारातल्या आत्महत्यांचं
आत्महत्यांचं बुजगावणं झाल्यावर
जगण्याचं काय व्हायचं शिल्लक राहतं?
तेच झालंय जगण्याचं
अंगाखांद्यावर बसू लागलीत गिधाडं
लचके नाही तोडले
तर मग ती गिधाडं कसली?


हा टापू गिधाडांचा नव्हता
आत्महत्यांचं सोंग
गिधाडांनाही खरं वाटलं
आणि त्यांनी या टापूची निवड केली
लई चिवट असतात गिधाडं
ती आता सोंगालाही
आत्महत्या करायला भाग पाडतील
नाही तर जिवंत लुचायला
सुरुवात करतील
गिधाडांची सावलीच 
पडू द्यायला नव्हती पाहिजे शिवारावर
आपणच चिमण्या मारून 
उलट्या लटकावल्या शिवारात
चिमण्यांचे थवे शिवाराकडं फिरकू नयेत म्हणून
चिमण्या न फिरकण्यासाठी 
केलेली व्यवस्थाच
देत असते निमंत्रण गिधाडांना
एकदा का शिरली शिवारात गिधाडं
की मग करता येत नसते तक्रार
तुम्हाला कुणी निमंत्रण दिलं होतं म्हणून
गिधाडांना निमंत्रण द्यावं लागत नसतं
जनावर न मरण्याची
दक्षता घ्यावी लागत असते
काटेकोर काळजी करून
मग फिरकत नाहीत गिधाडं तुमच्या टापूत 


कावळ्याच्या शापानं 
गाई मरत नसल्या तरी
कावळ्यांना अवगत असते विद्या
माणसाच्या मनात 
अवदसा भरवण्याची
एकदा भरली अवदसा
माणसाच्या मनात
की मग कावळ्यांना
द्यावाच लागत नाही शाप
आपोआपच मरून पडतात गाई
कावळ्यांच्या ताटात 
आणि समोरचं ताट दूर सारायला
कावळे काय अवदसेचे भाऊ आहेत?


आपणच दिल्या शिवाराच्या चाव्या
कमरेच्या काढून चोरांच्या हातात
आणि आता करतो आहोत हाकाटी
रानात चोर शिरल्याची
कुणी सांगितलं होतं तुम्हाला
उकिरडे बुजवायला
कुणी सांगितलं होतं तुम्हाला
शेण गोळा करण्याऐवजी शेण खायला
कुणी सांगितलं होतं तुम्हाला
दुधाला ईरजन लावण्याऐवजी
दूध नासवायला?
कुणी सांगितलं होतं तुम्हाला 
रानचा वसा बीमोड करायला
कुणी सांगितलं होतं तुम्हाला
विकतचं विष रानात पसरायला


माहीत आहे मला
तुम्हाला हे सगळं कुणी सांगितलं ते
माहीत आहे मला
तुम्हाला आंधळं-पांगळं कुणी केलं ते
त्यांना फक्त तुम्हाला ग्राहक 
बनवायचं होतं
त्यांना फक्त तुम्हाला आजारी
बनवायचं होतं
त्यांना फक्त तुम्हाला 
जायबंदी करायचं होतं
पण घाव वर्मी लागत गेला
आणि सारंच संपलं
आता ते काय तुमच्या
प्रेतावर राज्य करणार?
झालं का नाही
तुला नं मला घाल कुत्र्याला?
त्यांना समजलं नाही
किती तोडावा लचका
तुम्हाला समजलं नाही
किती मारावा हिसका
दोघांचेही अंदाज चुकले
आणि शिवारात नको तेच पिकले
आता ना धड टाळता येत 
ना पाळता येत
म्हणून जळत चाललंय सगळंच
अशीच लटकवली होती प्रेतं
इतिहासात एकेकाळी आक्रमकांनी
आक्रमकांना विरोध करणाऱ्यांना 
दहशत बसवण्यासाठी
आज हे कोणतं आक्रमण आहे
लटकताहेत प्रेतं आपोआप झाडाला
हा कोणता गनिमी कावा शत्रूचा
की बूड न हलवता होताहेत
सगळी कामं तमाम
जागतिकीकरणाचा सोडलाय वारू
तो करत चाललाय सर
पृथ्वीचा टापू कोपरा न कोपरा
त्याला अडवायला कोणीच
जिवंत नाहीत लवकुश
अशी झाडाला लटकून घेताहेत स्वत:लाच
भविष्य सरळच दिसताहे
रामायणाचा समारोप
महाभारतासारखा होणार नक्की
बेचिराख करून पृथ्वी
रोवील आपला झेंडा जागतिकीकरण
मरण स्वस्त होईल जगणं महाग
हेंडगा फिरेल शिवारातून 
दिवसाढवळ्या
खांडव वन होऊन जाईल देशाचं


गल्लीत कशाला करताय
माझ्या मरणाचा देखावा
चलाना दिल्लीतच करूयात 
शोभा माझ्या मरणाची
सजवूयात स्वातंत्र्यदिनाच्या शोभायात्रेत
माझ्या मरणाचा चित्ररथ
आणि तुम्ही कशाला करताय
कलावंतानो माझ्या मरणाची भूमिका
मीच येतो ना माझ्या मरणाचं
प्रात्यक्षिक करायला
शिवारापासून दिल्ली दरबारापर्यंत
रांग लावतो उत्सुक शेतकऱ्यांची
मरू इच्छिणाऱ्यांची कमी नाही
देवदयेनं आणि तुमच्याही कृपेनं
पुष्कळ जण अजून मरणाला तयार आहेत
देशाच्या कानाकोपऱ्यांतून
काढुयात चित्ररथ
स्थानिक गणवेशात सजलेल्या 
प्रातिनिधिक शेतकऱ्यांचे 
आणि किती विविध देखावे मरणाचे
कुणाला फाशी घ्यायला सांगू
कुणाला विषारी औषध प्यायला लावू
कुणाला इलेक्ट्रिकच्या तारा गुंडाळायला सांगू
कुणाला विहिरीत उडी घ्यायला सांगू
कुणाला जिवंत चितेवर जळायला सांगू
किती रोमँटिक असेल तो चित्ररथ
किती विविध देखावे माझ्या मरणाचे
असे चित्ररथ आणि अशी शोभायात्रा
आणि असा स्वातंत्र्य दिन
कधीच पाहिलेला नसेल देशाने


शेतकऱ्यांनी संप केला काय
अन््  मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेवून
ज्ञानेश्वर साळवेनं 
घेतली संजीवन समाधी 
तरी व्यवस्थेचे डोळे
थो़डेच उघडणार आहेत
ती तर डोळ्यांना शिळा लावून 
आधीच चिरनिद्रिस्त झाली आहे
ना त्याच्या वर उगवणार आहे
अजान वृक्ष
ना त्याच्या साठी निघणार आहेत
दिंड्या-पालख्या
ज्या मड्यावर कुणी रडणार नाही
आणि जे बलिदान व्यर्थच जाणार आहे
त्या जीवानं विचार बदलायला हवा
मेल्यानंतरच्या स्वर्गाची 
कुणालाच खात्री नसताना
जीवंतपणी भोगल्या व्यथा-वेदना ज्यांनी
त्यांनी एकदा जगून पहावं
आपण मेल्यानंतरच्या आप्तांच्या
मरणयातनांसाठी
पाठी ठेवून दु:खाच्या राशी
जाण्यापेक्षा रहावं इथंच
रानामाळातल्या सुखाचा सरवा वेचित


- इंद्रजित भालेराव
inbhalerao@gmail.com
लेखक संपर्क : ०२४५२ २२५ ५८५