आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंद माफीच्या देव-घेवीतला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी शिक्षिका. दुसरं मला काहीच व्हायचं नव्हतं. औरंगाबादच्या सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये तब्बल ३५ वर्षं सेवा केली. तेव्हाचाच प्रसंग आहे. अगदी सुरुवातीचा. संसारात पडून पाचेक वर्षं झाली होती. शाळा, घर, दोन मुली, पै-पाहुणा... हे सर्व करताना खूप ओढाताण होत होती. शेवटी सकाळ हायस्कूल विभाग बदलून दुपारच्या प्राथमिक विभागात बदली करून घेतली. दुपारी यायचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे, या विभागातील दहा-बारा स्त्री शिक्षिका माझ्याशी खूपच आपुलकीने वागत. या सगळ्यांत सुशील अभ्यंकर आमच्या सर्वांत वयानं-अनुभवानं एकदम समृद्ध. त्यांच्याबद्दल मला एक आदरयुक्त भीती. मला एखादा पिरिअड ऑफ असेल तेव्हा त्यांच्या वर्गात, त्या शिकवत असताना मी जाऊन बसायची. थोडक्यात कसे शिकवावे, फळ्याचा उपयोग केव्हा व कसा करायचा, वर्ग नियंत्रण इत्यादीचे मार्गदर्शन त्यांच्याकडूनच मला मिळायचे. एकदा मीटिंगची नोटीस शिपायाबरोबर आली. सभागृहात हळूहळू सर्व जण येऊन बसू लागले... आमच्यापैकी काही जणी यायच्या राहिल्या होत्या. तर आम्ही काही जणी आधीच येऊन बसलो होतो.

सुशील अभ्यंकर बाईंच्या डाव्या खांद्याला कायम पर्स आणि उजव्या हातात कापडाच्या मोठ्या पिशवीत वह्या असायच्या, घरी नेऊन तपासण्यासाठी. उंचपुर्‍या, केसाचा मोठा अंबाडा व नऊवारी लुगड्यात. त्या फक्त नऊवारी, रंगीत बारीक डिझाईनची लुगडी नेसत. आम्ही सार्‍या सहावारीत, त्यामुळं सर्वांपेक्षा त्या निराळ्याच आणि चटकन उठून दिसत. त्या मीटिंगच्या वर्गात आल्या. त्यांच्यासोबत मीता ही जवळपास माझ्याच वयाची शिक्षिकाही होती. त्या दोघी जणी सभागृहात आल्या. पर्यवेक्षक आणि पुरुष शिक्षक अजून यायचे होते.

...माझ्या उजव्या बाजूला दोन-चार खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यातील दोन खुर्च्यांत त्या दोघी बसतील. अगदी माझ्या जवळच्या खुर्चीत मीता. कारण ती अलीकडे नि अभ्यंकर बाई पलीकडे होत्या... माझ्या डोक्यात क्षणात आलं की, आपण हिची म्हणजे, मीताची फजिती करू या... आणि ती खुर्चीत बसणार की मी पटकन खुर्ची काढून घेतली... आणि काय सांगू...? काही कळायच्या आतच अभ्यंकरबाई धाडकन् खाली आणि खुर्ची मागं... माझ्या हातात. बापरे, हे असं कसं झालं? बाई अलीकडे कशा आल्या? त्यांचा राग... दुःख... अपमान... आजही माझ्यासमोर जसाच्या तसा दिसतोय. आणि मी मेल्याहून मेल्यासारखी... काय... कसं... झालं? काय करावं, क्षणभर मलाही सुचलं नाही. मी रडकुंडीला आलेली... वाटलं, बाईंनी मला फाडफाड मारावं. पण बाई एका शब्दानंही मला बोलल्या नाहीत; पण त्यांचा झालेला अपमान माझ्या जिव्हारी लागला. माझ्या आईच्याच वयाच्या बाईंचा मी अपमान केला होता. किती लागलं असेल त्यांना.

