आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीच का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण अतीव दु:ख, वेदनेतच मीच का, या प्रश्नाने घायाळ होतो. काही उच्च विचारसरणीचे द्रष्टे लोक विकलांगांना तनमनाने जीवनभर स्वावलंबी करण्याचा वसा घेतात. तेव्हा ते मीच का हे करावे, असा विचार मनात आणत नाहीत.

प्रत्येक दिव्यांगाच्या पालकांना पडणारा एक जीवघेणा प्रश्न म्हणजे “मीच का?” खरे तर तसा हा प्रश्न सरसकट सर्वांनाच पडतो. पण इतरांचे प्रश्न वेगळ्या परिस्थितीमुळे निर्माण झालेले व थोड्या प्रयत्नाने सुटणारे असतात. मात्र विशेष पाल्य खूप न सुटणारे प्रश्न जन्मत:च सोबत घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्या पालकांची जगण्याची दिशा, भविष्यातली स्वप्ने व उमेद यांत आमूलाग्र बदल होतो. आणि नकळत मनात सतत “मीच का?” हा प्रश्न फेर धरून अव्याहत नाचत राहतो. दहा हजारांत एक मूल विकलांग आणि ते आपल्याच पोटी यावे, याचे वैषम्य वाटते. माझ्याच वाट्याला हे भोग का? ही जीवघेणी शिक्षा नियतीने मलाच का दिली? देव इतका निष्ठुर का वागतो? की हा आमच्यावर उगवलेला सूड आहे? कशाचा सूड? कोणते प्रारब्ध? असे असंख्य प्रश्न विकलांगांच्या पालकांना छळत असतात. माझ्याही मनात हे सगळे विचार, प्रश्न यायचे. किंबहुना याहूनही अधिक प्रश्न, चिंता, काळजी, दैव, नशीब या चक्रातून मी गेले आहे. पण जितके अधिक प्रश्न, विचार तितके अधिक प्रयत्न “हे असे का?” हे जाणून घेण्याकरता केले. बाहेरच्या जगात डोकावले तेव्हा आपल्या लक्षात येते की, आपली चिंता, दु:ख नगण्य आहे. अापण हवे तसे दान नाही पडले की, लगेच नशिबाला दोष देतो अथवा मीच का, म्हणून दु:खी होतो. पण आयुष्यात जेव्हा काही चांगले घडते तेव्हा आपण हे देवाने, नशिबाने, प्रारब्धाने दिले म्हणतो का?
 
जगप्रसिद्ध टेनिसपटू आर्थर ॲशच्या तत्त्वज्ञानातून मला हे कळले. आर्थर ॲशला कर्करोग झाल्याचे समजले तेव्हा जगभरातल्या त्याच्या चाहत्यांच्या मनांत “आर्थरला देवाने ही मरणान्त वेदना का दिली?” हाच प्रश्न आला. त्यांच्या या प्रश्नाला त्याने अतिशय समर्पक उत्तर दिले. “संपूर्ण जगभरातून ५ कोटीहून जास्त मुले टेनिस शिकतात. त्यातल्या पन्नास लाखांना टेनिस खेळता येते. त्यातले ५ लाख व्यावसायिक टेनिसकडे विशेष लक्ष देतात. ५० हजार खेळाडूंना विविध प्रतिष्ठित स्पर्धांत भाग घेता येतो. ५ हजार खेळाडू ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेपर्यंत पोहोचतात. त्यातले फक्त ५० खेळाडू विंबल्डनमध्ये पात्र ठरतात. ५ जण उपांत्य फेरीत तर फक्त दोघेच अंतिम फेरीत येतात. तेथे मी येऊन पोहोचलो. आणि शेवटी मी विंबल्डन जिंकणारा भाग्यवान ठरलो. ५ कोटीतून माझ्या एकट्याची निवड विंबल्डन विजेता म्हणून झाली तेव्हा देवाला मीच का, माझीच निवड का केली, असे विचारले का? मग आता कर्करोग झाला तर मीच का, हे विचारणे योग्य आहे का? त्याने जे दिले ते विचार करूनच दिले असणार. माझे हित त्यातच आहे.”

अगदी हेच तत्त्वज्ञान आपल्या विकलांग पाल्याकडे पाहताना आपण सतत मनात जपले तर आपल्याला “मीच का?” हा प्रश्न पडणारच नाही. मीच का, हा प्रश्न मुळातच भ्रामक आहे. आपण फक्त अतीव दु:ख, वेदना, परिस्थिती असल्यावरच या प्रश्नाने घायाळ होतो. पण काही उच्च विचारसरणीचे द्रष्टे लोक आपले मार्गदर्शक असतात. आपल्या जीवघेण्या प्रश्नांचे ते सहज कृतीतून निराकरण करतात. तसेच काही द्रष्टे लोक विकलांगांना तनमनधनाने जीवनभर स्वावलंबी करण्याचा वसा घेतात. तेव्हा ते मीच का हे करावे, असा विचार मनात आणत नाहीत. 

