आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंतर मोजण्‍याची पट्टीः रुपविकारी तारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किती? या प्रश्नांत अनेक रहस्ये दडली आहेत. हा प्रश्न विचारला गेला नसता तर माणूस ज्ञानाला आणि माहितीला मुकला असता. माणसाला विश्वाचे दर्शन होऊ लागले. त्याला चंद्र दिसला, जागा बदलणारे ग्रह दिसले, धूमकेतू दिसले, दुर्बिणीच्या शोधानंतर तारकागुच्छ, तेजोमेघ, दीर्घिका याही गोष्टी स्पष्टपणे पाहता आल्या. अंतराळातील या सर्व गोष्टी आपल्यापासून किती दूर आहेत या प्रश्नातून माणसाने किती तरी उचापती केल्या. गणिताची मदत घेतली, निरीक्षणांवर गणिताचे संस्कार केले. तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या मदतीने मापन अचूक आणि सूक्ष्म करता येऊ लागले. अंतर मोजण्यासाठी त्याने पराशय पद्धत शोधून काढली. त्यावरून सूर्य साधारण 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे हे कळले. तारे तर त्याहीपेक्षा दूर. त्यांचा पराशय कोन तर विकलेपेक्षाही कितीतरी लहान असतो. तरीसुद्धा 1837 च्या सुमारास हंस तारकापुंजातील 61 क्रमांकाच्या तार्‍याचे अंतर मोजण्यात माणसाला यश आले. या पद्धतीने 61 क्रमांकाच्या तार्‍याचे अंतर साधारण 17 प्रकाशवर्षे इतके येत होते. सूर्य, पृथ्वी अंतराच्या साधारण 63 हजार पट म्हणजे 15 कोटी किमी अंतराची 63 हजार पट म्हणजे एक प्रकाशवर्ष अंतर होते. मग आता 11 प्रकाशवर्षे अंतर म्हणजे किती अंतर याचा तुम्हीच हिशेब करा. पॅरलॅक्स किंवा पराशय मोजून फार तर 200 ते 300 प्रकाशवर्षे अंतर बर्‍यापैकी अचूक कळू शकते. परंतु बरेच तारे दीर्घिका, तारकागुच्छ या गोष्टी तर प्रचंड अंतरावर आहेत मग यांचे अंतर कसे काढणार? यासाठी तार्‍यांनीच मदत केली. कशी? ते समजावून घेण्यापूर्वी तार्‍याची दीप्ती आणि निरपेक्ष प्रत या गोष्टी समजावून घेऊ. तारा आपल्या पृष्ठभागावरून एकूण किती ऊर्जा उत्सजिर्त करतो त्यास त्याची दीप्ती म्हणतात.
तारा किती तेजस्वी दिसतो हे दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे तार्‍याची दीप्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे अंतर. तारा आपल्याला किती तेजस्वी दिसतो त्याला तार्‍याची दृश्य प्रत म्हणतात. तार्‍याचे अंतर वाढविले तर तार्‍याची तेजस्विता कमी होते ते उघड आहे. तारा 32.6 प्रकाशवर्षे अंतरावर किती तेजस्वी दिसतो त्यास तार्‍याची निरपेक्ष प्रत म्हणतात. तार्‍याची दीप्ती कळली तर तार्‍याची निरपेक्ष प्रत कळू शकते. निरपेक्ष प्रत आणि दृश्य प्रत यावरून मग तार्‍याचे अंतर कळू शकते. वृषपर्वा तारकापुंजात आपले तेज कमी जास्त करणारा तारा आहे. किमान तेजस्विता मग कमाल म्हणजे जास्तीत जास्त तेजस्विता आणि पुन्हा किमान तेजस्विता या कालावधीस आवर्तन काळ म्हणतात आणि तेजाची धरणी-जारणी करणार्‍या तार्‍यांना रूपविकारी तारे म्हणतात. 1782 मध्ये गुडरिक नावाच्या तरुणाने असा एक रूपविकारी तारा वृषपर्वा म्हणजे सीफियस नावाच्या तारकापुंजात शोधला. लोहाराच्या भात्याप्रमाणे हा तारा आपले आकुंचन-प्रसरण करतो म्हणून मग असे तारे 'सीफाइड व्हेरिएबल' तारे म्हणून ओळखू जाऊ लागले.

आपल्या दक्षिण आकाशात 'मॅगेलानी क्लाऊड' नावाच्या दोन दीर्घिका आहेत. त्यातील छोट्या दीर्घिकेत सीफाइड प्रकारचे रूपविकारी तारे हेन्रीटा लेव्हिट नावाच्या खगोल विदुषीने शोधून काढले. 1912 सालच्या सुमाराची ही गोष्ट आहे. आता हे तारे एकाच दीर्घिकेमध्ये असल्यामुळे साधारण समान अंतरावर आहेत असे समजण्यास काहीच हरकत नव्हती. या विदुषीने या सर्व तार्‍यांचा आवर्तनकाळ शोधून काढला आणि तिने तार्‍यांचा आवर्तनकाळ आणि दीप्ती यांचा आलेख मांडला आणि एक आश्चर्यकारक गोष्ट या विदुषीच्या लक्षात आली. ज्यांचा आवर्तनकाळ जास्त आहे त्यांची दीप्तीसुद्धा जास्त आहे हे लक्षात आले. या निष्कर्षाने आपले फार मोठे काम झाले. सीफाइड प्रकारच्या एखाद्या तार्‍याचा आवर्तनकाळ कळला की त्याची दीप्ती कळू लागली. त्यावरून त्याची 32.6 प्रकाशवर्षे अंतरावरची तेजस्विता प्रत म्हणजे निरपेक्ष प्रत समजू शकते, निरपेक्ष प्रत आणि दृश्य प्रत यावरून त्याचे अंतर कळू शकते. म्हणजे या संशोधनामळे तार्‍यांचे किंवा दीर्घिकांची अंतरे आपल्याला सहज काढता येऊ लागली. आता हेच पाहा 'डेल्टा सीफियस' या तार्‍याच्या 5.3 दिवसाच्या आवर्तनावरून त्याची निरपेक्ष प्रत कळू शकली त्यावरून 32.6 प्रकाशवर्षे अंतरावर आज दिसतो त्याच्या साधारण 1000 पट तेजस्वी दिसला असता असे कळू शकले यावरून त्याचे अंतर साधारण 1031 प्रकाशवर्षे इतके येते. अशाच प्रकारच्या सीफाईड रूपविकारी तार्‍यांचा अभ्यास करून सेंटॉरस (नरतुरंग) तारकापुंजातील ओमेगा या तारकापुंजाचे अंतर 20 हजार प्रकाशवर्षे ठरविण्यात आले. अतिदूरची अंतरे मोजण्याचे एक साधनच या संशोधनाच्या आणि तार्‍याच्या निमित्ताने आपल्या हाती लागले. 'लेव्हिट' बाई आणि डेल्टा सीफियस तारा यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत नाही का?