आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी कलेला द्यावी वैश्विक ओळख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली येथील ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’ची (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा-एनएसडी) अमराठी संचालक असण्याची परंपरा मोडून काढत, साधारण दीड वर्षापूर्वी प्रख्यात रंगकर्मी, दिग्दर्शक आणि संशोधक वामन केंद्रे एनएसडीचे संचालक म्हणून रुजू झाले. पाश्चात्त्य, आधुनिक रंगभूमीचा मेळ साधत एनएसडीच्या माध्यमातून रंगभूमीची ‘भारतीय’ म्हणून असलेली ओळख टिकवण्यास त्यांनी अग्रक्रम दिला. त्याचेच प्रत्यंतर नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ‘आदिरंग महोत्सवा’त रसिकांना आले. यानिमित्ताने वामन केंद्रे यांचे विद्यार्थी आणि ‘बाबू बँड बाजा’सारख्या आशयनघन चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते मिलिंद शिंदे यांनी ‘रसिक’साठी घेतलेली दिलखुलास मुलाखत

मिलिंद शिंदे : एनएसडीमध्ये शिकत असताना, भविष्यात एनएसडीच्या संचालकपदी आपली नियुक्ती होईल, आपण त्या मानाच्या खुर्चीत बसू, असे कधी वाटले होते का? पहिल्यांदा संचालकांच्या केबिनमध्ये स्वत: संचालक म्हणून जाताना काय वाटले होते ?
वामन केंद्रे : मी कधीच एनएसडीचा संचालक व्हावे, असा विचार केला नव्हता. किंबहुना एनएसडीतून शिकून बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा एनएसडीत येईन, असेही मला कधी वाटले नव्हते. पण आपण ज्या क्षेत्रात काम करतो, ते करत असताना वाटेत अशा काही गोष्टी येतात ज्या आपल्या कामाशी नाळ तुटू देत नाहीत. मी एनएसडीतून बाहेर पडलो, केरळमध्ये संशोधनासाठी गेलो, पण एनएसडीशी माझे असलेले नाते कधी तुटू दिले नव्हते. त्यामुळे अशोक रानडे, पु.ल. देशपांडेंसारख्या दिग्गजांबरोबर काम करता आले. हे सगळे वाटेत येत गेले,
ते माझ्या कामाशी मी नाळ एकसारखी जोडून ठेवल्याने. एनएसडीचे संचालकपदही याचाच एक भाग झाला. सुदैवाने, माझ्यावर कधी ‘मला काम द्या’ असे म्हणायची वेळ आली नाही. त्यामुळे संचालकपदही मी मागितले नाही, पण कलाक्षेत्रात, नाट्यक्षेत्रात माझ्या हातून काही चांगले घडण्यासाठी मला ज्या माध्यमांची आवश्यकता होती, त्यातले हे एक माध्यम यानिमित्ताने माझ्या वाट्याला आले. या माध्यमातून मी नाट्यक्षेत्रासाठी राष्ट्रीय पातळीवर काही करू शकेन, असा माझा प्रयत्न आहे. खरेतर परफाॅर्मिंग आर्ट‌्समध्ये आपल्याला आपली पात्रता दररोज सिद्ध करावी लागते. ‘झुलवा’, ‘गजब तेरी अदा’ ही माझीच नाटके माझ्यासमोर दुश्मन म्हणून उभी राहतात, चांगल्या अर्थाने. यापेक्षा चांगले नाटक करून दाखव, असे हे दुश्मन सांगतात. त्यामुळे मी संचालक जरी झालो, तरी नाटकाचा विद्यार्थी म्हणूनच कायम राहणार आहे.
मिलिंद शिंदे : आपण एनएसडीचे विद्यार्थी म्हणून दाखल व्हावे असे तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटले? किंवा नेमकं काय घडलं ज्यामुळे एनएसडी खुणावू लागली?
