आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमोपचार आणि माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रथमोपचार म्हणजे एखाद्या आजारात किंवा जखम झाल्यास केलेले प्राथमिक उपचार. प्रथमोपचार हे सामान्यत: एखाद्या तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या काळात दिले जातात. सामान्यत: आढळणार्‍या इजा म्हणजे खाली पडणे, भाजणे, बुडणे व रस्त्यावरील अपघात.

पालकांनी पुरेशी काळजी घेतली, घरात किंवा आजूबाजूला सुरक्षितता पाळण्याची दक्षता घेतली तर अनेक गंभीर अपघात त्यातून उद्भवणार्‍या इजा टाळता येऊ शकतील. यासाठी लहान मुलांना उकळते पाणी, आग, स्वयंपाकाचा स्टोव्ह, दिवे यापासून दूर ठेवावे चाकू, सुर्‍या, कातर्‍या यासारख्या धारदार व तीक्ष्ण वस्तू लहान मुलांच्या हातात सहज पोहोचणार नाहीत, अशा ठिकाणी ठेवाव्यात. विषारी पदार्थ, रसायने, कीटकनाशके, औषधे, ब्लीच, अ‍ॅसिड व द्रव इंधन हे नीट स्पष्टपणे तसे लिहिलेल्या बाटल्यांत ठेवावे. मुले खेळतात ती जागा सुरक्षित आहे का, याची पालकांनी शहानिशा करावी. म्हणजे मुले खाली पडून जखमी होणार नाहीत. रस्ता ओलांडताना पालकांनी नेहमी लहान मुलांच्या बरोबर राहावे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा अपघातावेळी तत्काळ आवश्यक कृती करणे अगत्याचे असते. उदा. 102 ला फोन करून अ‍ॅब्युलन्स बोलवावी किंवा 101 ला फोन करून अग्निशामक केंद्राशी संपर्क साधावा. बॅँडेज बांधताना प्रथम लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपण शांत राहणे अन् त्या व्यक्तीला मानसिक धक्का बसू न देणे. आपत्कालीन, परिस्थितीत जर निर्जंतुक करणारे द्रव आणि बॅँडेजेस उपलब्ध नसतील तर स्वच्छ हात रुमाल, साडी/ ओढणी यांचा तुकडा, पेटीकोटचा तुकडा यांचा बॅँडेज म्हणून उपयोग करता येईल किंवा साबण, स्वच्छ पाण्याचा उपयोग करता येईल.

भाजणे : जर एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांनी पेट घेतला असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीला ब्लॅँकेटमध्ये गुंडाळावे. भाजलेल्या भागावर खूप जास्त प्रमाणात थंड व स्वच्छ पाणी ओतावे म्हणजे भाजण्याची प्रक्रिया थांबेल व तो भाग थंड राहील. भाजलेल्या ठिकाणी काही चिकटले असेल तर ते काढू नये. भाजलेल्या व्यक्तीला भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ द्यावेत. वेदना शांत करणारे औषध वापरावे व त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा.

विजेचा शॉक : विजेची उपकरणे, विजेच्या तारा, प्लग पॉइंटस इत्यादीचा काळजीपूर्वक वापर करावा. जर विजेचा शॉक बसलेला असेल तर वेळ न घालवता, त्या व्यक्तीला स्पर्श करण्यापूर्वी ताबडतोब वीजपुरवठा करणारा मेन स्विच बंद करावा. जर त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल तर किंवा ती बेशुद्ध पडली तर त्या व्यक्तीला नजीकच्या हॉस्पिटलात न्यावे.

रस्त्यावरील अपघात : आपण नेहमी रस्त्याच्या बाजूने वाहतुकीकडे तोंड करून चालले पाहिजे. रस्ता ओलांडताना नेहमी पादचार्‍यासाठी असलेल्या पट्ट्यांचा उपयोग करावा. मुलांना रस्त्याजवळ खेळू देऊ नका. अपघात जर डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला इजा झाली असेल तर डोके किंवा मान हलवू नका. खरचटले किंवा मुरगळले असेल तर तो भाग थंड पाण्यात बुडवा. जर अपघातग्रस्त व्यक्तीला वेदना होत असतील तर तिचे हाड मोडलेले असू शकते, इजा झालेला भाग हलवू नका अन् ताबडतोब त्या व्यक्तीची रवानगी जवळच्या इस्पितळात करा.

