आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Dahale Review Of Sunita Shinde Book ‘pustak Ughadla’

प्रेरणादायी प्रवासाची गोष्‍टी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसानं झोडपलं, राजानं त्रासलं आणि नव-यानं छळलं तर जायचं कुठं हा पारंपरिक प्रश्न पिढ्यान्पिढ्या प्रत्येकालाच पडत आला आहे. नव-यानं छळलं तर जायचं कुठं हा प्रश्न मात्र केवळ स्त्रीपुरताच उरतो. या प्रश्नाचं याच परंपरेत राहूनही स्वत:चं स्वातंत्र्य जपत उत्तरे देणा-या स्त्रिया आजकाल आढळतात. सो कॉल्ड पुरुषप्रधान संस्कृतीचा बाऊ करणा-या स्त्रिया असाही एक दृष्टिकोन समाजात आहे. परंतु, ते न टाळता येणारे वास्तव आहे हे लक्षात घेत व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार मिळवू पाहणा-या स्त्रियाही आज अल्पशा का होईना, पण मोठ्या समूहाचं नेतृत्व करण्याची क्षमता घेऊन लढतायत. याचं उदाहरण म्हणजे सुनीता शिंदे. त्यांचं आत्मकथन शब्दांकित केलं आहे सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी. ‘पुस्तक उघडलं’ हे पुस्तक शिंदे यांच्या जगण्याच्या संघर्षाच्या छटा उलगडत नाही, तर आयुष्याला कलाटणी मिळणं व सन्मानाने जगणं काय असतं याचा वस्तुपाठही घालून देतं.


कुष्ठरोगी व छळण्यात तरबेज असलेला नवरा घटस्फोटाच्या दारापर्यंत घेऊन जातो, वैधव्याची मागणी देवाकडे मागण्यास भाग पाडतो पण त्यात नुसतं खचून न जाता तरणं महत्त्वाचं आहे हे भान जपत सुनीता शिंदे शिंदिणीपासून शिंदे होईपर्यंत, कुष्ठरोगी नव-याच्या छळ सहन केलेल्या बायकोपासून झोपडपट्टीतल्या अनाथ मुलांना शिकवण्यापर्यंतचा अपमानाकडून आत्मसन्मानापर्यंत प्रवास करते. हा प्रवास सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरावा, अशा पद्धतीने हे पुस्तक आखण्यात आले आहे.


कसाळ गावातलं बालपण तिथून सोसलेल्या हालअपेष्टा, लग्नानंतर हळूहळू नव-याच्या कळत गेलेल्या अनेक काळ्या छटा कळत जातात, त्यातून सावरायचं ठरवताना फक्त स्वत:पुरतंच सुधारण्याचं विश्व मर्यादित न ठेवता सुनीताताई विपुला कादरी मॅडमच्या सेव्ह द चिल्ड्रन स्वयंसेवी संस्थेत काम करायला लागतात. सामान्य पदापासून अधिकारपदापर्यंत त्या आपल्या अंगभूत गुणांमुळे पोहोचतात. यामध्ये मतिमंद मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्या अहोरात्र झटतात. हा एरवी केवळ आदर्शवत वाटणारा आशय प्रत्यक्षात पुस्तकात वाचताना जे साधे-साधे अनुभव वाचण्यात येतात त्यावरून हे केवळ आदर्शाचं उदाहरण नाही तर स्वत:बरोबर समूहाला सुधारण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे हेही लक्षात येते. दु:खाला कुरवाळत बसण्याची स्त्रीची आता मानसिकता राहिलेली नाही हेच या पुस्तकाला सुचवायचे आहे, असेही जाणवते.


पुस्तकाचे मलपृष्ठावरील मजकूर मात्र मन थोडे हळवे करते. ‘सहावी शिकलेल्या आपल्या जगण्याचं कौतुक ते काय असणार! मुंबईत आपली झोपडी आपणच उभारली असली, पोटासाठी झगडताना ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’त सामान्य नोकरी मिळवून अधिकारपदावरून निवृत्त झालो असलो नि स्वत: उद्योजिका होऊन शेजारणींना उद्योगप्रवण केलं असलं तरी ‘शिंद्यांची बायको’ हीच आपली जन्मओळख!’ हा मलपृष्ठावरील सुरुवातीचा मजकूर एका कठोर वास्तवावर प्रकाश टाकतो आणि मन अस्वस्थ होते. चारचौघींसारखं आपलं जगणं नाही हे सुनीतातार्इंना त्यांचा मुलगाच पटवून देतो आणि आत्मकथनास प्रवृत्त करतो, हा मुलाचे आईला समजून घेण्याचा धागाही मलपृष्ठावर मांडण्यात आला आहे. बुडण्याच्या आणि तरण्याच्या अनुभवांचं हे पुस्तक मुलामुळेच उघडलं आहे हेही सुनीताताई कबूल करतात आणि एका नात्याचा नव्याने वाचकाला परिचय होतो.


सरधोपट आयुष्य जगण्याची सर्वसाधारण मनिषा बाळगणा-या स्त्रीला अनेकदा धक्कादायक वळणांना सामोरं जावं लागतं. त्या वळणांना निराशाजनक प्रतिक्रिया देऊन आपलं आयुष्य अंधारात लोटायचं की विचारांती प्रतिसाद देऊन ती वळणं पार करून समर्थपणे उभं राहायचं व दुस-यांनाही उभं करायचं ही निवड सकारात्मक दृष्टिकोनातून ज्याला जमली तो जिंकला असा संदेश हे पुस्तक देते.


आपलं आयुष्य हे ओपन बुकसारखं जगता यावं ही अनेकांची इच्छा असते मात्र त्यातील खाचखळगे, अपमान, शरमेचे क्षण, चुकाही तितक्याच मोकळेपणाने मांडता यायला हव्यात तरच आयुष्य ओपन बुकसारखं खरंखुरं जगता येईल. अलिकडे आत्मकथनामध्ये अनेकदा या बाबतीत ‘कन्फेशन’ बघायला मिळते. पण सुनीता शिंदे यांच्या आत्मकथनात कन्फेशनचा वा सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न दिसत नाही. तर आपल्या लढाईमध्ये आपण कसे तरलो हे जिंकण्याच्या अहंगंडापेक्षा साधेपणानं सांगण्याचा सूर सापडतो म्हणूनच हे ‘उघडलेलं पुस्तक’ वाचनीय ठरतं.
पुस्तक उघडलं, सुमेध वडावाला (रिसबूड)
नवता प्रकाशन, 300 रु. फक्त