आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Arun Sadhu, Yashwantrao Chavan eka Vadalachi Bakhar

हे यशवंतरावांशी जोडलेल्या इतिहासाचे विश्लेषण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ हा केवळ इतर चित्रपटांसारखा चित्रपट नव्हता. विशिष्ट वर्तुळातील प्रेक्षकांना खुश करणारा चरित्रपटही नव्हता. हे यशवंतरावांशी जोडल्या गेलेल्या इतिहासाचे विश्लेषण होते, आजच्या राजकीय संस्कृतीवरचे कठोर भाष्यही होते... चित्रपट लेखनामागील भूमिका स्पष्ट करणारी ज्येष्ठ संपादक-लेखक अरुण साधू यांची ही मुलाखत.

दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत काम करण्याची आणि इतिहास पुरुषांवर आधारित चरित्रपट लिहिण्याची ही तुमची दुसरी वेळ आहे. यामागे निश्चित असा तर्क वा विचार होता का?
डॉ. आंबेडकर असो वा यशवंतराव; या दोन्ही नेत्यांबद्दल माझ्याजवळ सांगण्यासारखे पुष्कळ आहे. दुस-या कोणालाही त्यांच्यावर खोल जाऊन चित्रपट निर्माण करण्याची तयारी नव्हती. जब्बार पटेल हे दोन्ही विषय तपशिलात जाऊन हाताळू शकतो, ह्याची खात्री होती. त्याचा महाराष्‍ट्राच्या संस्कृतीचा, समाजकारणाचा आणि राजकारणाचा सखोल अभ्यास आहे. चित्रपटासाठी तपशील गोळा करण्याची जिद्द आहे. शिवाय माझी जशी या सर्व विषयांबद्दलची ठाम मते आहेत, तशी त्याची आहेत. त्याची जास्तीत जास्त तपशील टाकण्याची हौस पसंत नसूनदेखील विषयाच्या गाभ्याचे आमचे आकलन परस्परांस पटू शकते. आणि तरीही तो अशा विषयांना न्याय देणारा दिग्दर्शक आहे, असे मला वाटते. फार कमी लोकांमध्ये सर्जनशीलता सांभाळून चित्रपट करण्याची ताकद असते. शिवाय भारतात ज्या वातावरणात चित्रपट तयार करायचे असतात, त्यामध्ये अनेक बाजूंनी निर्माता आणि दिग्दर्शकावर दडपण येत असतं. ते सारं सांभाळून आपल्याला काय सांगायचे हे, ते जब्बार परिणामकारकपणे सांगतो. एरवी, यशवंतराव चव्हाण, डॉ. आंबेडकर, न्यायमूर्ती रानडे, आणि ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील ऑथेंटिक चित्रपट लिहिणे, ही मला नेहमीचआव्हानात्मक गोष्ट वाटत आली आहे.
चित्रपटाची पटकथा लिहिताना यशवंतरावांचा नव्याने शोध घेण्याचे आव्हान तुमच्यासमोर होते. ही प्रक्रिया कशी उलगडत गेली?
माझ्या पसंतीला उतरतील, अशा प्रकारच्या सर्जनशीलतेने लिहिलेली, यशवंतरावांंच्या व्यक्तिमत्त्वाचा व योगदानाचा सर्वांगीण, परिपूर्ण ठाव घेणारी चरित्रे मराठीत व इंग्रजीत लिहिली गेलेली नाहीत. यशवंतरावांचे चरित्र लिहिण्याची संधी मिळण्याचा संभव असताना, मी त्याची तयारीदेखील सुरू करून त्यासाठी पुढची तीन ते चार वर्षे बाजूला काढून ठेवण्याचे गृहीत धरले होते. परंतु ती संधी गेली. अशा त-हेची, महापुरुषांची परिपूर्ण व अस्सल माहितीवर आधारित चरित्रे लिहिण्यासाठी वेळ द्यावा लागतो. संशोधनाचा आटापिटा करावा लागतो. चित्रपटासाठी संहिता लिहिताना उपलब्ध साहित्य व सर्वसाधारण संशोधन पुरेसे ठरते. ‘यशवंतराव चव्हाण’ चित्रपटासाठी पटकथा लिहिताना मी अनेक मुलाखती वाचल्या, यशवंतरावांवरचे जुने संदर्भ मिळवले. तपासून पाहिले. त्यातून यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व उभे करण्याचा प्रयत्न केला.
यशवंतरावांवर चित्रपट प्रदर्शित झाला. नव्या पिढीसाठी यशवंतराव एक इतिहासपुरुष आहेत. त्यांची या पिढीला जुजबी ओळख आहे. अशा वेळी पटकथा लिहिताना त्यामागची तुमची नेमकी भूमिका काय होती...?
