आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indu Sarangal Article About Police Officer's Wife

काळजी हा आयुष्‍याचा अविभाज्य भाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी सरंगलांची बदली जळगावला होती. तिथे असताना, त्यांना काही दहशतवाद्यांना पकडण्याच्या ऑर्डर्स होत्या. जवळ जवळ ६ दिवस यांचा काही पत्ता नाही. तेव्हा मोबाइलही नव्हते. संपर्क करायचा तरी कसा? मुलं लहान होती. नेमकं त्याच काळात मुलांना घेऊन दिल्लीला जायची वेळ आली. सरंगल इथे नसताना मुलांना घेऊन केलेला तो प्रवास आजही माझ्या अंगावर काटा आणतो. अशा अनेक वेळा आल्या जेव्हा मला स्वतःला सावरणे अवघड झाले होते. पण पोलिसाची बायको म्हटलं, की आपण धोक्यांशीच लग्न केलेलं असतं.

माझे वडील आयएएस होते, त्यामुळे या बदल्या आणि सतत बदलणा-या वातावरणाची मला सवय आहे. या बदलांचा फारसा परिणाम होत नाही आयुष्यावर. सतत बदलणारी परिस्थिती सगळ्या वातावरणांत राहण्याची सवय लावते. यांच्या आयुष्यात येणा-या प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी नेहमी करते, ती म्हणजे त्यांच्यापासून घरातल्या सगळ्या किरकिरी, तक्रारी दूर ठेवते. घराची सगळी जबाबदारी माझी असते. हे सुखरूप आहेत एवढं कळालं, की पुढे दिवस सहज जातो. मुलांना या सगळ्या घडामोडींपासून आम्ही शक्यतो दूर ठेवतो. त्यांचे आयुष्य आमच्यापेक्षा वेगळे आहे, त्यात तणाव नको हा त्यामागचा उद्देश.
आमच्या लग्नाला २३ वर्षं झालीत. तेव्हापासून या लाइफस्टाइलची सवय आहे. मी कधी फारसा ताण घेत नाही, म्हणजे रोजच्या आयुष्यावर या सगळ्या गोष्टींचा होणारा सखोल परिणाम रोखता येतो.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी सातत्याने टीव्हीवर येणा-या बातम्या पाहत असते, वृत्तपत्र वाचत असते. त्यामुळे मला सतत माहीत असतं कुठे काय काम चालू आहे, आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत. आजपर्यंत सगळ्यात जास्त असुरक्षित भावना निर्माण झाली ती, फक्त मुलांच्या बाबतीत. यांनी अनेक अट्टल गुन्हेगारांना पकडले आहे. या गुन्हेगारांची किती तरी माणसं बाहेर फिरत असतात. त्यांनी आपल्या मुलांना काही नुकसान नको करायला, ही भीती नेहमी मनात असते. पण पोलिस अधिका-याची बायको असणं, त्यातही आयुक्ताची बायको असणं सोपं नाही. आपल्याला माहीत असतं आपण धोके पत्करले आहेत, पण या धोक्यांना बाजूला ठेवून घर आणि मुलांकडे सारखे लक्ष द्यायचे असते. प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट मला करावी लागते, ती म्हणजे इतर पोलिस कर्मचा-यांच्या पत्नींना भेटणे, त्यांचे मनोधैर्य वाढवणे. अनुभवाने आम्ही मोठ्या असतो, पदानेही सरंगल मोठे आहेत. त्यामुळे माझीही जबाबदारी वाढते. आपण सगळ्यांसाठी रोल मॉडेल आहोत हे सातत्याने लक्षात ठेवावे लागते. गणेशोत्सव, दांडिया यांसारख्या सणांना आम्ही सगळ्याजणी नेहमी भेटतो, त्यामुळे सगळ्यांमध्ये एक वेगळं नातं तयार झालं आहे.

बायकांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही तत्परतेने करतो, ते म्हणजे घर सांभाळण्याचं. शीण, भीती, ताण-तणाव या गोष्टी तर आयुष्याचा भाग आहेत, अगदी अविभाज्य अशा. आता त्यांच्यासोबत जगण्याचा ध्यास घेतल्यासारखा वाटतो. (शब्दांकन - सई कावळे, नाशिक)