वामन केंद्रे : मी विद्यार्थी चळवळीचा एक महत्त्वाचा भाग होतो. शालेय वयापासूनच उत्तम वक्तृत्व कौशल्यामुळे मी या चळवळीकडे मी खेचलो गेलो. पुरोगामी चळवळीचा अनुभव व पारंपरिक शाळा अशा दोन्ही माध्यमांतून मी घडत होतो. पण आणीबाणीने सगळेच चित्र बदलले. समाजकारण निवडायचे की राजकारण अशी दुविधा निर्माण झाली. राजकारणातील संवेदनशीलता लोप पावताना बघून मी मनातून हललो होतो. स्वत:ला दगड बनवून मूल्याधिष्ठित राजकारणाचा चेहरा हरवलेल्या देशात व्यक्तिनिष्ठ राजकारण करण्याची माझी इच्छा नव्हती. मला माणूस म्हणून जगण्यात अधिक रस होता. याच विचाराने माझा निर्णय बदलला. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकात काम करत असताना हा निर्णय बळकटी घेत होता. अभिव्यक्तीचे माध्यम त्या नाटकामुळे सापडले होते. म्हणूनच प्रशिक्षणानिशी या क्षेत्रात उतरायचे, असे ठरवून मी एनएसडीमध्ये प्रवेश घेतला.
मिलिंद शिंदे : तुम्ही विद्यार्थी असतानाचे एनएसडी आणि आताचे एनएसडी...काय बदल करावासा वाटला ?
वामन केंद्रे : मला वाटते मी शिकत असताना एनएसडी गोंडस रोपटे होते, आता त्याचा वटवृक्ष झाला आहे. एनएसडीत त्यामुळे आता खूप बदल करणे, आवश्यक आहे. फिल्म इंडस्ट्री, रंगभूमीवरील बदलांनुसार आता एनएसडी बदलायला हवे. या क्षेत्रात स्थिर होण्याच्या शक्यता व्यापक झाल्यानंतर नॉस्टॅल्जिया कुरवाळण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे एनएसडीचा चेहरामोहरा आधुनिक करण्याची नितांत आवश्यकता आहे. मधल्या काळात एनएसडीचे समाजाशी असलेले संवादी नाते तुटले होते. एनएसडी आत्मकोशात गेली होती. तिला त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. समाजाशी तिची कनेक्टिव्हिटी वाढवणे गरजेचे आहे. गुवाहाटी, श्रीनगरसारख्या ठिकाणी जिथे एनएसडी अद्याप पोहोचलेली नाही, तिथे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय गेली ५५ वर्षे एनएसडीत आम्ही जुनाच अभ्यासक्रम राबवतो आहोत. त्यात आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन, नव्या कोर्सेसचा समावेश करून वर्तमानाशी एनएसडीला जोडावे लागणार आहेत. शिवाय ‘अ‍ॅडव्हान्स कोर्सेस’साठी परदेशात विद्यार्थ्यांना जावे लागते. त्यापेक्षा ‘एनएसडी’मध्येच ही संधी उपलब्ध व्हावी, असा आमचा प्रयत्न असणार आहे. विजया मेहतांसारख्या ज्येष्ठ मान्यवरांना जर काही पुन्हा नव्याने या क्षेत्रात करायची इच्छा झाली, तर त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे फार स्पेस नाही. तीदेखील एनएसडीत उपलब्ध व्हावी, असे मला प्रकर्षाने वाटते.
-
मिलिंद शिंदे : भारतीय रंगभूमीला आपली ओळख टिकवण्यासंदर्भात सध्या प्रामुख्याने कशाची गरज आहे ? याच अनुषंगाने ‘आदिरंग’ महोत्सवाबद्दलची भूमिका ..?
वामन केंद्रे : मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींची कला भारतात, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आणणे मला गरजेचे आहे. शहरीकरणाचा फारसा परिणाम न झालेली कला म्हणून आता आपल्या लोककलेपर्यंत थांबता येणार नाही. आदिवासी कलेकडे आपल्याला वळावे लागणार आहे किंबहुना आपल्याला जागतिकीकरणाच्या दंग्यामध्ये स्वत:ची ओळख टिकवून वैश्विक व्हायचे असेल तर भारताला आदिवासी कला जपण्यापलिकडे पर्यायच नाही. पाश्चात्त्य कला, आशियाई थिएटर सगळे शिकवले जाते पण आदिवासींची कला मात्र राष्ट्रीय पातळीवर शिकवली जात नाही. त्यामुळे ‘ट्रायबल थिएटर’ ही संकल्पना आम्ही सुरू केली. ‘आदिरंग’ हा आदिवासी महोत्सव याच भूमिकेतून सुरू केला. आदिवासींचे समूहाला महत्त्व देणे व व्यक्तिकेंद्रित न जगणे, ही खरी आजची गरज आहे, जी ‘मी आणि मी’ या वृत्तीला छेद देऊ शकते. ज्यातून परफॉर्मिंग आर्ट टिकू शकते.