हा नुसता चित्रपट किंवा माहितीपट नाही. अनावश्यक मोकळीक न घेता हा चित्रपट, ‘फिचर फिल्म’ प्रकारातला व्हावा, लोकांनी तो पाहावा, तो कालखंड समजून घ्यावा, हा माझा उद्देश होता आणि सुदैवाने जब्बारचाही हाच उद्देश होता. कर्तव्य म्हणून महाराष्‍ट्र सरकारने आर्थिक मदत देऊ केली आणि ‘यशवंतराव प्रतिष्ठान’कडे निर्मितीच्या उपक्रमाची हाताळणी सोपवली. चित्रपट पाहणा-यांना हे लक्षात येईल, या दोन्ही मर्यादांचे प्रतिबिंब चित्रपटात दिसत नाही. संयुक्त महाराष्‍ट्राच्या काळात यशवंतराव चव्हाण हे अत्यंत वादग्रस्त असे व्यक्तिमत्त्व होते. त्या वेळच्या वृत्तपत्रकारांनी, महाराष्‍ट्राच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, यशवंतरावांची गद्दार, सूर्याजी पिसाळ, नेहरूंचा पित्तू अशी भयंकर प्रतिमा करून टाकली होती. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्‍ट्रासाठी त्यांनी जे सर्जनशील काम केले, त्याने भारावून जाऊन अत्रे, डांगे, एस. एम. जोशी आदी त्यांचे विरोधकदेखील त्यांच्या प्रेमात पडले होते. पण जुन्या प्रतिमेला कवटाळून बसलेले पुष्कळ लोक अजून महाराष्‍ट्रात आहेत. यशवंतरावांचे साधे नाव घेतले, की त्यांचा तिळपापड होतो. महाराष्‍ट्राचा कलश यशवंतरावांनी आणला, असे कोणी म्हटले, तर संतापाने ते पेटून उठतात. संयुक्त महाराष्‍ट्रनिर्मिती समितीच्या चळवळीने मोठीच वातावरण निर्मिती केली होती, ही गोष्ट खरी आहे. संयुक्त महाराष्‍ट्रसमितीच्या सर्व नेत्यांचे महाराष्‍ट्राच्या निर्मितीत मोलाचे योगदान आहे. आणि हे सत्य जेवढ्या ठळकपणे या चित्रपटात दाखवले आहे, तेवढे कधीही कोणत्याही चित्रपटात किंवा लघुपटात किंवा चित्रवाणीवर आलेले नाही. पण जुन्या प्रतिमेचे अवशेष काही लोकांच्या डोक्यात शिल्लक असल्याने, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाला नावे ठेवणारे किंवा अनुल्लेखाने डोळे मिटून बसणारेदेखील लोक असतील, याची संपूर्ण जाणीव आम्हाला होती. त्यामध्ये दिग्दर्शकाने आजपर्यंत कुठेही कोणीही न वापरलेले तंत्र वापरले होते. ते कदाचित काही लोकांना पसंत पडणार नाही. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या दोन दिवसांतील अनुभवाने सांगतो; प्रेक्षक, तरुण वर्ग, मध्यम वर्ग, ज्येष्ठ नागरिक, तसेच बुद्धिवादी लोक चित्रपटाने भारावून जाताना दिसतात.
मुळात, हा चित्रपट म्हणजे, यशवंतरावांच्या जीवनाचे, राजकारणाचे व समाजकारणाचे विश्लेषणच आहे. त्यांच्या आयुष्यातल्या प्रमुख घटनांनवर जेवढा जोर आहे; तेवढाच जोर विश्लेषणावरही आहे, हे कदाचित काही प्रेक्षकांच्या लक्षात येईल. मुख्य म्हणजे, हे विश्लेषण आरडाओरड न करता ते सहजपणे यावे, असा प्रयत्न आहे. चित्रपट संपल्यानंतर सर्वसामान्य प्रेक्षकाला आणि ज्यांना या कालखंडाचा व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा, महाराष्‍ट्रनिर्मितीचा व घडणीचा काहीही परिचय नाही, अशांना या चित्रपटाने इतिहासाकडे मुख्यत: यशवंतरावांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे, असे मला जाणवते.
चित्रपटासाठी लिहिताना यशवंतरावांशी जोडल्या गेलेल्या घटना-प्रसंगांचा समकालीन घटना-प्रसंगांशी संगती लावण्याचा प्रयत्न केला का?
संगती आपोआप लागली आहे. आजची राजकारणाची घसरण, सुस्कृंतपणाचा अभाव आणि हुकूमशाही प्रवृत्तीला प्रोत्साहन, हे सगळं या चित्रपटांतून अधोरेखित झाले आहे.

तुम्ही यशवंतरावांचे राजकारण जवळून बघितले आहे. आजच्या राजकारणाकडे बघून त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली असती?
यशवंतरावांना वाईट नक्कीच वाटले असते. महाराष्‍ट्रातल्या राजकारणात सुसंस्कृतता आणण्याचा प्रयत्न करूनही हे घडतंय- याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली असती. मुख्य म्हणजे, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असती. परंतु तेही त्यांच्या व्यक्तिविशेषाच्या विरोधात आहे. कारण, राजकारणाला व सत्ताकारणाला लोकाभिमुख करून त्याला चांगले वळण लावण्यासाठी आणि संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी क्रियाशील लोकांनी, मध्यमवर्गाने राजकारण व सत्ता या दोन गोष्टींना अस्पृश्य मानता कामा नये. ही भूमिका त्यांनी वारंवार अधोरेखित केली होती.