आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोची होते ती इथेच...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वाट्टेल ते प्रश्न विचारण्याचा अधिकार या एक्स्पर्ट समजणार्‍या लोकांना देते कोण?’ इंटरव्ह्यू झाल्यावर संतापातिरेकाने बाहेर पडलेल्या धवलला वडिलांशी काय बोलावे, तेच सुचत नव्हते. जॉब मिळवायचा तर मुलाखत महत्त्वाची. पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश, तरी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार... ही कोणती सिस्टिीम? सतत आपल्याला कोणी न कोणी तपासत राहणार. ‘असे प्रश्न तरी कोणते विचारले, ज्याचा तुला एवढा राग यावा?’ वडिलांना कळेना.

‘स्वातंत्र्यापूर्वी कोणत्या चळवळी झाल्या, राजकीयदृष्ट्या अमुक राज्यांचे महत्त्व, संस्कृतीची जपणूक म्हणजे काय, काय वाट्टेल ते... या सगळ्याचा एम.बी.ए.शी काही संबंध आहे का?’
‘बाकी काही विचारले नाही?’
‘तसे कॉर्पोरेटबद्दल, मॅनेजमेंट स्किल्ससंदर्भात विचारले. पण...’
‘म्हणजे, ज्या प्रश्नांची तुला उत्तरे आली नाहीत, त्याचा राग तुला आहे.’
‘नाही, म्हणजे भूतकाळ लक्षात ठेवायला हवाय का? आज काय चाललंय, ते विचारा की.’
‘खरंच, आज जे चाललंय, जगात, भारतात, ते तुला माहितीये...? तू सांग मला, काय वाचतोस तू? रोज तुझ्यापुढे पेपर आणून ठेवतो. तू काय वाचायला हवे, ती पाने समोर ठेवतो, तू कायम नजर फिरवतोस. हे ऐक, ते पाहा, हे चांगले व्याख्यान आहे, चल ऐकायला म्हटले की, तू बोअर करू नका, असं म्हणायचास... पण त्याचा तुला आज फायदा झाला असता...’
‘मुळात हे हवंय कशाला? ‘जनरल नॉलेज’ असणे म्हणजे, चळवळी आणि संस्कृती माहीत असणे असे थोडीच... जी नावे ऐकली नाही, ज्या सालांची आकडेमोड शाळेत विसरून गेलो, ते काय आठवत राहायचे... उगाच?’
‘तुला उत्सुकता नाही, आपली जशी जडणघडण, तशी या देशाची, प्रदेशाची, कशी झाली असेल? अरे, स्वत:ची मुळं शोधणारे अनेक जण जगभर फिरतात, शोध घेतात इतिहासाचा, संस्कृतीचा.’
‘असतील, पण मला जे येते, ते यांच्यापैकी किती जणांना येत असेल? कोणताही मोबाइल हातात द्या, कुठलीही बाइक द्या, लॅपटॉप द्या, मी काय करतो कमाल... माहीत आहे न तुम्हाला?’
‘हे तू सांगितलेस का त्यांना? कसे कळणार तुला काय येते, काय नाही? जे तुला महत्त्वाचे वाटते, ते तू बोलायला हवे होतेस...’
‘मी स्वत:ला शहाणा समजतो, असे वाटले असते त्यांना...’
‘हे तूच ठरवले... जेव्हा स्वत:बद्दल बोला, असे सांगतात; तेव्हा नाव नि शिक्षणाशिवाय काही सांगता येत नाही. असे का? भरभरून बोलायचे की. आपले छंद, आवडी-निवडी, जगण्याच्या कल्पना... मला सांग, तुला येतील या प्रश्नांची उत्तरे?’
‘जगण्याच्या कल्पना वगैरे फार अवघड वाटते... हे काही ठरवले नाही...’
‘भविष्य म्हटले की, विचार केला नाही... भूतकाळ म्हटले की, संपून गेल्याचा विचार कशाला... असा युक्तिवाद करायचा. खरे तर तुला तुझाच विचार करायचा आहे. जो करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात; म्हणजे वाचन, निरीक्षण. ज्याचा तुला अत्यंत कंटाळा. माणसे आजूबाजूला असतात, खूप काही करत असतात, त्यांच्यापर्यंत पोहोचायचे असते. पुस्तकातून, व्याख्यानातून, लेखांमधून... हीच माणसे देशाला बदलण्याची भाषा करतात, काहींमुळे देश खरोखर बदललेला असतो. पण तुला ते जाणून घेण्यात इंटरेस्ट नसतो.’

‘तसे नाही, हे सारे अभ्यास म्हणून करावे लागणार आहे, असे जाणवले की कंटाळा येतो. एक खरे, माझे वाचन फार कमी, म्हणजे जवळजवळ नाहीच. प्रश्न नेमके काय वाचलंय, त्यावरच...’
‘हा राग सिस्टिमचा नसून स्वत:चा आहे. हे तरी मान्य आहे न तुला?’
‘असू शकेल. प्रत्येक मुलाखत दडपण आणते. दर वेळेस आपल्याला काही येत नाही, हे नव्याने जाणवते. आदल्या दिवशी अभ्यास करून काही होत नाही. वर्षभर जे करायला हवे होते, ते न केल्याचे दु:ख होते. आता जे बोलला तुम्ही, ते खोटे नव्हते, मान्य आहे मला. पण कचरा झाला चारचौघांसमोर की त्रास होतोच.’

‘तरीही जॉब मिळायला हवा, प्रवेश व्हायलाच हवा, हा आग्रह असतो तुम्हा सर्वांचा. या उलट एखादा खेड्यातला, अगदी दुर्गम-मागासलेल्या प्रदेशात राहणारा तरुण शहरी भागात शिकायला जायचे म्हटल्यावर स्वत:ला बदलतो. प्रचंड तयारी करतो. मात्र, त्यातलाच कुणी तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबर स्वत:च्या जगण्याचा अभिमान बाळगत आपलाच ठसा या तज्ज्ञ मंडळींवर उमटवतो. हे तो करू शकतो, कारण जगण्याच्या त्याच्या कल्पनेत भूतकाळाचा हात वर्तमानाने धरलेला असतो. भविष्य अगदी सुस्पष्ट असते. जे मिळते ते परिश्रमाने, हे त्याला ठाऊक असते...’

‘समजतंय, तुम्ही काय म्हणता ते... गोची होते ती इथेच! घडून गेल्यावर जाणीव होते. थोडी अगोदर झाली असती तर इंटरव्ह्यू चांगला दिला असता.’