आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकस्वामीजींनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेत आपल्याला इंटरव्ह्यूला बोलावलंय याचा निर्मलाला मनस्वी आनंद झाला. स्त्रीशिक्षण आणि स्त्री-उद्धारासाठी कार्य करणा-या स्वामीजींच्या नावे चालणा-या या ध्येयवादी संस्थेत निवड झाली तर आपण आपली विद्वत्ता, अध्यापन कौशल्य पणाला लावून उत्तम कार्य करू. संस्थेच्या नावलौकिकात भर घालण्याचा निर्धार तिने मनोमन केला होता.

‘गुड, गुड!’ निर्मलाच्या कागदपत्रांवरून नजर फिरवत श्यामराव वकील उतरले. त्यांनी फाइल संस्थेचे अध्यक्ष सेठ घनश्यामदासजींकडे दिली. श्यामराव या संस्थेचे सचिव आणि शहरातील निष्णात वकील होते. सेठ घनश्यामदासजी फाइल पाहत होते. निवड समितीतील तिसरे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अष्टपुत्रे यांनी प्रश्न केला, ‘तुमच्या बायोडेटामध्ये तुम्ही एमपीएससी परीक्षेत पास झाला होतात असं लिहिलंय. मग तुम्ही सरकारी सेवेत का गेला नाहीत?’
हा प्रश्न निर्मलासाठी काहीसा अनपेक्षित होता. प्राध्यापकीसाठी इंटरव्ह्यू आहे, तेव्हा त्या विषयाबाबतच विचारले जाईल, अशी तिची अपेक्षा होती. त्यासाठीच्या अटींची पूर्तता तिने केलेली होती. परंतु प्राचार्यांनी एमपीएससीबाबत विचारले. निर्मला बोलू लागली. ‘होय सर. मी एमपीएससी पास झाले. माझी उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती. त्या वर्षी अशी निवड होणारी मी आपल्या जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार होते; परंतु सासरच्यांचा सरकारी नोकरीस विरोध होता. त्यामुळे निवड होऊनही मला संधी सोडावी लागली!’

निर्मलाने विनम्रपणे आणि नेमकेपणाने उत्तर दिले. आपल्या एमपीएससी परीक्षेतील सुयशाची ही निवड समिती आस्थेने चौकशी करतेय याचे समाधानही तिला वाटते; परंतु आपण त्याच वेळी हिंमत दाखवायला हवी होती. सासरच्यांचा, नव-या चा विरोध झुगारून सरकारी सेवेत जायला हवं होतं ही विषादाची जाणीवही तिला झाली. सेठ घनश्यामदासजींनी काहीच प्रश्न विचारले नाहीत. त्यांचे पिताश्री स्वामीजींचे अनुयायी होते. स्वामीजींच्या कार्यात ते सहभागी होते. चौथे सदस्य आणि विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून झालेले डॉ. प्रतापराव काळे हे विद्यापीठीय राजकारणातले एक वजनदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी निर्मलाला विषयाशी संबंधित काही जुजबी प्रश्न विचारले. चारी सदस्यांनी एकमेकांकडे पाहिले.

‘ओके मॅडम! आम्ही इतर उमेदवारांच्या मुलाखतीनंतर पुन्हा तुम्हाला बोलावू. तोपर्यंत तुम्ही बाजूच्या खोलीत बसा. थँक यू!’ आपल्या भारी चष्म्याच्या फ्रेममधून पाहत सेठ घनश्यामदासजी म्हणाले. निर्मला उठली. थँक यू व्हेरी मच म्हणाली. हे काय, झाला इंटरव्ह्यू? यांनी तर काहीच प्रश्न विचारले नाहीत. का अगोदरच कोणा उमेदवाराची निवड त्यांनी करून ठेवलीय? प्राध्यापकाच्या जागेसाठी लाख्खो रुपयांचे डोनेशन संस्थाचालक मागतात. तसे यांनी मागितले तर? आपण ते देऊ शकणार नाही. आपल्या तत्त्वातही ते बसत नाही.

पण नोकरीची तर आपल्याला नितांत गरज आहे. विशेषत: त्या नालायक नव-या शी काडीमोड घेऊन विभक्त झाल्यानंतर, स्वावलंबी होणे आवश्यक आहे. मुलगीही अजून खूप लहान आहे. काय होणार आपले? त्याच वेळी आपण सरकारी नोकरी का जॉइन केली नाही? आता तर सरकारी नोकरीची वयोमर्यादाही आपण ओलांडली आहे. निर्मलाच्या मनात अनेक उलटसुलट विचारांचे काहूर माजले. दरम्यान, इंटरव्ह्यू कमिटीने अन्य उमेदवारांचे इंटरव्ह्यू आटोपले आणि त्यांनी निर्मलाला पुन्हा बोलावले.

