आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Bindumadhav Khire About Need Of Partner In Relationship

प्रेमाचा, लैंगिक जोडीदार असणे ही नैसर्गिक गरज (रसिक विशेष)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने समलिंगी विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केला. या क्षणाची दखल घेण्यासाठी ‘व्हाइट हाऊस’ समलिंगी समूहाचे प्रतीक असलेल्या सप्तरंगात उजळून निघाले.
या घटनेचे जगभरात तसेच भारतातही पडसाद उमटले. त्या अनुषंगाने पुण्याच्या ‘समपथिक ट्रस्ट’चे संस्थापक संचालक, समलिंगी हक्क चळवळीचे कार्यकर्ते बिंदुमाधव खिरे यांची ही मुलाखत...

रसिक : तुम्ही करिअरची प्रारंभीची वर्षे अमेरिकेत घालवली आहेत. अमेरिकी समाज, एलजीबीटी समूह यांचेही तुम्ही जवळून निरीक्षण केले आहे. त्या संदर्भात नुकत्याच जाहीर निकालाबाबत, तुम्ही काय म्हणाल? सर्व जगाचं प्रतिनिधित्व करणारा, परंतु एकजिनसी नसलेला अमेरिकी समाज अशा प्रकारच्या विवाहाला सहजपणे मान्यता देईल, असे वाटते का?
१९९८ ते २००० या काळात जवळजवळ पावणेचार वर्षे मी अमेरिकेत होतो. स्वत:ला ‘गे’ म्हणून स्वीकारायला लागलो, तेव्हा हळूहळू मी सॅनफ्रान्सिस्कोला जायला लागलो. माझ्या गावापासून ते जवळ होतं. सॅनफ्रान्सिस्को हे समलिंगी लोकांचे मुख्य स्थान मानले जाते. पुण्यातील लक्ष्मी रोडप्रमाणे तिथे कॅस्ट्रो स्ट्रीट आहे. तिथे मी मित्रांबरोबर फिरायला लागलो. ‘त्रिकाेण’ या भारतीय लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो. हळूहळू समलिंगी संबंधाबाबत भारतीय लोकांचा दृष्टिकोन व अमेरिकन लोकांचा दृष्टिकोन याच्या विविध छटा दिसल्या. सर्व अमेरिकेतील भारतीय व अमेरिकन नागरिक उदारमतवादी आहेत, हा भ्रम खाेटा ठरला.
आपल्याकडे जसे काही उदारमतवादी, बरेचसे जण सनातनी आहेत, तसेच अमेरिकेतसुद्धा. वेस्टकोस्ट, इस्टकोस्ट (न्यूयॉर्कची बाजू) तिथे उदारमतवादी बरेच लोक सापडतात. तसेच मध्य अमेरिकेचा भाग, ज्याला ‘बायबल बेल्ट’ म्हटलं जातं, तिथे अत्यंत सनातनी वातावरण होतं. तिथेही समलिंगी द्वेष मोठ्या प्रमाणात दिसत होता. असं असलं तरीसुद्धा, अमेरिकेत कायदा मात्र हळूहळू समलिंगी लोकांच्या अधिकारांची जाण घेत होता. आणि त्याप्रमाणे विविध राज्यांतील न्यायालये समलिंगी लोकांच्या बाजूने निकाल देत होती. पण अमेरिकेत प्रत्येक राज्याची स्वतंत्र न्यायव्यवस्था असल्यामुळे सर्व राज्यांसाठी बांधील, असा हा कायदा आहे. या निमित्ताने अमेरिकन न्यायव्यवस्थेने समाजाला संदेश दिला आहे की, व्यक्तिश: लोकांना समलिंगी नाती मंजूर असोत वा नसोत, अमेरिकन कायदा हे मानतो की, समलिंगी लोकांना त्यांचे जोडीदार शोधण्याचा अधिकार आहे. तेवढेच नाही तर भिन्नलिंगी जोडप्यांसाठी जशी लग्नव्यवस्था व तिच्या सर्व सुविधा, कायदे, अधिकार व्यवस्था असते, ती समलिंगी जोडप्यांनाही मिळाली पाहिजे. याचा अर्थ असा की, लोकांना जी भीती वाटते की समलिंगी विवाह हे समाजाला घातक आहेत, अशाने समाजाचा ऱ्हास होईल, ही