आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Intellectual Lazy, Poor Performance Of Marathi Language Activities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बौद्धिक आळस, भाषाहीनतेमुळेच सुमारीकरणाच्या विळख्यात मराठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या ‘मिळून सा-याजणी’ या साहित्य-महिलाविषयक मासिकाचा रौप्यमहोत्सव नुकताच पुण्यात साजरा झाला. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रयोगशील नाटककार महेश एलकुंचवार या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘आपली भाषाहीनता’ या विषयावर या वेळी एलकुंचवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या भाषणाचा सारांश -


शब्द, संज्ञांचा सैलपणाने वाढता वापर :
सगळेच लेखक विचारवंत असतात असा गैरसमज आपल्याकडे आहे. ‘विचारवंत’ ही संज्ञा अत्यंत सैलपणे वापरली जाते. पुरोगामी असणे वेगळे आणि ‘मूलगामी विचार’ करणे यातला फरकच आपण विसरलेलो आहोत. त्यामुळे चित्रपट, नाटक, साहित्य, शिक्षण या क्षेत्रातले सगळेच लोक ‘विचारवंत’ झाले आहेत. ख-या विचारवंताची लक्षणे आपण विसरलो आहोत. प्रत्यक्षात आज कोणी खरा विचारवंत शोधायला गेले तर उत्तर नकारार्थीच येईल. ‘प्रतिभावंत’ हा असाच दुसरा एक शब्द आहे. आजकाल सगळेच ‘प्रतिभावंत’ झालेले पाहायला मिळतात. ‘गुणी’ आणि ‘प्रतिभावंत’ यातलाही फरक कळेनासा झालाय. शतकानुशतकांमध्ये एखादा ‘प्रतिभावंत’ जन्माला येत असतो. ‘दिग्गज’ या शब्दाचेही असेच. एकूणच या महाराष्ट्रात ‘विचारवंत’, ‘प्रतिभावंत’ आणि ‘दिग्गज’ माणसांची इतकी खेचाखेची झाली आहे, की कोणी ‘सामान्य’ उरलेय का, असाच प्रश्न निर्माण होतो. असे अतिशयोक्तीपूर्ण बोलण्याची इच्छा का होते आपल्याला? कारण स्वत:बद्दल खात्री उरलेली नाही. आत्मविश्वास नाही. ‘दिग्गज’, ‘प्रतिभावंत’ म्हटले जाते त्यांचे मूल्यमापन केले तर लक्षात येते की ‘हे तर कालच झाले होते आणि तरी आज आपण विसरलोय.’


वारसा पुढील पिढीस देण्यात आपण अपयशी, एकही वाक्य शुद्ध-संपूर्ण मराठीत बोलता येत नाही :
हल्लीची तरुण पिढी ज्या पद्धतीने बोलते ते पाहून यातना होतात, पण दोष त्यांना देता येणार नाही. माझीच पिढी त्यांना वारसा देण्यात कमी पडली. स्वभाषा न आल्याने नजिकच्या भूतकाळापासून आपण दूर सरकतो आहोत. हा विचित्र घोटाळा निर्माण झाला, त्याला माझी पिढीच जबाबदार आहे. खरे तर स्वभाषा उत्तमपणे बोलता येणे हा सुसंस्कृतपणाचा पहिला निकष, पण मालिकांमध्ये काम करणा-यांच्या मुलाखती ऐकल्यावर असे कळते की यातल्या एकालाही स्वच्छ मराठीत एक वाक्यही बोलता येत नाही.


नागर भाषा निर्माण, ‘आपटणे’, ‘धुपटणे’, ‘खंगाळणे’ हे शब्द धुलाईयंत्र आल्याने गायब :
अवतीभवती जे ऐकतो त्याची किती सरमिसळ व्हावी याला सुमारच राहिलेला नाही. राज्यात नागरीकरणाची प्रक्रिया वेगाने झाली. वेगवेगळ्या प्रकारची नागर भाषा निर्माण झाली. लोकजीवन नाहीसे होत चालले आहे. मातीशी संपर्क तुटतोय. खेड्यात अजूनही भाषा ब-यापैकी शिल्लक असली तरी खेड्यांमधली चित्रमय, नादमय भाषाही संपत चाललीय. पाश्चात्यांकडून आपण यंत्रे घेतली. या यंत्रांबरोबर आलेले शब्द घेतले. त्यामुळे कित्येक शब्द नाहीसे होताहेत. कपडे धुण्याचे एक यंत्र (वॉशिंग मशीन) घरात आल्यानंतर ‘आपटणे’, ‘धुपटणे’, ‘खंगाळणे’ हे शब्द गायब झाले. मराठी भाषा आटत चाललीय. त्यात पुन्हा अर्धे शब्द आपण इंग्रजी घालणार. हे धोक्याचे आहे.
मागे एक मुलगी मला विचारू लागली ‘आय वॉँट टू बी अ रायटर’. मी प्रश्न केला, ‘बाई, तुला इंग्रजीत लिहायचे की मराठीत?’ मी म्हणालो, ‘मग मराठीत बोल ना आधी.’ लेखन ही अत्यंत कठीण प्रक्रिया आहे.