‘या मिसेस निर्मला!’ श्यामराव वकिलांनी तिचे स्वागत केले. काही क्षण नुसतेच गेले. कोणीच काही बोलेना, जणू कसला तरी ताण आणि अवघडलेपणा प्रत्येकाला जाणवत होता. शेवटी अध्यक्ष सेठ घनश्यामदासजींनीच बोलायला सुरुवात केली.
‘ऐसा है निर्मलाजी, आपका बायोडेटा सबसे अच्छा है, लेकिन...’
‘लेकिन क्या सर?’ शेठजींचा घुटमळणारा स्वर पाहून निर्मलानेच त्यांना प्रश्न केला. त्याने सेठजी काहीसे गोंधळले आणि ते वकील श्यामरावकडे पाहू लागले. चाणाक्ष श्यामरावांनी सेठजींची अवस्था तत्काळ ओळखली आणि ते बोलू लागले.
‘म्हणजे असं आहे निर्मलाजी, तुमची गुणवत्ता, क्षमता पाहता तुमचीच निवड करावी, असं आम्हा सर्वांना वाटतं; परंतु तुमच्यासारख्या महिलेला संस्थेत घेणं म्हणजे...’

‘तुमच्यासारखा महिलेला? व्हॉट डू यू मीन मिस्टर श्यामराव?’ श्यामरावांचे वाक्य अर्धवट तोडत निर्मलाने प्रश्न केला. तिच्या स्वरात आता एक वेगळीच धार आली होती. आपला उल्लेख हे लोक ‘तुमच्यासारख्या महिलेला’ अशा शब्दांत करताहेत हे तिला विलक्षण खटकले होते. निर्मलाचा प्रश्न व स्वरातील धार पाहून श्यामरावही वरमले. आवाजात शक्य तितके मार्दव आणत ते पुढे बोलू लागले.

‘तुम्ही रागावू नका मिसेस निर्मला! तुमच्यासारख्या म्हणजे... आय मीन... नव-या नं सोडलेल्या महिलेला...’
‘नव-या नं सोडलेल्या? मी कायदेशीररीत्या घटस्फोट घेतलेला आहे, मिस्टर श्यामराव. आणि त्यात काही गैर नाही. तुम्ही स्वत: एक वकील आहात. मी जे केलं ते सर्व कायदेशीरच आहे मिस्टर श्यामराव!’ निर्मलानं ठामपणे आपली बाजू मांडली. एक बाई नव-या ला घटस्फोट देते, स्वतंत्र राहते यात तिची काहीच चूक नाही. मग श्यामरावसारख्या वकिलानं असं का बोलावं हे तिला कळेना. निर्मलास काय उत्तर द्यावे ते श्यामरावलाही कळेना. ते स्वत:च्या बचावासाठी केविलवाणे समर्थन देऊ लागले.

‘... नाही म्हणजे, अशा महिलांबद्दल समाजात चांगलं बोललं जात नाही. त्यांना संस्थेत घेणं म्हणजे...’
‘इनफ मिस्टर श्यामराव! संस्था तुमची आहे, नोकरी द्यायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता; परंतु माझ्याबद्दल असं सैल बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. नोकरीसाठी डोनेशन द्या, असं तुम्ही म्हणाला असतात तर मला त्याचं काही वाटलं नसतं; पण केवळ बाजारगप्पांच्या आधारे एखाद्या स्वाभिमानी महिलेला असं बोलणं तुम्हाला शोभत नाही! ज्या स्वामीजींच्या नावे तुमची ही संस्था आहे, त्या स्वामीजींनी आयुष्यभर महिलांचा स्वाभिमान आणि त्यांचे सबलीकरण यासाठीच कार्य केलं होतं हे विसरू नका. त्यांचा वारसा सांगणारे तुम्ही सगळे लोक इतक्या क्षुद्र विचारांचे असाल असं मला वाटलं नव्हतं! थँक यू अँड गुड बाय!’

एवढे बोलून ताठ मानेनं निर्मला बाहेर पडली. आज सर्वच महान लोक तसबिरींपुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा सांगणा-या ची लायकी त्या तसबिरीच्या आडोशाने जगणा-या पालींएवढीही नाही हे तिला जाणवलं. आणि आपण खासगी शिकवण्या करू, काय वाटेल ते करू; पण या ढोंगी, क्षुद्र पालींचे भक्ष्य आपण बनायचे नाही हा निर्धार निर्मलाने केला.

madhurimadm@gmail.com