भीती चुकीची आहे. उलट कोर्टाचा निर्णय हे सांगतो की, अशा जोडप्यांनासुद्धा लग्नव्यवस्थेत सामावून घेताना लग्नव्यवस्था अजून बळकट होणार आहे. एकनिष्ठ नाती जोपासण्यास त्यांना या कायद्याचा अाधार मिळणार आहे. या विचारामागे सरळ साधी गोष्ट आहे की, प्रत्येक व्यक्तीला, त्याचा लैंगिक धर्म कोणताही असो, आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर आयुष्य जगण्याची इच्छा असते. शेवटी, आपली सुखदु:खं वाटण्यासाठी प्रेमाचा, लैंगिक जोडीदार असावा, ही प्रत्येकाची नैसर्गिक गरज आहे आणि अशा नैसर्गिक गरजेपासून विशिष्ट समाजातील लोकांना वंचित ठेवणे किंवा त्या नात्यांबद्दल भेदभाव करून ती नाती भिन्नलिंगी नात्यांपेक्षा कमी दर्जाची आहेत किंवा अपुरी आहेत, हे दाखविणे, हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे.
भारतामध्ये मात्र भा. दं. वि. सं. ३७७ कलमान्वये प्रौढांनी संमतीने खाजगीत केलेला समलिंगी संभोग हा गुन्हा मानला जातो. याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ३७७ हे कलम मूलभूत अधिकारांचे (कलम १४, १९, २१) उल्लंघन करते, असा निकाल दिला होता. दुर्दैवाने, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्दबातल ठरवला. आता या केसची क्युरेटिव पिटिशन सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. त्याला वर्ष होऊन गेले, तरी त्याच्या सुनावणीचा पत्ता नाही. जोपर्यंत ३७७ कलम बदललं जात नाही, तोवर समलिंगी लोकांसाठी लिगल पार्टनरशिप (म्हणजे विवाह शब्द न वापरता, कारण तो धार्मिक आहे, विवाहबद्ध जोडप्यांना ज्या कायद्यांच्या तरतुदी लागू होतात उदा. वारसा हक्क, घटस्फोट झाल्यास पोटगीचा अधिकार इ. तरतुदी प्रदान करणारा कायदा)साठी चळवळ सुरू करता येणार नाही. आणि म्हणून ३७७ कलम लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाकडून किंवा संसदेत बदलल्याशिवाय पुढचा मार्ग मोकळा होणार नाही. सध्याचे सरकार बघता ते या विषयाकडे किती उदारमतवादी दृष्टिकोनातून बघेल, ही शंका आहे. आरएसएसचा तर समलिंगी नात्यांना विरोध आहे. या पार्श्वभूमीवर आमची आता तरी अाशा क्युरेटीव पिटीशनवर आहे.

रसिक : कलम ३७७ अन्वये समलिंगी संबंधाना गुन्हा ठरवणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात तुम्ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या निर्णयावर अमेरिकी सरकारने पारित केलेल्या कायद्याचा प्रभाव संभवतो का?
हो. नक्कीच. अमेरिकन न्यायव्यवस्थेत होणारे बदल जगातील विविध देशांवर मोठा प्रभाव पाडतात. त्या निकालाची छाप नक्कीच राजकीय वर्तुळावर पडेल व जेव्हा क्युरेटिव पिटिशनची सुनावणी सुरू होईल, तेव्हा नक्कीच याचा संदर्भ पुढे ठेवला जाईल. भारत स्वत:ला ग्लोबल पॉवर म्हणतो. परंतु, अमेरिकेत कायदा किती प्रगतशील आहे, मानवी अधिकारांच्या दृष्टिकोनातून विविध समाजांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यास आपल्या देशाला अजून किती अंतर कापायचे आहे, यातील तफावत सहज लक्षात येईल.

