आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीप्रधान चित्रपटकर्ते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना २०१६चा सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ३ मे रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याची चर्चा करणारा लेख.

दिग्दर्शक के. विश्वनाथ म्हटले की, बहुतांश हिंदी सिनेरसिकांना आठवतो ‘सरगम’ आणि त्यातील मुक्या नर्तकीची भूमिका करणाऱ्या जयाप्रदाचे काम. हिंदीत के. विश्वनाथ यांचे जे चित्रपट आले, ते होते सूरसंगम, इन्सान जाग उठा, संजोग, कामचोर, धनवान, ईश्वर, व संगीत. या चित्रपटांनी त्यातील सुश्राव्य संगीत, नृत्य व आदर्श संस्कारक्षम कथा यामुळे माफक यश मिळविले; परंतु के. विश्वनाथ यांची दिग्दर्शकीय प्रतिभा फुलली ती तेलुगू व तामीळ चित्रपटांतून. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये शंकराभरणम, सागरसंगमम, स्वर्णकमलम, स्वातीमौत्यम, सप्तपदी, स्वातीकिरणम, शुभलेखा ही नावे आवर्जून घेतली पाहिजेत. सशक्त कथावस्तू, उत्तम नृत्य व संगीत, आणि अभिनय यांमुळे तामीळ-तेलुगू भाषेतील बहुधा सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. शिवाय ते स्वत: उत्तम नटही आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची यादीही मोठी आहे. त्यांनी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार, दहा वेळ नंदी पुरस्कार, तर दहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेले आहेत. त्यांचा ‘स्वातीमुत्यम’ हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. अशा या गुणी दिग्दर्शकाने आपली चित्रपटीय कारकिर्द ध्वनितज्ज्ञ म्हणून सुरू केली. चित्रपटांच्या पटकथालेखन, अभिनय, ध्वनी, नृत्य, संकलन अशा अनेक अंगांची त्यांना चांगली जाण आहे. शिवाय आरंभी ए. सुब्बाराव, के. बालचंदर, बापू, रामनाथ अशा ज्येष्ठ दिग्दर्शकांचा साहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. अन्य भारतीय भाषांतील चित्रांचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. व्ही. शांताराम यांच्याप्रमाणेच त्यांच्या चित्रपटांतून समाजप्रबोधनपर संदेशही असतो.

संदेशप्रधान : उदा. ‘सप्तपदी’मध्ये ब्राह्मण-दलित विवाहसंबंधाची कहाणी होती. यात विवाहसंबंधासाठी चारित्र्य महत्त्वाचे असते जात नव्हे, असे त्यांनी खंबीरपणे मांडले होते. ‘स्वातीमुत्यम’ या चित्रपटात विधवा पुनर्विवाहाचा जोरदार पुरस्कार केला होता. ‘शुभलेखा’ चित्रपटात वधुपित्याचे शोषण करणाऱ्या आणि त्याला अपमानित करणाऱ्या हुंडा प्रथेचा त्यांनी धिक्कार केला. ‘स्वातीकिरणम’ या चित्रपटात श्रमप्रतिभेची महती विशद केली होती. तर अफाट लोकप्रिय झालेल्या ‘शंकराभरणम’ या गाजलेल्या चित्रपटात गुरू-शिष्य नात्यातील उदात्तता आणि भारतीय संगीताची महत्ता मांडली होती. ‘ओ सीता कथा’ या चित्रपटातून स्त्रीजातीचे मोठेपण दाखवले होते. ‘जीवनज्योती’ चित्रपटातून कुटुंबपद्धतीतील चांगल्या मूल्यांचा अाविष्कार केलेला होता.  त्यांच्या अनेक चित्रपटांतून कुचीपुडी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकारांचे लोभस दर्शनही त्यांनी घडविलेले आहे.

