आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातला कोलाहल मांडायचा आहे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15व्या मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज (मामी) फेस्टिव्हलमध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटाला प्रतिष्ठेचा सिल्व्हर गेटवे ऑफ इंडिया हा सन्मान, ग्रँड ज्युरी पारितोषिकासह जाहीर झाला. त्यानिमित्त ही मुलाखत...

कविता ही तुमची मूळ प्रवृत्ती दिसते. मात्र आता चित्रपट हे तुमचे अभिव्यक्तीचे माध्यम बनले आहे. हा बदल कसा घडला?
‘माझ्या हाती नसती लेखणी
तर असती छिन्नी, सतार,
बासरी अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो,
हा अतोनात कोलाहल मनातला’
माझ्या एका कवितासंग्रहात जीवनविषयक भूमिका म्हणून ही कविता आली होती. मनातला कोलाहल मांडण्यासाठी मी कविता हे माध्यम निवडलं होतं. लहानपणी चित्र काढायची सवय होती, नंतर कविता करायला लागलो. मग मी त्याहीपलीकडे जाऊन काही बोलायचं ठरवलं, तेव्हा चित्रपट हे माध्यम निवडलं. या माध्यमाची चित्रभाषा परिणामकारक आहे, असे मला वाटले. कविता हा आत्मगत, अत्यंत संवेदनशील असा प्रकार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मात्र हीच संवेदना वास्तवाचं दृश्य स्वरूप घेऊन येते. लहानपणी मी चित्रपट बघायचो, संहिता वाचायचो. त्यात अनेक एकांगी बाबी जाणवायच्या. चित्रपटांना न सापडणा-या कितीतरी गोष्टी आपल्याच समाजात लपलेल्या आहेत, हे जाणवायचं.
साधारणपणे रूढ चौकटींना धरून कुठल्याही माध्यमातला श्रीगणेशा करण्याकडे कलावंतांचा कल असतो. तुम्ही मात्र पहिल्या प्रयत्नात रूढ चौकट मोडली. यामागे नेमका काय विचार होता?
मी प्रारंभीच चौकट मोडली. माझा तो स्वत:चा चॉइस होता. कवितेतही मी पारंपरिक चौकट मोडलीच होती. माझा समाजच मुळी चौकटीबाहेरचा आहे, ज्याला मी व्यक्त करू पाहतो आहे. ‘पिस्तुल्या’ माझी पहिली शॉर्ट फिल्म. मला नियमांमध्ये स्वत:ला बांधायचं नव्हतं. नियम तोडू शकतो, याची जाणीव झाल्यावर कथेपासून सिनेमॅटिक भाषेपर्यंत मी नियम मोडायचं ठरवलं व तयारीला लागलो. कुठलीही उसनी कथा घ्यायचं टाळलं.
कवितेतल्या आणि वास्तवातल्या जगण्याला दृश्य रूप देतानाचा अनुभव कसा होता?
आपण एका विस्तीर्ण कॅन्व्हासवर चित्र चितारतोय, ज्याला जगाच्या पाठीवर सगळीकडे पोहोचवायचंय, ही जाणीवच मुळात भारून टाकणारी होती. कवितेतून भावना पोहोचतात, विचार पोहोचतात, चित्रपटातून थेट जगणं पोहोचतं जे अधिक बोलकं असतं, याची प्रचिती मला माझ्या समाजाच्या जगण्याला दृश्य रूप देताना आली. हा अनुभव आजवरचं जगणं सार्थकी लावणारा होता.
‘पिस्तुल्या’ ही पहिली शॉर्ट फिल्म करतानाची माझी हीच धारणा होती की, मला या चित्रभाषेतून माझा समाज आहे तसाच मांडायचाय, कलात्मकतेचे स्वत:चे असे नियम ठरवून.
‘पिस्तुल्या’तल्या त्या लहान मुलाला जिवाच्या आकांताने शिकायचे असते, तो त्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतोय, जो अजूनही प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहे. अशा वेळी तुमचं सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबद्दल काय मत आहे?
कुठलं का होईना, शिक्षण सगळ्यांनाच मिळायला हवं. शिकून-सवरून काय होणार आहे, हा सुधारित समाजाचा दृष्टिकोन आणि भटक्या विमुक्तांचा, उपेक्षितांचा दृष्टिकोन यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. या उपेक्षितांना हक्कांची, अधिकारांची जाणीवही नसते. अशांना शिक्षण गरजेचं आहे. ते चांगलं की वाईट, हा नंतरचा भाग झाला.