विकलांगांना आर्थिक दृष्टीने सक्षम करणारी अशीच एक असामान्य निगर्वी व्यक्ती म्हणजे सुभाष चुत्तर. आभाळाचं हृदय असलेले समाजसेवी उद्योजक. त्यांनी चाकण येथील आपल्या असोसिएटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत एक वेगळा प्रयोग केला. त्यांनी मतिमंद/गतिमंदांना आपल्या कंपनीत रोजगार दिला. या कंपनीत असलेल्या २२५ कामगारांपैकी ६५/७० कामगार मतिमंद/गतिमंद श्रेणीतले आहेत. या कारखान्यातला पहिला मतिमंद कामगार आज सेवामुक्तीच्या वयाचा आहे. गेली २५ वर्षे तो येथे नोकरी करतो. त्याने स्वत:च्या कमाईतून घर घेतले असून वयस्कर आईवडलांसोबत तो तेथे राहतो. तो आज सर्वार्थाने त्यांचा आधार झाला आहे. येथील कामगारात काही जण तर इतके मतिमंद आहेत, जे आपले नावदेखील नीट सांगू शकत नाहीत. परंतु जो विभाग सर्वतोपरी मतिमंद कामगार सांभाळतात त्या विभागातील उत्पादनांचे नाकारले जाण्याचे प्रमाण “Zero PPM” म्हणजे दहा लाखात शून्य एवढे आहे. यांची उत्पादन क्षमता ११०% आहे. कारण मतिमंदांना एकदा काम कसे करायचे आणि चांगले काम म्हणजे काय हे शिकवले की, ते काम बिनचूक करतात. तडजोड त्यांना मान्य नसते. कामावर असताना कोणतीही गोष्ट त्यांना विचलित करू शकत नाही. हे जरी सत्य असले तरी चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेले हे निर्विकार चेहरे व त्यांच्या असामान्य वर्तनाकडे दुर्लक्ष करून मतिमंदांना नोकरी देणे ही कल्पनाच स्वप्नवत वाटते! ही वेदना अंतरंगात असली तर कोणताही पालक असे अशक्य ते शक्य करण्याचे साहस करेल. 

सुभाष चुत्तर यांचा मुलगा अजय मतिमंद आहे. म्हणूनच अजयचे “आमच्या पश्चात काय?” ही व्यथा त्यांना सतावू लागली. आईच्या अथक प्रयत्नाने अजयचे शिक्षण जेमतेम आठवीपर्यंत झाले. त्यानंतर वडील त्याला स्वत:च्या कंपनीत घेऊन जात. तेथे एक एक गोष्ट तो शिकू लागला. पैसा असताना माझी ही अवस्था तर अशा इतरांचे काय होत असेल? अशा मुलांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभे करता येईल का, हा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच मतिमंद मुलांना नोकरीवर घेण्याचा त्यांनी निश्चय केला. २५ वर्षांपूर्वी घेतलेला हा निर्णय मतिमंदांचे आयुष्य परिपूर्ण करणारा मैलाचा दगड ठरला. प्रत्येक मुलावर त्यांनी अपार मेहनत घेतली. असेच चित्र मी पुण्याला कामायनी संस्थेत RCIच्या ट्रेनिंगला गेले होते तेव्हा प्रत्यक्ष बघितले. ही संस्था मतिमंद/गतिमंदांकरता कार्य करते. शिक्षण, स्वावलंबन व नोकरी-उद्योग यांवर ते मति/गतिमंदाचा विकास करतात. त्यांचे वर्कशाॅप व तेथे काम करणारी मुले पाहिली की, “पंगु लंघयते गिरीम्” यावरचा विश्वास दृढ होतो. आज अशा अनेक संस्था या क्षेत्रात कार्य करत असून अनेक विकलांग मुलांचे भविष्य व आमच्या पश्चात काय, या चिंतेतून पालकांना दिलासा मिळत आहे. प्रत्येक मोठ्या कंपनीने दोन-तीन विकलांग/दिव्यांगांना जर कामावर घेतले तर मीच का, हा प्रश्न बऱ्यापैकी हद्दपार होऊ शकतो. 

“जिंदगी बेहतर होती है अगर आप खुश होते है| लेकिन जिंदगी बेहतरीन होती है अगर आप दूसरों को खुश रखते है|” दुसऱ्यांच्या आनंदात जेव्हा प्रत्येक जण स्वत:चा आनंद शोधत मदत करेल, तेव्हा परावलंबी मुले स्वाभिमानाने जगतील. देशपरदेशातले असंख्य विकलांग सेंटर, शाळा, वर्कशाॅप मी पाहिले आहेत. परंतु ज्यांच्या पोटी असे विकलांग मूल आहे, तेच पालक अशी कामे सुरू करण्यात अग्रेसर आहेत. अभावानेच काही मनस्वी समाजसेवी, भारावलेले व जाणीव असलेले यात सहभागी होतात. म्हणूनच वेदनेचे निखारे सतत सोबत घेऊन चालणाऱ्या दिव्यांगांच्या पालकांना पुन:पुन्हा सांगावेसे वाटते की, सकारात्मक राहा. वेदनेतूनच विचार जन्म घेतात. त्या विचारांचे वरदान हेच जगण्याचे, जाणिवांचे कारण आहे. त्यातूनच विकलांग/दिव्यांग पाल्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.

- प्रतिभा हंप्रस, औरंगाबाद
pratibha.hampras@gmail.com
बातम्या आणखी आहेत...