आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍ट्रीमिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्ट्रीमिंग (streaming) म्हणजे इंटरनेटवर चलचित्र पाहणे किंवा गाणी ऐकणे. यामध्ये फाइल डाऊनलोड केली जात नाही. त्यामुळे नंतर बघता येत नाही. त्या क्षणालाच बघावी लागते. जेव्हा एखाद्या लाइव्ह किंवा रेकॉर्डेड कार्यक्रमाचे प्रक्षेपण इंटरनेटवरून केले जाते तेव्हा त्याच्या डेटाचे प्रसारण सलग होत असते. तेथे कुठलीही फाइल डाऊनलोड करायची नसते. काही प्रसारकांना स्ट्रीमिंग करणेच सोयीचे वाटते.कारण त्यामुळे फाइल सेव्ह करून त्याचा अनधिकृत प्रसार टाळता येतो.

स्ट्रीमिंग कसे काम करते?

स्ट्रीमिंग ही तशी अलीकडची प्रगती आहे. यासाठी तुमच्या ब्रॉडबँडचे कनेक्शन अतिशय जलद असले पाहिजे; जेणेकरून डेटा रिअल टाइममध्ये डाऊनलोड झाला पाहिजे. स्ट्रीमिंगसाठी ज्या फाइल्स एन्कोड केलेल्या असतात, त्यांना कॉम्प्रेस (छोटे) करून ठेवले जाते; जेणेकरून त्या कमीत कमी बँडविड्थ वापरतील. जर इंटरनेटवरच्या कनेक्शनमुळे दाटी (congestion) होऊन काही तात्पुरता बिघाड (interruption) झाला तर आवाज किंवा चलचित्रही जाईल.

असे व्हायला नको म्हणून संगणक आपल्याकडे मिळालेला डेटा मेमरीत (buffer) साठवून ठेवतो. जेव्हा आवाज किंवा चलचित्र जाते तेव्हा हा बफर डेटा दाखवला जातो. त्याबरोबर पाठीमागे डेटा डाऊनलोड होतच राहातो.

आता तर स्ट्रीमिंगचे हे तंत्र ऑनलाइन रेडिओ आणि यूट्यूबमुळे सर्वपरिचित झाले आहे. यातल्या काही साइट्स इंटरनेट कनेक्शननुसार व आपल्या प्रसारणाच्या क्वालिटीनुसार बदल करतात. उदाहरणार्थ यूट्यूब उच्च, मध्यम आणि निम्न या प्रतीनुसार मोबाइल आणि ब्रॉडबँडधारकांकरिता प्रसारण करतात.
डाऊनलोड करताना धारकाला माहीत असते की किती बँडविड्थ खर्च होणार आहे. परंतु स्ट्रीमिंग करताना हे मुळीच लक्षात येत नाही. गाणे ऐकताना 0.5-1.0 मेगाबाइट्स खर्च होतात तर यूट्यूब बघताना 4-5 मेगाबाइट्स खर्च होतात. इंटरनेट कनेक्शनच्या वेगानुसार ते कमी-अधिक होऊ शकतात. खर्च झालेले मेगाबाइट्स मोजण्यासाठी इंटरनेटवर मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. काही फायरवॉल आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरही किती डेटा खर्च झाला हे अचूक सांगू शकतात.

स्ट्रीमिंगची एक गैरसोय अशी की एका संगणकावर एकच स्ट्रीमिंग होऊ शकते. येथे unicasting पेक्षा multicasting अपेक्षित आहे. त्यामुळे एकाच वेळेला अनेकांना एकच स्ट्रीम ऐकता, पाहता येऊ शकते. त्यामुळे बँडविड्थ तर वाचेलच, पण स्ट्रीमिंगही अधिक दर्जेदार असेल. मल्टिकास्टिंग अजूनही विकसनशील अवस्थेत आहे.