आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघे पाऊणशे वयमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात दहा कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे ६० वर्षांहून अधिक वय असलेले. यातल्या सगळ्यांची प्रकृती नाजूक असते, वा आर्थिक परिस्थिती हलाखीची असतेच असं नाही. हे जे हाताशी भरपूर वेळ असलेले नागरिक आहेत, ते  सर्वसाधारणपणे टीव्ही पाहात, पेपर वाचत, पोथ्या वाचत, समवयस्कांशी गप्पा मारत, घरातल्यांवर टीकाटिप्पणी करत, पैसा गाठीला असेल तर प्रवास करत दिवस घालवतात. आयुष्य कष्टात काढलं, आता आराम करू, असाही विचार त्यामागे असू शकतो, त्याबद्दल आक्षेपही नाही. परंतु, अनेकदा असं जाणवतं की, अशा व्यक्ती दिशाहीन आयुष्य जगत असतात. यापलिकडेही एक जग आहे जिथे आपली बुद्धी, कौशल्य, अनुभव, वेळ, किंवा अगदी संपत्तीही, उपयोगात येऊ शकतात, याची जाणीव फार कमी व्यक्तींना असते, असं दिसतं. काहींना वाटत असतं की, काहीतरी करायला हवं असं, पण काय करावं कळत नसतं. पण, यालाही अपवाद आहेतच. ‘अवघे पाऊणशे वयमान,  अजून करायचेय खूप काम,’ हेच अनेकांच्या जीवनाचं मार्गदर्शक तत्त्व असतं. अशा काही पाऊणशे वयोमान गाठलेल्या, तरीही चाळिशीतल्या उत्साहाने व दमाने काम करणाऱ्या काहीजणी आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं काम गेली अनेक वर्षं आपण पाहातोय, त्यांच्याबद्दल वाचतोय. पण अजूनही त्या थकलेल्या नाहीत. त्यांच्या शब्दकोषात निवृत्ती हा शब्दच नाही. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं, तरुण पिढीशी संवाद ठेवणं, वाचत राहाणं, लिहीत राहाणं, नवनवीन माणसांना भेटणं हा त्यांच्या सत्तरीनंतरच्या आयुष्याचाही अविभाज्य भाग आहे, त्यामुळेच कदाचित त्या अजूनही फिट आहेत, पुढच्या काही वर्षांचं कामाचं नियोजन त्यांनी केलंय. वैद्यकशास्त्रही असं सांगतं की, जितका आपला मेंदू कार्यरत ठेवू, जितकं शरीर वापरात ठेवू तितकं म्हातारपण आरोग्यदायी व आनंदाचं जातं. या आजच्या वर्षपूर्ती विशेषांकाच्या मानकऱ्यांकडे पाहून याचा स्पष्ट पडताळा येईल.
बातम्या आणखी आहेत...