मी शिकलो, बी. ए., एम. ए. केलं; पण मला ठाऊकच नव्हतं, की मला काय करायचंय. अपघाताने मास कम्युनिकेशनकडे वळलो म्हणून इथवर आलो आहे. एरवी कारकुनी शिकवणारं का होईना, पण शिक्षण द्या या समाजाला.
‘पिस्तुल्या’तल्या मुलाची शिकण्याची ओढ दाखवताना याच व्यवस्थेतील कुठले प्रश्न तुम्हाला अधिक गंभीर आहेत, असे वाटले? गरिबी की शिकण्याची इच्छा; वा मागल्या पिढीचे मागासलेपण की सुधारित समाजाची दुर्लक्षितता?
चित्रपटातील मुलगा शिक्षणासाठी नाइलाजाने चोरीचा मार्ग पत्करतो. यावरूनच काय ते समजू शकता. गरिबी, अंधश्रद्धा, मागासलेपणा आणि परिणामी असुधारित व मुख्य प्रवाहाने दुर्लक्षित केलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमकी कशाची अधिक निकड आहे, हे सांगताना शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी पर्याय खुले ठेवणे हे आवश्यक आहे. त्यासाठी या समाजातही शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
‘फँड्री’ हा तुमचा सिनेमा सध्या महोत्सवातून गाजतो आहे, फँड्री म्हणजे नेमकं काय?
फँड्री ही वडार समाजाची कथा आहे, पण यात मुख्य भूमिका करणारा मुलगा पारधी समाजाचा आहे. खरे तर अमुक एका समूहाची ही कथा नाही, ती भटक्या-विमुक्तांचं जिणं जगणा-या समस्त पीडितांची कथा आहे. फँड्री हा कैकाडी भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ चित्रपट पाहूनच प्रेक्षकांनी समजून घ्यावा, असे मला वाटते.
फँड्रीचं यश नेमकं कशात आहे, असं तुम्हाला वाटतं?
चित्रपट पाहून अनेक प्रेक्षक मला महोत्सवात भेटत; म्हणत, हे आम्हाला माहीतच नव्हतं. आपल्या आजूबाजूला वावरणारा हा समाज, या समाजाची व्यथा ठाऊकच नव्हती. मला वाटतं, त्यांचं झापडबंद विश्व या चित्रपटाच्या निमित्ताने खुलं झालं, हे या चित्रपटाचं यश आहे.
वडार समाजातील महिला अजूनही ब्लाऊज घालत नाहीत. या प्रथेमागे कारणे कोणती?
अशी एक पुराणकथा सांगितली जाते की, एकदा सीता स्नान करत असताना एका वडाराने तिला अर्धनग्न पाहिले. त्या वेळी रागाच्या भरात सीतेने त्याला शाप दिला, तुमच्या समाजातल्या सगळ्याच स्त्रियांना लोक असेच अर्धनग्न पाहतील. या शापातून हा समाज अजूनही मुक्त झालेला नाही. अर्थात, आताची पिढी फारशी ही रूढी पाळताना दिसत नाही. आमच्या कुटुंबात माझी आत्या ही प्रथा पाळायची. सत्यजित रे यांनी बंगाली चित्रपटात शर्मिला टागोरची पाठमोरी आकृती दाखवताना पारदर्शक ब्लाऊजमधून अंतर्वस्त्र दाखवले होते. बंगाली महिला त्या काळी अंतर्वस्त्र घालत नसत, चित्रपटात असे दाखवणे सुधारणेची खूण होती. चित्रपटासारख्या माध्यमांमधून यावर भाष्य करणे; सांगणे; गरजेचे आहे, असे मला वाटते.
‘फँड्री’नंतर तुमच्या काय योजना आहेत, डोक्यात कोणत्या कल्पना घोळताहेत?
‘सैरात’ नावाचा चित्रपट करतो आहे. ग्रामीण कथा आहे. प्रेमकथा आहे. ऑडिशन्स सुरू आहेत. दृश्य माध्यमातून खरं ते मांडायचा माझा प्रयत्न चालू आहे. पिस्तुल्याचा शेवटचा शॉट आहे, की त्यातला मुलगा जोरात पळतो आहे... आश्चर्य हे, की तो अजूनही थांबत नाहीय... पळतोय, पळतोयच, प्रत्येक मॅरेथॉन जिंकतोय. पिस्तुल्या हा आपलाच प्रवास आहे...रस्ता सापडला आहे... मंजिल अब दूर नहीं... माझ्या टीममधल्या गार्गी कुलकर्णीचं हे म्हणणं अगदी तंतोतंत खरंय.
dahalepriyanka28@gmail.com