आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावनी अनप्‍लग्‍ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीत प्रथमच अनप्लग्ड गाण्यांचा प्रयोग करणारी गायिका म्हणजे सावनी रवींद्र. यूट्यूबवर ती कमालीची लोकप्रिय ठरत आहे. नुकतीच ती औरंगाबादेत आली असताना तिच्याशी मारलेल्या गप्पा...
—अनप्लग्ड गाण्यांचे नेमके स्वरूप काय?
सावनी : अनप्लग्ड म्हणजे प्लगशिवाय अर्थात कोणत्याही इलेक्ट्रिक वाद्यांशिवाय गायलेले गाणे. या गाण्यांमध्ये मूळ वाद्यांचा वापर केला जातो. कधी कधी केवळ पियानोचा वापर केला जातो. कमीत कमी वाद्यांच्या साथीने हे गाणे गायले जाते. जुनी चित्रपटगीते, भावगीते, मालिकांची शीर्षकगीते, अल्बममधील गाणी अशी कोणतीही गाणी या प्रकारात गायली जातात. विशेष म्हणजे ठरावीक चित्रपटगीत गाताना एखादी ओळ संगीतकाराने दिलेल्या चालीनुसारच गावी लागते. मात्र अनप्लग्ड फॉर्ममध्ये गायकाला ही ओळ आपल्या मर्जीप्रमाणे खुलवून गाता येते. हे खरंच खूप आनंद देऊन जातं.

— मराठीत अनप्लग्ड गाण्यांचा प्रयोग करावा, ही कल्पना कशी सुचली?
सावनी : लहानपणापासून घरात संगीताचा वारसा आणि या क्षेत्रातील दिग्गजांची सोबत लाभल्यामुळे मी आजवर प्रचंड गाणी ऐकली आहेत. विविध भाषांची, हॉलीवूड, बॉलीवूडची गाणी ऐकली. टीव्ही चॅनल्सवरील अनप्लग्ड हिंदी गाणीही मला खूप आवडत होती. त्यामुळे मराठीतील भावगर्भ गाण्यांविषयी हा प्रयोग करून पाहावा, अशी कल्पना सुचली आणि माझ्या साथीदारांच्या मदतीने ती प्रत्यक्षातही उतरली. माझा नवा प्रयोग निदान नव्या पिढीने स्वीकारावा, अशी अपेक्षा होती. पण यूट्यूबवर मी ही गाणी अपलोड केली, तेव्हा श्रोत्यांचा मिळालेला प्रतिसाद खरोखरच अनपेक्षित होता.

— या फॉर्ममध्ये आणखी नवे प्रयोग करण्याचा विचार आहे?
सावनी :
दुसऱ्या सीझनमध्ये मी सरोद, बासरी, व्हायोलिन, ग्रँड पियानो आणि सतार या पाच वाद्यांसह नवी गाणी गाणार आहे. यात तामीळ आणि इंग्रजी गाण्यांचाही समावेश असेल.

— मराठी मालिकेतील ‘तू मला मी तुला’ या गाण्यानेही तुला प्रचंड लोकप्रियता दिली. हा अनुभव कसा होता?
सावनी : ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील या गाण्याने मी खरंच घराघरात पोहोचले. मी ही मालिका सुरुवातीपासून पाहात होते. त्यामुळे या मालिकेतील एक गाणे मला रेकॉर्ड करायचे आहे, असा फोन आला, तेव्हा ही संधी मला सोडायची नव्हती. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मला विचारले तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि मी पुण्यात होते. पण मी जिद्द सोडली नाही. रात्री मुंबईत पोहोचले, पहाटे चार वाजेपर्यंत हे गाणे आम्ही रेकॉर्ड केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते शूटिंगसाठी वापरण्यात आले. एवढ्या घाईत रेकॉर्ड झालेल्या गाण्याला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली. पुढे माझ्या अनप्लग्ड गाण्यातही मी निवांतपणे, माझ्या मर्जीनुसार हे गाणे गायले.

— मालिका आणि चित्रपट गीत गाताना नेमका काय फरक जाणवतो?
सावनी : तसं तर प्रत्येक गाणंच आव्हानात्मक असतं. पण मालिकेचं शीर्षकगीत म्हणजे तिचा चेहरा असतो. या ३० सेकंदांच्या गाण्याच्या शब्दांतून शंभर टक्के भावना उतरल्या तरच ते यशस्वी ठरतं.

— गाण्यासोबत आणखी काय आवडतं?
सावनी : मला वाचनाची, विविध भाषा शिकण्याची आणि नृत्याची आ‌वड आहे. मी दोन वर्षे कथ्थक शिकले आहे. मला जर्मन येते. तामीळ गाणी मी लहानपणापासून खूप ऐकते. मी संस्कृतमध्ये बीए तर मराठीत एमए केले आहे.

— नवीन योजना काय आहेत?
सावनी:
मला दाक्षिणात्य गाणी गायची आहेत. लहानपणापासून माझ्यावर या गाण्यांचा एक वेगळा प्रभाव आहे. इंग्रजी गाणीही थोडी कठीण जातात. या दोन्हीवर मी विशेष मेहनत घेणार आहे.