आगरकर, राजवाडे, दुर्गा भागवत, शेजवलकर वाचले पाहिजेत, आपण अभिजाततेपासून दूर :
इतक्या वर्र्षांनंतर माझ्या लक्षात आलेय की मला काहीच माहिती नाही. आपले अनेक शब्द परंपरेशी संलग्न असतात. भाषा वापरताना बेसावधपणे वापरता येत नाही. प्रत्येक शब्दाचा इतिहास काय आहे, हे लक्षात घेऊन लिहिले पाहिजे. यासाठी गोपाळ गणेश आगरकर, वि. का. राजवाडे, त्र्यं. शं. शेजवलकर, दुर्गा भागवत यांचे मराठी वाचले पाहिजे. ती मराठी माहिती नसेल तर परंपरेशी असलेला संबंध सुटतो. ‘गुणी’ आणि ‘प्रतिभावंत’ यातला फरक जिथे कळत नाही, तिथे सुमारीकरणाला सुरुवात होते. तसे पाहिले तर आपल्या अभिरुचीची घसरण शंभर वर्षांपूर्वीच सुरू झाली. श्रीधर व्यंकटेश केतकर होते आणि ना. सी फडकेही होते, पण केतकर आजही वाचावेसे वाटतात. ‘फडके युग’ त्यांच्याच हयातीत नाहीसे झाले. अभिजाततेपासून आपण दूर चाललो आहोत. मराठी लिहायचे तर ज्ञानेश्वर, तुकारामांची ओळख करून घ्यायला पाहिजे. लोकजीवनाशी संबंध ठेवायला हवा. इंग्रजी बोलत असाल तर त्याला हरकत नाही. पण त्याही भाषेतली अभिजात माहिती नसते.


मातृभाषा न बोलता येणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे असे वाटतच नाही :
मुळात मातृभाषा न बोलता येणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे आपल्याला वाटतच नाही. या सगळ्यातून सामान्यपणाला मोठे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. मला कोणी ‘महान’ लेखक म्हटले की मेल्यासारखे वाटते. मराठीत काय ‘महान’ होऊन गेले याची मला जाण आहे. हल्ली वर्तमानपत्रांमधून किती लोक लिहितात? हे सगळे ‘साहित्य’ आहे असे लिहिणा-या-वाचणा-यांचा समज झाला तर मात्र गंभीर स्थिती आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या शंभर वर्षांत किती मूलगामी साहित्य मराठीत निर्माण झाले? महाराष्ट्रातले अखेरचे विचारवंत र. धों. कर्वे होते. आता महाराष्ट्रातात कोणी विचारवंत उरलेला नाही. नुसती मते व्यक्त करणारा विचारवंत नसतो. जो विचारवंत असतो तो स्वत:च्या विचारांप्रमाणे कामही करतो. ‘र. धों.’ची भाषा साधी-सोपी, सुबोध होती. ते आचार-विचारांनी बंडखोर, पुरोगामी होते, परंतु भाषेशी आणि परंपरेशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नव्हती.


अभिजातता काय ते समजून घ्या, इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द तयार होत नाही :
अभिरुचीची इतकी घसरण सुरू आहे, की अभिजात म्हणजे काय हेही आम्हाला कळेनासे झालेय. ‘आपण सामान्य आहोत,’ याचा संकोच वाटायला हवा. पण लोकांना त्याचाही अहंकार वाटतो. ‘आम्ही काय बुवा, आपले साधे, सामान्य’ याचाही लोक बडेजाव मिरवतात. इंग्रजी माध्यमातून शिकल्याने मराठी खराब होते, हे खरे नाही. इंग्रजी आलेच पाहिजे. सुंदर इंग्रजी बोला.


आपण भाषा नीट वापरत नाही म्हणून सगळे घोटाळे होतात, पण आपल्या लोकांना विलक्षण बौद्धिक आळस आहे. इंग्रजीतल्या शब्दांना मराठीत प्रतिशब्द तयार करत नाही आपण. याचे कारण काय तर काहीही केले तरी चालते, अस्सल खणखणीत नाणे नसले तरी चालते अशी भावना झाली आहे. हे चित्र जोपर्यंत कायम आहे तोवर सांस्कृतिक पोत विसविशीतच राहील.


मराठीत भेसळ वाढली, प्रसिद्धिमाध्यमांच्या मुबलकतेमुळे सगळे खपतेय :
प्रसिद्धिमाध्यमांच्या मुबलकतेमुळे सगळा विक्रेय माल खपतोय. लेखन, गाणं, चित्रकला, अभिनयाचे व्रत घेतलेल्यांनी जबाबदारीने वागले तर मराठीत भेसळ होणार नाही. मी सुमारीकरणाला बळी न पडण्याचा प्रयत्न करतोय. खूप जुनं मिळवून वाचतो तेव्हा कळतं आपण काहीच लिहिलं नाही. आता कुठे आपली सुरुवात होतेय.


एलकुंचवारांबद्दल थोडेसे...
त्रिधारा नाट्यप्रकाराच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारे नाटककार साहित्यिक म्हणून महेश एलकुंचवार यांच्याकडे पाहिले जाते. ‘मौनराग’ या ललित लेखसंग्रहाने एलकुंचवार मराठी साहित्यात वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचले. ‘युगान्त’साठी त्यांना 2002 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. सन 1987 मध्ये त्यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला राज्य सरकारने सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवले. ‘सरस्वती सन्मान’, ‘नागभूषण’, ‘जी. ए. सन्मान’, ‘जनस्थान’ आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. सुलतान, मग्न तळ्याकाठी, गार्बो, वासनाकांड, प्रतिबिंब ही त्यांची काही गाजलेली नाटके होय.


शब्दांकन : सुकृत करंदीकर