चांगल्या सणकून आपटल्या. कंबरेचं, हातापायाचं हाड मोडलं असतं तर...? किती मूर्खासारखी वागले मी? खरंच बाई, तेव्हा मला तुमची गंमत करायची नव्हती. मला मीताची गंमत करायची होती; पण ती गंमत राहिली नव्हती, फजिती झाली होती. पण बाई खरंच, मला मुळीच कल्पना नव्हती की, तुम्ही अचानक पलीकडून अलीकडच्या खुर्चीकडे याल म्हणून... खरं तर तेव्हाच मी तुमची क्षमा मागायची... तुमचे पाय धरून माफी मागायची... असं ठरवलं होतं. पण झाल्या प्रकारानं मी इतकी गोंधळून-बावरून गेले होते की, त्या क्षणी मला काहीच सुचलं नाही. बाकीच्या सर्व शिक्षिका मला खूप बोलल्या. खूप रागवल्या. त्या दिवशी रात्रभर झोप नाही. घरी आल्यावर रात्री घडलेला प्रसंग नवर्‍याला म्हणजे महावीर जोंधळे यांना सांगितला. ते म्हणाले, ‘तू उद्या अगोदर त्यांची माफी माग...’ माफी तर तेव्हाच मागायला हवी होती मी. आता खूप उशीर झाला होता. माफी मागूनही त्यांना समाधान मिळालं असतं की नाही, मला माहीत नाही. शेवटी माफी मागायची राहूनच गेली. ही अपराधी भावना मात्र आजन्म सलत राहील.

मी तेव्हा माफी मागायला हवी होती, असं आज मला जाणवतंय. माफी मागण्यासाठी धाडस लागतं, ते धाडस मी तेव्हा दाखवलं नाही. मात्र माझ्या विद्यार्थ्यांनी ते अनेक वेळा दाखवलं आहे. ३५ वर्षांच्या या काळात असे अनेक प्रसंग आले. त्यातला एक मात्र माझ्या लक्षात राहिला आहे. माझ्या वर्गातला एक विद्यार्थी रोज उशिरा यायचा. त्याचे वडील अपंग होते. आपल्या मुलानं शिकावं, असं त्यांना वाटायचं. पण तो विद्यार्थी मात्र जरासा वांड होता. मी त्याला अनेकदा बजावलं होतं की, वेळेवर ये, अभ्यास कर... पण त्याच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. पुन्हा तो उशिरा आला तेव्हा मी त्याला खूप मारलं. वर्गाबाहेर हाकलून दिलं. मात्र मी खूप अस्वस्थ झाले. कारण, पहिल्यांदा मी कुणा विद्यार्थ्याला इतकं मारलं होतं. हे मारणं माझं पहिलं अणि शेवटचंच. मी त्या अस्वस्थतेतच घरी गेले. घरी गेल्यानंतर जरा वेळानं तो विद्यार्थी थेट माझ्या घरी आला आणि त्यानं माझे पायच धरले. माफी मागितली. मी त्याला उठवलं, जवळ घेतलं आणि यापुढं असं वागणार नाही अशी शपथ घे, असं सांगितलं. त्यानंतर तो एकदाही उशिरा आला नाही.

अभ्यासही करायला लागला. त्याला दहावीला चांगले गुण मिळाले. पुढं नंतर तो काय शिकला माहीत नाही; पण त्यानंतर तो त्याच्या परीनं वळणाला लागला. मी त्याला इतकं मारूनही त्यानं माफी मागण्याचं धाडस केलं, असं माफी मागण्याचं धाडस मीही करू शकले नव्हते. माफी मागूनही जेव्हा माफी मिळत नाही, तेव्हा माणसं अ‍ॅग्रेसिव्ह होतात. विध्वंसक होतात. टोकाला जातात. दबून दबून राहतात. माफी न मिळाल्याचे हे दुष्परिणाम रिमांड होममधल्या मुलांबाबत मी जवळून पाहिले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की, चूक कबूल करणार्‍याचा सन्मान ठेवायला हवा. माफी मागायला येणार्‍याचाच आपण पुन्हा अपमान केला तर हे काही बरं नाही. माफी मागणारा हा समोरचा आपलं किमान ऐकून घेईल, या भावनेनं येत असतो. त्यानं ती पात्रता आपल्याला बहाल केलेली असते. त्यामुळेच माफी मागणार्‍यापेक्षा क्षमा करणारा मोठा ठरतो. मोठं ठरण्याचा इथं प्रश्न नाही; पण एखाद्याला माफ केल्यानं आपल्याही मनात समाधान साठतं. आनंद साठतो. तो आनंद आपणही घ्यावा. आणि आपण एखाद्याला माफ केलं तर त्याचं माफी मागणं कारणी लागलं, याचा आनंद माफी मागायला आलेल्यालाही घेऊ द्यावा. माफीची ही देव-घेव करण्यात आनंद असतो. यामुळं दोघंही विकसित होतात, यावर माझा विश्वास आहे.

इंदुमती जोंधळे
indumati.jondhale@gmail.com
बातम्या आणखी आहेत...