आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Uttam Kamathi By Rahul Bansode In Rasik

तिस्तेचा काठ (फापटपसारा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अॅटकिन्स' ही स्थापत्य आणि अभियांत्रिकी क्षेत्रातली बडी कंपनी. या संस्थेने ‘रॉयल जिओग्रॅफिक सोसायटी ऑफ लंडन' येथे नुकतेच छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात ‘पर्यावरण आणि जलसंधारण' या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या छायाचित्रण स्पर्धेत भारताचा छायाचित्रकार उत्तम कामाठी यांच्या ‘टरबुजाची शेती' या छायाचित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. उत्तम यांच्याशी झालेल्या संवादावर आधारलेले हे सदर...
प्रश्न : ‘बीबीसी’ आणि ‘गार्डियन’सारख्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वृत्तसंस्थांनी तुझ्या कामाची प्रशंसा केली आहे. तू काढलेल्या छायाचित्राचा स्वतःचा असा एक दृश्यार्थ आहेच, पण त्या पलीकडे जाऊन तुला काही सांगावेसे वाटते का?
उत्तर :
छायाचित्रासाठी मी तिस्ता नदी हा विषय निवडला. तसे पाहता, २००९ पासून मी नदी आणि तिच्या आसपासच्या परिसराची छायाचित्रे घेतो आहे, ज्यात वेगवेगळे ऋतू, जीवनमान, शेतीपद्धती आणि उत्सवांचाही समावेश आहे. त्यातही बंगालमधल्या तिस्ता नदीच्या पात्राजवळ आणि खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना सध्या अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दीर्घकाळ चालणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस, अचानक येणारा पूर यामुळे खोऱ्यातल्या लोकांचे दैनंदिन जीवन, शेतीव्यवस्था आणि पर्यायाने एकूणच व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. यात भर म्हणून भारत आणि बांगलादेशमध्ये तिस्ता नदीच्या पाणी वापरासंबधी झालेला द्विपक्षीय करार हा अनेक समित्या नेमूनदेखील पूर्णपणे अमलात आणता आलेला नाही. बांध आणि कालव्यांमुळे शेतकऱ्यांना मदत झालेली असली तरी मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी लोकांचे हाल होत आहेत. तिस्ता नदीवर एकाहून अधिक जलविद्युत केंद्रांचे प्रस्ताव असून ते पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमितपणे पुरेसे पाणी मिळेल की नाही, याचीच अनेकांना चिंता आहे. ‘इंटरनॅशनल रिव्हर'सारखी संस्था नदीच्या संरक्षणासाठी आणि धरणाच्या विरोधात संघर्ष करीत असून तिस्ता नदीवर नांदत असलेली उत्तरपूर्वेतली ही लोकसंस्कृती आणि पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रश्न : पुरस्कारप्राप्त छायाचित्राने निरनिराळ्या प्रश्नांना एक चेहरा मिळवून दिला आहे, ज्यात पाणीटंचाई, हवामान बदल आणि यामुळे माणसांना होणाऱ्या यातना व कष्ट यांचा प्रामुख्याने समावेश होतो. लोकसंख्येच्या विस्फोटानंतर दैनंदिन वापराच्या स्रोतांचा असा ऱ्हास होत असताना तुला काही आशावादी चित्र दिसते का?
उत्तर :
अनेक अशासकीय आणि पर्यावरणविषयक संस्था या समस्येवर काम करीत आहेत. पण तेवढेच पुरेसे आहे, असे मला वाटत नाही. पर्यावरणात होणाऱ्या बदलांबाबत आपण जास्त जागरूक राहायला हवे. आपल्याला हे आता समजले नाही तर येणारा काळ आणखी कठीण असणार आहे.
प्रश्न : काही पर्यावरणवाद्यांना आपण ही लढाई अगोदरच हरलेलो आहोत, असे वाटते. त्यांची ही भावना वास्तव आहे की केवळ मानसिक वैफल्याचा भाग आहे?
उत्तर :
असे म्हणता येऊ शकते. पण पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ एकांगी प्रश्न नाही. हा प्रश्न राजकीय, आर्थिक आणि विकासाशी संबंधित आहे. त्यामुळे यावर फक्त पर्यावरणवाद्यांनीच नाही तर सर्व जनतेने एकत्र येण्याची गरज आहे. सद्य:स्थितीत सर्वच देशांचा विकास हा पर्यावरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून होतो आहे.
प्रश्न : ‘शाश्वत विकास' अथवा ‘सस्टेनेबल डेवलपमेंट’वर तज्ज्ञांमध्ये इतक्या चर्चा होत असताना इंडोनेशिया, थायलंड आणि भारतासारख्या देशांमध्ये या अंगाने काही कामे होताना दिसत नाहीत. भारताची भूमिका आणि काम नेमके कसे असायला हवे, असे वाटते? सरकार आणि सरकारी यंत्रणांमध्ये यासाठी नेमके कुठले बदल आवश्यक आहेत, असे तुला वाटते?
