आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Information About Successful Kanadi Person In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानडीचा आयाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या भाषेकडे पाहण्याचा रसिकांचा दृष्टिकोनही बदलला. साहित्य निर्मितीला वेग आला. नवनवे लेखक उदयाला आले. राज्य सरकार भाषेच्या प्रगतीसाठी भरपूर पैसे खर्च करू लागले. कन्नड भाषा आंतरराष्ट्रीय प्रांगणात लोकप्रिय व्हावी म्हणून त्या पातळीत सभा-संमेलने होऊ लागली आहेत. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, साहित्यकृतींना राजाश्रयाबरोबरच वाचकप्रियता लाभणेदेखील गरजेचे असते आणि कन्नड भाषेला आज या दोन्ही गोष्टी लाभल्या आहेत. याची प्रचिती बेळगावमध्ये भरलेल्या ‘विश्व कन्नड संमेलनात’ आली. समस्त बेळगावकरांचे डोळे दिपतील असा अफाट आणि बेफाट खर्च करण्यात आला. दररोज अडीच लाख साहित्यप्रेमींच्या भोजनाची सोय करण्यात आली होती. पण त्याचबरोबर डझनभर साहित्य विक्री केंद्रे होती आणि पुस्तक विक्री तडाखेबंद होत होती. त्यात कन्नडप्रमाणे मराठी पुस्तकांचादेखील समावेश होता आणि त्यालाही ब-यापैकी मागणी होती. कदाचित बेळगावमध्ये हे संमेलन असल्यामुळे असेल. कन्नड साहित्याचा मराठी अनुवाद आणि मराठीचा कन्नड असा साहित्यप्रवास अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे. कन्नड व तुळू भाषांवर प्रभुत्व असलेल्या आणि संतसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. सुनीता शेट्टी यांच्या मते, संतसाहित्याबरोबर हा प्रवास सुरू झाला आहे. अगदी विठोबापासून संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या मराठी साहित्यात भरपूर कन्नड शब्द सापडतात. डॉ. सुनीता शेट्टी या मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ तसेच कन्नड भाषा समितीच्या कैक वर्षे सदस्य होत्या. भाषेचा हा प्रवाह तेव्हापासून आजतागायत वाहता ठेवणारी अनेक मंडळी आहेत.

ज्या भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला आणि ज्या भाषेला आठ ज्ञानपीठ पुरस्कार लाभले, ती भाषा इतर भाषिकांना नक्कीच आकर्षित करणारी ठरते. कानडीतील उत्कृष्ट वाङ्मय मराठी वाचक रसिकांना वाचायला मिळावे म्हणून 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून प्रयत्न सुरू आहेत. मुळातच दर्जेदार साहित्यामध्ये मराठीचा क्रम वरच्या पातळीवर आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मराठीने इतर भाषांतील वाङ्मय पचवले आहे.

म्हणून तर मराठीमध्ये सर्व भारतीय भाषांतील वाङ्मय उपलब्ध आहे. 40 कन्नड लेखकांचे साहित्य मराठीत आणण्याचा विक्रम नोंदवला आहे तो डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांनी! आज त्यांच्या नावावर 45 कन्नड साहित्यकृतींच्या अनुवादाची नोंद आहे. त्यात कथा, कविता, कादंब-या, नाटक, आत्मचरित्र, वैचारिक लेख आदींचा समावेश आहे. त्या मूळच्या कर्नाटकातील असल्या तरी बालपण बेळगावात गेले. त्यामुळे त्यांच्यावर मराठीचे संस्कार झाले. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. पुण्यातील वास्तव्यात त्यांनी दोन्ही भाषांवर पुरेसे प्रभुत्व मिळवले. त्यांचे पती विरूपाक्ष हे मूळचे चिकोडी तालुक्यातील. विरूपाक्ष म्हणजे शंकर. हे त्यांचे कुलदैवत. पतीचे नाव विरूपाक्ष म्हणून पत्नीचे नाव उमा, असा गमतीशीर खुलासा त्या करतात. कन्नडमधील विख्यात लेखक शिवराम कारंथ, भैरप्पा, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती, चंद्रशेखर कंबार, वैदेही आदी नामवंतांचे साहित्य त्यांनी अनुवादित केले आहे. अनुवाद करण्यासाठी मुळातच भाषा आणि संस्कृतीची जाण असायला हवी, असे त्या सांगतात. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी कन्नड चित्रपट पाहून भाषा समजावून घेतली आणि मग मूळ लेखकांशी संवाद साधून अनुवाद केला. डॉ. उमा कुलकर्णी सांगतात, ‘वेळप्रसंगी मी लेखकाला त्याच्या गावी जाऊनदेखील भेटते. याचे कारण असे की, लिखाणामागील लेखकाची भूमिका समजावून घेता येते. कारण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लेखक पुढील कलाकृतीकडे वळतो. याचा अर्थ तो लेखक मागील कलाकृती विसरतो असे नाही, पण पूर्वीच्या कलाकृतीच्या निर्मितीमागची त्या वेळची त्याची भूमिका महत्त्वाची ठरते.’ एखाद्या कलाकृतीमध्ये वातावरणनिर्मिती असते ती समजावून घेण्यासाठी त्या त्या ठिकाणी भेट देणे आवश्यक असते आणि कन्नड साहित्यात वातावरणनिर्मितीला प्राधान्य असते.

