आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्रनाथ टागोर: विश्वकवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टागोरांच्या मनात विश्वास आणि आशा यांना निरंतर स्थान होतं. पण त्याच वेळी बुद्धीची भाषा ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे, सत्याचा पथ कधीही सोडता कामा नये, असंही टागोर म्हणत. ७ मे या टागोरांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीच्या अनुषंगानं, त्यांचं काव्यलेखन आणि जीवनदृष्टी विशद करणारी आजची कव्हर स्टोरी...

७ मे १८६१ हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस. आजही जगभर जनमानसात त्यांच्याबद्दल प्रचंड आदरभाव आहे. त्यांनी निर्माण केलेल्या शांतिनिकेतन, श्रीनिकेतन, विश्वभारती विद्यापीठ यांबद्दल कौतुकभरली उत्सुकता लोकांच्या मनात आहे. ‘स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर’सारखी त्यांच्या कथांवर आधारित एपिक वाहिनीवरील मालिका लोकप्रिय आहे. 

नाटक, नृत्य, संगीत, रवींद्र संगीत, त्यांचे लेखन, त्यांची मानुषेर (माणसाचा) धर्म सांगणारी व्याख्याने, त्यांची चित्रे, त्यांच्या प्रवासी डायऱ्या या सगळ्यांबाबत विचारी, विवेकी माणसाला आजच्या काळातही मनाने नाते जोडता येते. ८० वर्षांचं समृद्ध आयुष्य जगलेल्या टागोरांनी आयुष्यात प्रचंड काम केलं तरी ते स्वत:ची ओळख करून देत ‘कवी’ म्हणून. ‘आमि कवी आमि शुधु एक्स्प्रेशन देई...’ म्हणजे मी तर कवी, फक्त अभिव्यक्ती करतो. पु. ल. देशपांडे हे टागोरांचे अभ्यासक. ते तेवढ्याचसाठी बंगाली शिकले. शांतिनिकेतनमध्ये मुक्काम करून राहिले. टागोरांविषयी ते म्हणतात, ‘आमि कवी...’ या पंक्तींतून कवीनं फक्त एक्स्प्रेशन द्यावं, उगीच भाष्य करीत बसू नये, असा सरळसोप्पा व्यावहारिक अर्थ निघतो. पण शेवटी एक्स्प्रेशन देणारं, अभिव्यक्ती करणारं हे व्यक्तिमत्त्व किती समृद्ध होतं, हे पाहायला लागल्यावर त्या ‘फक्त’ एक्स्प्रेशनला एवढं मोल का येतं, हे कळतं. 

टागोर विश्वकवी झाले कारण त्यांनी या विश्वाशी नातं जोडलं, विश्वावर प्रेम केलं. म्हणून त्यांची कविता जगात मान्यता पावली. १९१३ मध्ये त्यांच्या ‘गीतांजली’ या इंग्रजीतून अनुवादित कवितासंग्रहाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा नोबेल पुरस्कार मिळाला. टागोरांपासून त्यांचं कवीपण वेगळं काढता येत नाही. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी ‘वृष्टी पडे टापूरटुपूर’ ही लय त्यांना शब्दात गुंफता आली. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’चा बंगाली छंदोबद्ध अनुवाद केला. आणि वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत म्हणजे १९४१मध्ये मृत्यू येईपर्यंत त्यांची कविता त्यांना सोबत करत होती. त्यांचे ५५ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यातल्या कवितांची संख्या आहे २,२५२. त्याशिवाय त्यांनी रचलेली व संगीतबद्ध केलेली गाणीही दोन हजारांपेक्षा जास्त आहेत. 

‘गीतांजली’ या अफाट कवितासंग्रहात १०३ कविता आहेत. हा संग्रह सिद्ध होण्यामागे परिस्थितीनं घडवलेले योगायोग आहेत. १९१२मध्ये प्रकृतीच्या कारणाने टागोर लंडनला निघाले होते. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा आणि सून होते. सर्व सामान बोटीवर चढवलं होतं. दुसऱ्या दिवशी निघायचं तर टागोरांची तब्येत आदल्या दिवशी इतकी बिघडली की, जाणं रद्द करावं लागलं. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. सियाल्दा येथील घरात ते विश्रांतीसाठी थांबले. दुसरं काहीच करायचं नाही, म्हणून त्यांनी आपल्याच कवितांचे इंग्रजीत अनुवाद केले. त्यात मूळ बंगाली ‘गीतांजली’मधून ५३ कविता घेतल्या.  उरलेल्या ५० कविता आपल्या नैवेद्य, खेया, शिशू, कल्पना, स्मरण, चैताली या संग्रहांतून घेतल्या. अशी ही गीतांची ओंजळ, म्हणून ‘गीतांजली’. पुढे काही दिवसांनी ही मंडळी लंडनला गेली. तिथं विल्यम रोशेनस्टाइन यांच्या घरी मित्रमंडळींसाठी टागोरांच्या कवितांचे वाचन झाले. त्या मित्रमंडळींत डब्ल्यू. बी. यीट्स हे टागोरांच्या कवितेवर प्रेम करणारे कवी होते. सी एफ अॅन्ड्य्रूज होते. या मित्रमंडळींनी खाजगी वितरणासाठी म्हणून त्यांच्या या कवितांचा एक संग्रह छापून प्रसिद्ध केला. तो पुढे इतका मान्यता पावला की, त्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर झाले.