अनेक कलावंतांना त्यांनी मोठे केले. ‘आत्मगौरवम’ या त्यांच्या स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून दिलेल्या पहिल्या चित्रामुळे अभिनेता ए. नागेश्वरराव यांची लोकप्रियता अफाट वाढली. तर कमलहासन हा नट सागरसंगमम् या चित्रपटामुळे दाक्षिणात्य चित्ररसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. जयाप्रदा, मंजू भार्गवी, विजयाशांती या अभिनेत्रींनाही प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळाली ती के. विश्वनाथ यांच्या चित्रपटांमुळेच. ‘शंकराभरणम्’ या चित्रपटाद्वारे त्यांनी आंध्र प्रदेश सरकारच्या नोकरीत दारूबंदी इन्स्पेक्टरची सेवा बजावणाऱ्या जे. व्ही. सोमयाजुलू या गुणी प्रौढ नाट्य कलावंतास प्रकाशात आणले. ‘शंकराभरणम्’ हा चित्रपट फ्रान्स, मॉस्को, ताश्कंद अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून गाजला. पुढे तो ‘सूरसंगम’ या नावाने गिरीश कार्नाडांच्या मध्यवर्ती भूमिकेत हिंदीतही आला व गाजला. के. विश्वनाथ यांचे गाजलेले बहुतांश चित्रपट स्त्रीप्रधान कथानकांचे आहेत, हे एक वैशिष्ट्य आवर्जून नोंदविले पाहिजे.

आंध्र प्रदेशातील गुंटूर या जिल्ह्यातील पेद्दापुलीवरू हे त्यांचे मूळ गाव. उच्चवर्णीय कुळात जन्मूनही ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांचे मूळ नाव कसिनधुनी विश्वनाथ असे असले तरी ते गाजले के. विश्वनाथ या नावानेच (सिनेमाक्षेत्रात के आद्याक्षर लावणारे गाजलेले अन्य चित्रकर्मी म्हणजे दिग्दर्शक के. आसिफ, के. बालचंदर). काही वर्षांपूर्वी त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मानही मिळाला होता. आता वयाच्या ८७व्या वर्षी आपल्या गुणवत्तापूर्ण प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीमुळे के. विश्वनाथ दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले. नुकताच ३ मे रोजी संपन्न झालेल्या एका शानदार समारंभात महामहीम राष्ट्रपतींनी त्यांना या पुरस्कारादाखल अकरा लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविले आहे. हा पुरस्कार मिळविणारे के. विश्वनाथ हे ४८वे चित्रकर्मी आहेत. त्यांचे अभिनंदन!

मध्यममार्गी : के. विश्वनाथ यांनी भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टी आपल्या चित्रपटांतून जशा मांडल्या, तसाच वाईट प्रथांचा धिक्कारही केला. चांगल्या नवविचारांची, मूल्यांची पाठराखणही केली. त्यासाठी प्रायोगिक चित्रपट आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट या दोन ठळक प्रवाहातील चांगली गुणवैशिष्ट्ये एकत्र आणून एका नव्या मध्यममार्गी पद्धतीचे चित्रपट केले. सहकुटुंब पाहता येतील, अशा संस्कारक्षम कथांची रंजनपर मांडणी, नृत्य, संगीत यांचा भरपूर वापर केला, पण त्यात सवंगपणा आणला नाही. उच्च गुणवत्तेचे चित्रपट दिले. त्यामुळेच हिंदीतील राकेश रोशन, मिथुन चक्रवर्ती, राजेश खन्ना, ऋषी कपूर असे अनेक नट त्यांच्यासोबत काम करायला मिळाले हे स्वत:चे भाग्य समजतात. तेलुगू, तामीळ, हिंदी या तिन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. या भाषांतील चांगले लेखक, चांगल्या कथावस्तू यांचा सखोल अभ्यास होता.

- सुधीर सेवेकर, औरंगाबाद
sevekar.sr@gmail.com
बातम्या आणखी आहेत...