आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Interview Of Kailash Katkar, Founder Of Quickheal Technologies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरे इंडियन आयडॉल्‍सः कैलाश काटकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इच्छाशक्ती, कल्पकता आणि सतत काहीतरी नवीन करायची तयारी एखाद्या माणसाकडून काय काय करून घेऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘क्विकहील टेक्नॉलॉजीज’चे प्रणेते कैलाश काटकर. रहिमतपूरसारख्या लहानशा खेड्यात जन्मलेले आणि पुण्यामध्ये लहानाचे मोठे झालेले कैलाश काटकर, हे मुळातच नावीन्याचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व. पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जाऊन जगण्याचे धडे गिरवणारे कैलाश, आपल्याकडे असलेल्या कौशल्यांच्या जोरावर आज सॉफ्टवेअर सोल्युशन्समधील एक साम्राज्य उभे करणा-या या प्रेरणादायी व्यक्तीशी साधलेला हा संवाद.
स्वत:चा व्यवसाय करायचा हे कधी ठरवले?
- मी सुरुवातीला रेडिओ तसेच टी. व्ही. दुरुस्त करायचो. मग कॅल्क्युलेटरची दुरुस्ती शिकून घेतली; पण त्यातही मला सतत काहीतरी वेगळे करून बघायची इच्छा होत असे. तेव्हा कॉम्प्युटर्स नव्याने आले होते. मला जाणवले की, भविष्यात महाजाल पसरतच जाणार; पण कॉम्प्युटर दुरुस्त करणा-या 12-15 कंपन्या तेव्हा पुण्यात होत्या. मी वेगळ्या वाटेने जायचे ठरवले आणि प्रिंटर दुरुस्ती शिकून घेतली. संपूर्ण भारतात त्या वेळी हे करू शकणा-या 3-4 च कंपनीज होत्या.
‘क्विकहील टेक्नॉलॉजीज’चा जन्म कसा झाला?
- खरे सांगायचे तर स्वत:ची कंपनी काढीन, ती मोठी करीन, असे ठरवून काहीच सुरू झाले नव्हते; पण नवीन काय करता येईल, वेगळे काय करता येईल, अशी धडपड मात्र सतत चालू होती. माझा धाकटा भाऊ पोस्ट ग्रॅज्युएशन करीत असताना ‘व्हायरस’ या विषयावर प्रकल्प करत होता. मला यातले पोटेन्शियल जाणवले आणि यात पुढे संशोधन करण्याचा सल्ला मी माझ्या धाकट्या भावाला दिला. कॉम्प्युटर आणि अँटीव्हायरसमध्ये संशोधन करीत असताना ‘क्विकहील अँटीव्हायरस टेक्नॉलॉजीज’चा 1994 मध्ये जन्म झाला. माझा पाठ्यपुस्तकी शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास आहे. हातात स्क्रू ड्रायव्हर घेऊन काम करायला जी सुरुवात केली तिथपासून ते आज इतक्या मोठ्या कंपनीमध्ये ‘पीपल मॅनेजमेंट’ कसे करायचे इथपर्यंत सगळेच मी अनुभवातून शिकत गेलो.
तुम्हाला प्रेरणा देणारी गोष्ट कोणती?
- सतत काहीतरी नवीन करीत राहणे, शोधत राहणे हा माझा स्वभाव आहे आणि हा नावीन्याचा ध्यासच मला प्रेरणा देत असावा, असे मला वाटते.

व्यवसाय म्हटला की, यशापयशाचे चढ-उतार आलेच. एखादे वेळी जर अपयश आले, तर तुम्ही ते कसे हाताळता?

- प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना हा त्याला करावाच लागतो; पण ते कायमचे नसते, हे लक्षात ठेवायला हवे, तरच त्यातून पुढे जाता येते. अपयशसुद्धा अनेक गोष्टी शिकवते. तुमच्याकडे धीर धरायची तयारी असेल तर अपयशातून बाहेर पडून, नवीन गोष्टी शिकून तुम्ही अपयशावर मात करू शकता.

• नवीन क्षेत्रात उडी घेताना किंवा इतका मोठा व्यवसाय सांभाळताना कधी भीती वाटली का?

- उद्योजकांनी घाबरून चालत नाही! नवी आव्हाने स्वीकारण्याची आणि पेलण्याची तयारी ठेवावीच लागते. सतत शिकत राहावे लागते. मी जेव्हा एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी चालवतो, तेव्हा त्यातल्या बारीक सारीक गोष्टींची माहिती असावी लागते. या क्षेत्रात नवीन काय संशोधन चालू आहे या सर्व गोष्टींवर बारकाईने नजर ठेवावी लागते. नुसती माहिती नव्हे, तर सोबत ज्ञान भीतीला पळवून लावते. मी समजा माझा अभ्यास केला नाही आणि सल्लागारांवर अवलंबून राहिलो, तर मला भीती वाटेल; परंतु माझा अभ्यास, माझी तयारी जर चोख असेल, तर मला घाबरायची काहीच गरज नाही!

• व्यवसायात चुका कशा टाळाव्यात?

- चुका म्हणजेच शिक्षण आणि शिक्षण म्हणजेच जुन्या चुका परत होऊ न देणे. ही एक प्रक्रिया आहे. काही गोष्टी या अनुभवातूनच शिकता येतात. त्यामुळे चुकांतून शिकतच पुढे जायचे असते. त्यात घाबरून जाण्यासारखे काही नाही.

• तुमचे छंद काय? काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांचा मेळ कसा जमवता?

- संगीत ऐकणे आणि चित्रपट पाहणे मला अतिशय आवडते. त्यात मी रमून जातो. फावल्या वेळात कुटुंबासोबत वेळ घालवणे यासारखे आनंददायी काहीच नाही. आणखी एक गोष्ट, 'नवीन शिकणे आणि शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवणे' हा प्रवासच माझे आयुष्य आहे. त्यामुळे त्यासाठी 'मेळ जमवावा'च लागला नाही.

• यशाची व्याख्या तुम्ही कशी कराल?

- प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असते. माझ्या व्यावसायिक प्रगतीमधून मी समाजात जर काही देऊ शकतो, समाजासाठी जर काही करू शकतो, तर मी यशस्वी आहे, असे मी मानतो. माझ्यापुरती हीच यशाची व्याख्या आहे.

• उद्यमशील तरुणांना काय सल्ला द्याल?

- व्यवसाय हे फक्त खूप पैसे कमावण्याचे साधन नाही. किंबहुना ते तेवढय़ापुरते र्मयादित नसावे. ही समाजाप्रती आपली एक जबाबदारी आहे. सतत 'आपल्याला यातून काय मिळेल' यापेक्षा 'आपण समाजाला काय देऊ शकतो', याचा विचार केला पाहिजे. याशिवाय प्रश्न असतो पैशांचा. त्याचे सोंग आणता येत नाही. व्यवसाय मोठा करण्यासाठी फंड्स लागतात आणि ते उभे करण्यासाठी कष्टांची व धीर धरण्याची तयारी लागते. नुसत्या कल्पना हटके असून चालत नाहीत, त्या मार्केटच्या दृष्टीने 'सेलेबल'सुद्धा असायला हव्यात. या गोष्टींकडे जर लक्ष दिले तर यश तुमचेच आहे.