या १०३ कविता त्यांच्या सर्व कवितांमधील अत्युत्कृष्ट कविता आहेत, असे त्यांचे भक्तही म्हणत नाहीत; पण तरीही त्यातून टागोरांच्या अभिव्यक्तीची, एक्सप्रेशनची जातकुळी समजते. त्यामागचे रवींद्रनाथ कळतात. टागोरांसाठी हे जग म्हणजे एक कविता होतं. ही जगाची कविता लिहिणारा, ही अशी क्रीडा करणारा जो कुणी, त्या क्रिएटरला ते ‘मास्टर पोएट’ म्हणत होते.

आपण इथे का आहोत? तर हा जो कुणी जगाचा निर्माता आहे, त्याने जीवनाचा एक उत्सव मांडला आहे. आणि त्या उत्सवात आपल्याला आमंत्रण आहे, काहीतरी भूमिका आहे, म्हणून या जगात आपण आहोत, अशी त्यांची धारणा होती.

‘या विशाल विश्वाच्या उत्सवाचं आमंत्रण मला आलं
माझ्या आयुष्याचं सार्थक झालं...’
(गीतांजली)

या उत्सवात कसं सामील व्हायचं? तर पंचेद्रियांनी या जगाचा अनुभव घेतला पाहिजे. निर्माता नवनवीन घडवतोय. ऋतू बदलताहेत. तो स्व:ला त्यातून प्रकट करतोय. तो मास्टर पोएट जेव्हा तुम्हाला दर्शन देतो, तेव्हा तुम्ही जागरूक असलं पाहिजे. या जगावर प्रेम करणं, आनंदानं सामील होणं ही हेल्दी इन्स्टिक्ट आहे. Love of life is a healthy instinct.

त्या कवितेतील ती मुलगी ऐका काय म्हणतेय. ‘अगं आई, घाई कर ना. राजकुमार आज आपल्या दारावरून जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नीटनेटकं सजूनधजून नकोे तयार व्हायला? कदाचित त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही जाणार. पण म्हणून काय झालं? त्या उत्सवी क्षणाकरता मी स्वत:ला जास्तीत जास्त सजवीन. माझी ओढणी दूर करून डोळे भरून पाहीन. माझ्याकडे जे सर्वोत्तम आहे ते अर्पण करेन. ही माझी लाल कंठी देईन. कुणाला कळेल, नाही कळेल, तरी मला आनंद होईल मी सर्वोत्तम दिलं, मला देता आलं...’ 

याच भावनेने ते जगले. याच शुभबुद्धीने आयुष्यभर जे जे उत्तम वाटलं ते ते उरस्फुटून त्यांनी केलं आणि त्या निर्मात्याशी, त्या मास्टर पोएटशी त्यांचं नातं जुळलं. त्यांच्या आयुष्याचीच कलाकृती झाली. त्यांची कविता काय सांगत होती? जगाला काय मिळालं त्यांच्या लिखाणातून? जीवनावर असं प्रेम, जीवनात अशी सामिलकी असल्याशिवाय जीवनकला साधणार नाही.
फूल फुललं, हीच फुलाची अंतिम कथा. फुलाचं साफल्य त्याच्या विकसनात आहे.

‘फूल विचारतं, फळा तू कुठे आहेस?
फळ उत्तरतं, मी तुझ्या हृदयातच आहे.’

प्रत्येक व्यक्तीला पूर्णरूपात विकसनाची संधी देणारं वातावरण  शिक्षणव्यवस्थेत अपेक्षित होतं. सर्वांना सहजभावानं भोवती असू दे. स्वामित्वभाव गाजवून सांभाळायची गरज नाही, असं त्यांची कविता सांगत होती. परमेश्वराकडे काय किंवा कुणाकडेही, कसलीही भिक्षांदेहि करण्याचा त्यांना तिटकारा होता. स्वत:कडे काय आहे, त्याचा शोध घ्यायला हवा. 