रसिक : समलिंगी विवाह हे प्रकृतीच्या विरोधात, असे मानणारा मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. या समाजाच्या म्हणण्याचा प्रतिवाद तुम्ही कसा कराल?
समलैंगिकता ही अनैसर्गिक नसून, ती नैसर्गिक आहे. ती कोणतीही विकृती किंवा आजार नाही, हे इंडियन सायकॅट्रिक सोसायटीने नमूद केले आहे. अनेक प्राण्यांमध्येही समलैंगिकता आढळते. जर व्यक्ती समलिंगी असेल, तर तो लैगिक कल कोणत्याही मार्गाने बदलता येत नाही, जसं भिन्नलिंगी व्यक्तीला समलिंगी बनवता येत नाही तसं. मग प्रश्न उरतो की, समलिंगी पुरुषांनी आपली लैंगिकता लपवून स्त्रीशी विवाह करून तिला फसवायचे का? ही फसवणूक कोणत्या संस्कृतीला धरून राहील? आता समलिंगी लोकांनी निसर्गनियमाप्रमाणे समलिंगी जोडीदाराचा शोध घ्यायचा, की आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळायचं? आणि मग जर लैंगिक जोडीदार शोधायचा असेल, तर अनेक लैंगिक जोडीदार शोधायचे? जे पूर्वी भिन्नलिंगी समाज करायचा आणि अजूनही अनेक जण करतात. की समलिंगी लोकांनाही संसार करण्याची मुभा द्यावी? त्यांच्या संसाराला स्थैर्य द्यावं, संरक्षण द्यावं, जेणेकरून ते एकनिष्ठपणे संसार करायचा प्रयत्न करू शकतील. मला वाटतं, याचं उत्तर सोपं आहे, समलिंगी जोडप्यांना संसाराची/लग्नव्यवस्थेची सुविधा मिळाली पाहिजे. ज्यांना ती घ्यायची ते घेतील, ज्यांना घ्यायची नाही, ते घेणार नाहीत.

रसिक : भारतात अजूनही ३७७ कलमाबाबत राजकीय पक्षांमध्ये एकमत नाही, असलाच तर एकत्रित विरोधच आहे, त्यामुळे समलिंगी विवाह ही संकल्पना आज तरी भारतासाठी अशक्य भासते. तरीदेखील, समलिंगी जोडपी ‘लिव्ह इन’ प्रकाराने राहात असतात. समलिंगी सहजीवनातली वैयक्तिक आणि समाज पातळीवरची आव्हाने कोणकोणती आहेत?
आज भारतात अनेक शहरांत समलिंगी जोडपी नांदत आहेत. अनेक वर्षांपासून आणि सुखाने. जर यांची नाती समाजासमोर आली तर कदाचित काहींच्या नोकऱ्या जाऊ शकतील, काही जणांना समाजातून बहिष्कृत केले जाईल, त्यांना भाड्याने घरं मिळणार नाहीत. म्हणूनच बहुतांशी ही जोडपी त्यांचे नाते उघडपणे समाजासमोर मांडत
नाहीत. अर्थात, या सगळ्यांबरोबर ३७७ कलमाचीही अडचण आहेच. म्हणून कायदा जर बदलला तर लोकांना हा कडक संदेश मिळेल की, कायदा समलिंगी लोकांच्या अधिकारांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे समलिंगी लोकांवर होणारे अन्याय कमी होतील.
bindumadhav.khire@gmail.com
(मुलाखतीचे संकलन : प्रेरणा मयेकर)