बुडणे : जर एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्वरित त्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढा. त्या व्यक्तीच्या तोंडात किंवा चेहर्‍यावर चिखल किंवा फेस असेल तर चेहरा व तोंड जवळ उपलब्ध असलेल्या कापडाने पुसून काढा. त्या व्यक्तीला खाली झोपवा, त्याचे पोट दाबा. त्यानंतर त्या व्यक्तीला उलटे वळवा व पोटाच्या मागच्या भागावर दाब द्या, म्हणजे पाणी शरीराबाहेर फेकले जाईल. अपघातग्रस्त व्यक्ती बेशुद्ध असेल अन् श्वास घेत असेल तर त्या व्यक्तीला पाठीवर झोपवा व तिचे डोके थोडेसे एका बाजूला वळवा. त्या व्यक्तीच्या नाकपुड्या बंद करून त्याच्या तोंडात जोराने फुंकरीने हवा सोडा. खूप जोरात फुंकर मारा म्हणजे त्या व्यक्तीची छाती वर-खाली हलू लागेल. तीनपर्यंत आकडे मोजा आणि पुन्हा फुंकर मारा. ती व्यक्ती नीट श्वास घेऊ लागेपर्यंत हे चालू ठेवा अशा प्रथमोपचारानंतर त्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात न्या.

विषबाधा : एखाद्याने विषारी पदार्थ गिळलेला असेल तर त्या व्यक्तीला ओकार्‍या काढायला लावू नका. कारण, त्यामुळे आजार आणखी वाढेल. जर ते विष त्या व्यक्तीच्या त्वचेवर किंवा कपड्यावर सांडले असेल तर कपडे काढून टाका व त्वचेवर खूप पाणी मारा. त्वचा साबणाने स्वच्छ धुवा. जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात विष गेले असेल तर किमान 10 मिनिटे डोळ्यांवर पाणी मारा. हॉस्पिटलात नेताना विषाचा नमुना किंवा ती विषाची बाटली सोबत न्या. अ‍ॅँटिसेप्टिक लावा व त्याभागावर स्वच्छ कापड किंवा बॅँडेज लावा.

कुत्रा चावणे : कुत्रा चावणे ही एक गंभीर बाब ठरू शकते. रस्त्यावरचा किंवा भटका कुत्रा चावल्यास त्या व्यक्तीला ‘रेबीज’ हा प्राणघातक रोग होण्याचा धोका असतो. कुत्रा चावल्यावर शक्य झाल्यास त्या कुत्र्यावर दहा दिवसांसाठी लक्ष ठेवा. या दरम्यान जर तो कुत्रा स्वस्थ असेल तर चावलेल्या व्यक्तीस रेबीज होण्याची संभावना कमी होते. कुत्रा चावल्यानंतर करावयाच्या प्रथोमपचाराचा मुख्य उद्देश रेबीज या रोगापासून प्रतिबंध करणे हा असतो. कुत्रा चावलेली जागा, जखम लवकरात लवकर वाहत्या पाण्याखाली भरपूर साबण लावून स्वच्छ धुवा. जखम झाली असेल तर ती स्वच्छ कापडाने झाकून ठेवा त्यामुळे वातावरणातील जंतूचा संसर्ग होणार नाही. जखमेवर हळद, चुना किंवा इतर काही लावू नका. चावलेल्या, जखमेवर टाके देऊ नका. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

गुदमरणे : लहान मुलांची खेळण्याची व झोपण्याची जागा यामध्ये लहान वस्तू उदा. बटणे, मणी, नाणी, बिया व शेंगदाणे इत्यादी पडलेले असू नयेत. जर एखाद्याने चुकून काही गिळलेले असेल आणि तो खोकत असेल तर त्यात अडथळा आणू नका. त्याला ती वस्तू ओकून बाहेर काढू द्या. जर ती वस्तू पटकन बाहेर आली नाही तर ती त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अगदी लहान बाळे व लहान मुले यांच्या बाबतीत डोके व मानेला आधार द्या. मुलांचा चेहरा खालच्या बाजूने वळवा व डोके पायाच्या खालच्या पातळीत असू द्या. पाठीवर बुक्के मारून ती वस्तू बाहेर काढायचा प्रयत्न करा. जर ती वस्तू काढण्यात यश आले नाही तर मुलांना त्वरित डॉक्टरांकडे न्या.