त्यांच्या कवितेतील एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एक भिक्षेकरी नेहमीप्रमाणे झोळी घेऊन बाहेर पडतो आणि लांबवरून स्वप्नातल्यासारखा एक सुवर्णरथ येतो. त्याला एकच इच्छा, खूप भिक्षा मिळावी. पण रथातला तो खाली उतरतो आणि त्याच्या पुढे उभा राहून ‘भिक्षांदेहि’ म्हणून हात पसरतो. याला दु:ख, राग, अपेक्षाभंग सगळंच वाटतं. झोळीत हात घालून हाताला लागलेली चिमूट त्याच्या हातावर ठेवतो. रथ निघून जातो. हा घरी जाऊन झोळी पालथी करतो तर चिमूटभर कण सोन्याचे झालेले असतात. ज्याने या उत्सवासाठी आमंत्रण दिलं, तो रिकाम्या झोळीने पाठवेल का? प्रत्येकाच्या जवळ आहे काहीतरी. ते द्या या जगाला त्या मुलीच्या वृत्तीने आणि जीवनाचं सोनं होईल.

टागोरांना भोवतीच्या प्रगतीचा नाद ऐकू येत होता. ते एक संपन्न समाज अपेक्षित होते. चित्त जेथे भयशून्य, उंच जिथे माथा अशा समाजाचं स्वप्न पाहात होते. त्यासाठी विचार आणि कल्पनांचे पंख उभारून सत्याचा मार्ग धरणं आवश्यक होतं. पिंजऱ्यातल्या आणि मोकळ्या अवकाशातील पक्ष्यांची चित्रं त्यांची कविता रंगवत होती. पण तांत्रिक सुधारणा, सौख्य याबरोबर एक चिंताही त्यांची कविता प्रकट करत होती. ‘परीस’सारख्या कवितेत परीस शोधायला निघालेल्या माणसाची नशा इतकी पराकोटीला गेलेली दिसते की, परीस मिळाल्याचं भानही हरपलं. जीवनात केवळ रिक्तता नको, तशी केवळ बहुलताही नको. हवी पूर्णता. त्यांची कविता लोकांच्या मनात एक प्रार्थना जागवत होती. जी आजही आवश्यक आहे.

तुझ्या चरणापाशी हीच एक प्रार्थना आहे
माझ्या हृदयातल्या कोतेपणाच्या मुळाशीच घाव घाल
आनंद किंवा दु:ख यांना संयमितपणे सहन करण्याची बुद्धी मला दे
माझ्या प्रेमाला सेवेचं माहात्म्य दे
दलितांना दूर न लोटण्याची, अन‌् प्रचंड नि मगरूर शक्तीपुढंदेखील 
मान न वाकवण्याची हिंमत मला दे.
रोजच्या व्यवहारातल्या क्षुल्लक भानगडीपासून 
मन अलिप्त ठेवण्याची ताकद मला दे
आणि
माझं सर्व सामर्थ्य तू म्हणशील त्या क्षणी 
तुझ्या चरणी प्रेमानं अर्पण करण्याची शक्ती मला दे.

टागोरांचा तो सृष्टीकर्ता मास्टर पोएट हे जग सुंदर करण्यासाठी सतत परिश्रम करतो आहे. टागोरांच्या मनात विश्वास आणि आशा यांना निरंतर स्थान होतं. पण त्याच वेळी ते बुद्धीची भाषा ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे, सत्याचा पथ कधीही सोडता कामा नये, असंही म्हणत होते. ‘जय जय सत्येर जय’ म्हणत ‘एकला चारो रे’ ही तयारी त्यांनी ठेवली. याचं स्मरणही त्यांच्या जयंतीच्या दिवशी आवश्यक आहे.

‘आमि कवी आमि शुधु एक्स्प्रेशन देई...’ 
समृद्ध आयुष्य जगलेल्या टागोरांनी आयुष्यात प्रचंड काम केलं तरी ते स्वत:ची ओळख करून देत ‘कवी’ म्हणून. ‘आमि कवी...’ या पंक्तींतून कवीनं फक्त एक्स्प्रेशन द्यावं, उगीच भाष्य करीत बसू नये, असा सरळसोप्पा व्यावहारिक अर्थ निघतो. पण शेवटी एक्स्प्रेशन देणारं, अभिव्यक्ती करणारं हे व्यक्तिमत्त्व किती समृद्ध होतं, हे पाहायला लागल्यावर त्या ‘फक्त’ एक्स्प्रेशनला एवढं मोल का येतं, हे कळतं.

- आशा साठे, पुणे
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...