उत्तर :
म. गांधींच्या अर्थशास्त्रीय संकल्पनेनुसार आपण तितक्याच गोष्टी वापरल्या पाहिजेत, ज्यांची आपल्याला गरज आहे. शहरांमधून होणारा वीज आणि पाण्याचा अपव्यय ही एक मोठी समस्या आहे. पूर्णतः नळ काढून पाण्याचा अपव्यय करणारी असंख्य ठिकाणे मी पाहिली आहेत. याशिवाय बेसुमार जंगलतोड ही अत्यंत मोठी समस्या आहे. सरकारने जंगलमाफियांविरुद्ध कडक पावले उचलून वनसंपत्तीचे रक्षण करायला हवे. याशिवाय अपारंपरिक उर्जास्रोतांना उत्तेजन द्यायला हवे.
प्रश्न : तुझ्या या पुरस्कारप्राप्त छायाचित्राबद्दल काही सांगू शकशील का? हे छायाचित्र कधी आणि कुठल्या परिस्थितीत घेतले होते?
उत्तर :
ज्या ठिकाणी मी हे छायाचित्र घेतले, ते ठिकाण माझ्या घरापासून फार जवळ आहे. मी घरी असताना माझा सर्वाधिक वेळ तिस्ता नदीच्या पात्राजवळ आणि खोऱ्यात घालवत असतो. अगदी मुसळधार पाऊस किंवा वावटळी चालू असल्या तरीही! त्यामुळे या छायाचित्रासाठी वेगळा असा वेळ दिलेला नाही. नदीकिनारी काही शेतकरी त्यांचे काम करीत आणि आणि मी फोटो घेत असे. हे लोक मला ओळखतात, त्यामुळे एकमेकांच्या कामाच्या आड न येता आम्ही करत होतो. असे बरेच फोटो मी काढले आहेत.
या जोडीने मी स्वतंत्र व्यावसायिक लघुपट निर्मिती करत असतो. तिस्ता नदीच्या संबंधात मी स्वतंत्रपणे काही लघुपट आणि एक डॉक्युमेंटरी बनविली आहे. यापैकी २०११ मध्ये बनवलेल्या "Teesta Tales' (ही "यू ट्यूब'वर पाहता येईल) या डॉक्युमेंटरीला परराष्ट्र मंत्रालयाच्या "सार्वजनिक राजनिती विभागा'चे नामांकन मिळालेले आहे. याशिवाय माझी भारत आणि बांगलादेश संबंधांवर आधारित "द पेपर पॅलेस' नावाची डॉक्युमेंटरी लवकरच येते आहे.
प्रश्न : टीव्ही आणि इतर माध्यमांतून पर्यावरणाविषयी जागृती करण्याचे काम कमी होत चालले आहे. असे का होत असावे?
उत्तर :
लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव हे एक मोठे कारण यामागे असू शकेल. मात्र लोकांना सतत प्रश्नांची जाणीव करून दिल्यास हळूहळू याबाबत लोकजागृती होऊ शकेल, असेही वाटते. २००८च्या सुमारास काही सहकाऱ्यांसोबत मी सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारी एक संस्था स्थापन केली होती. रस्त्याच्या कडेला असणारी झाडे, प्लास्टिक समस्या अशा काही प्रश्नांवर पदरमोड करून आम्ही काम करीत होतो. आम्हाला लोकांकडून मदत अथवा उत्तेजन काहीही मिळाले नाही. दुर्दैवाने त्या संस्थेचे काम बंद पडले.
प्रश्न : तुझ्या क्षेत्रातले एक दिग्गज छायाचित्रकार सिबॅस्चिओ साल्गाडोबद्दल काय सांगू शकतोस?
उत्तर :
साल्गाडो, जेम्स नॅचवे, स्टीव मॅक्करी या छायाचित्रकारांचा मी निस्सीम चाहता आहे. छायाचित्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःला विसरून पूर्णपणे कामात झोकून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन हे निश्चितच माझ्यासारख्यांना प्रेरणादायी ठरले आहे.
प्रश्न : पर्यावरणाबद्दल अनभिज्ञ असलेल्यांना काय संदेश देऊ इच्छितोस?
उत्तर :
ही पृथ्वी आपले घर असून या घराचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आपण तिचे संरक्षण करू शकत नसू तर येणाऱ्या पिढ्यांसाठी नेमके कुठल्या प्रकारचे जग आपण मागे ठेवणार आहोत? सर्व भेदाभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या घराचे रक्षण करायला हवे.

rahulbaba@gmail.com