डॉ. उमा कुलकर्णी सांगतात, मराठीत अनुवाद होतोय म्हटल्यावर लेखक सुखावतात, अधिक मोकळेपणाने चर्चा करतात आणि मराठीमध्येदेखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. आज मराठीमधील मातब्बर समजले जाणारे प्रकाशक मेहता, राजहंस, मौज आणि पद्मगंधा यांनी त्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत.


मराठी आणि कन्नड यांच्यातील साहित्यिक ऋणानुबंध तपासायचा असेल तर संतसाहित्यापलीकडे जाऊन सामाजिक साहित्यकृतींची नोंद घ्यावी लागेल. 1819मध्ये कन्नडमधील पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. ‘इंदिराबाई’ नामक कादंबरीत महाराष्ट्राचा आधार आढळतो. सातारा येथील एका मुलीच्या वसतिगृहात एक बालविधवा शिक्षण घेते, आपल्या पायावर उभी राहणे पसंत करते आणि पुढे एका सुशिक्षित तरुणाशी पुनर्विवाह करते. हा मराठी साहित्य, सामाजिक स्थित्यंतर यापैकी नेमका कशाचा पगडा?

कन्नड साहित्य मराठीत आले तसेच मराठी साहित्यदेखील कन्नडमध्ये अनुवादित झाले आहे आणि आद्य अनुवादक म्हणून गलगनाथ यांचा उल्लेख होतो. डॉ. उमा वि. कुलकर्णी यांनी याविषयी खास संशोधन केले आहे. गलगनाथ हे पेशाने शिक्षक. वेंकटेश तिरको कुलकर्णी हे त्यांचे पूर्ण नाव. काही कामानिमित्त ते पुण्याला ये-जा करीत असत. नाथमाधव व ना. ह. आपटे यांच्या कादंबरीने त्यांच्यावर भुरळ घातली आणि ते अनुवादक बनले. त्यांचा हा अनुवाद कन्नड वाचकांनी उचलून धरला होता. साहित्य अकादमीने अनुवादकाला सन्मान प्राप्त करून दिला आणि असा सन्मान प्राप्त करणारे चंद्रकांत पोकळे हे कर्नाटकातील नामवंत म्हणून ओळखले जातात. बेळगावच्या विश्व कन्नड संमेलनात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता.

कारवार जिल्ह्यातील मंचिकेरी या छोट्याशा गावातील या तरुणाने कॉलेजमध्ये असताना मराठी साहित्य वाचले आणि एवढा प्रभावित झाला, की त्याने अनुवादक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. पेशाने प्राचार्य, पण छंद साहित्याचा! जयवंत दळवी यांचे ‘चक्र’, लक्ष्मण माने यांचे ‘उचल्या’ या पुस्तकांच्या त्यांनी केलेल्या अनुवादाचा कर्नाटक विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला. आजपर्यंत त्यांनी 63पेक्षा अधिक मराठी साहित्यिकांच्या साहित्याचा अनुवाद करून कन्नड वाचकांमध्ये मराठी साहित्याची आवड तर निर्माण केलीच, पण एक खास वाचकवर्ग निर्माण केला आणि प्रकाशकदेखील!