मिलिंद शिंदे : भारतीय रंगभूमीच्या पटलावर आज मराठी रंगभूमी कुठे उभी आहे आणि तिची अवस्था कशी आहे ?
वामन केंद्रे : मराठी रंगभूमी तिचे अस्तित्व टिकवून निश्चित उभी आहे, याबाबत वाद नाही. पावणेदोनशे वर्षांची परंपरा जपत लोकाश्रयाशिवाय उभी राहणारी मराठी रंगभूमी आहे, जिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. ज्या रंगभूमीने एका लघु पातळीवर उभ्या केलेल्या या इंडस्ट्रीचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. पण लेखन, निर्मिती याबाबत आशयघनता असूनही बदल मात्र आपल्याकडे फारसे जोरकसपणाने होत नाहीत. फॉर्म, शैलीच्या बाबतीत संख्यात्मकदृष्ट्या रंगभूमीवर फारसे प्रयत्न होत नाही. मराठी नाटक हे शब्दबंबाळ झाले आहे, जी दृश्यभाषेची परंपरा महाराष्ट्रात निर्माण करण्यात अडथळा आणते. ‘मिसिंग एम्प्लॉई’ नावाचे मी एक नाटक तीन-चार वर्षांपूर्वी बघितले होते, ज्यात प्रेक्षक व कलाकार या सजीव माध्यमांमधला संवाद म्हणजे, नाटक या संकल्पनेलाच तडा गेला होता. जे प्रमुख पात्र नाटकात आहे, ते रंगभूमीवर नाहीच.तो मिसिंग आहे, हरवलेला आहे. मात्र तो अंधारात आहे, केवळ एक हात स्केच काढत जातो , एकीकडे त्याचा फोटो लावलेला आहे. पूर्ण नाटकातून तो नसतानाही असतो, ही दृश्यभाषा मराठीत प्रगल्भतेने आणायला हवी, असे मला वाटते. ‘वाडा चिरेबंदी’, ‘नातीगोती’सारख्या मोजक्या नाटकांनी ही दृश्यभाषा प्रभावीपणे वापरली, पण या बदलाचा रेटाच जोरकसपणे आपण मांडला पाहिजे. मराठी नाटक चार डायमेन्शनमध्ये मांडले तर जागतिक पातळीवर ती दृश्यभाषा स्वतंत्र अस्तित्व टिकवू शकेल.
-
मिलिंद शिंदे : एक समुदाय आहे जो, अभिनय हा शिकायचा नसतो, असे उंच स्वरांत म्हणत असतो...तुम्हाला काय वाटते?
वामन केंद्रे : केवळ एखाद्या विद्यालयात शिकायला गेला म्हणून विद्यार्थी तेथेच शिकतो, असे नाही. तो विद्यालयाबाहेरही शिकतच असतो. मग अभिनेता संवाद पाठ का करतो? व्यक्तिरेखेचा अभ्यास का करतो? ते देखील एकप्रकारचे शिक्षणच असते. अभिनय हा उपजत किंवा उस्फूर्त जरी यायला हवा असला तरी, त्यामागे अभ्यास असतो.कुठलाच अभिनेता या अभ्यासाशिवाय अभिनय करू शकत नाही, करत नाही. प्रशिक्षणाचा फायदा फक्त इतकाच, की तुमचा वेळ वाचतो. जे मी एरवी १५ वर्षे फक्त काम करण्यातून शिकतो, ते मी एनएसडीच्या तीन वर्षांत शिकलो. म्हणजे, मला १२ वर्षे बोनस मिळालीत. पण म्हणून अभिनय शिकायचा नसतो, अशी ओरड करणे व्यर्थ आहे. मुळात त्यात तथ्यच नाही.
-
मिलिंद शिंदे : मराठी प्रेक्षकांना वामन केंद्रेंचे नवं नाटक कधी पाहायला मिळणार ?
वामन केंद्रे : अलीकडेच मी ‘गजब तेरी अदा’ नाटक केले. दिल्लीत गेलो म्हणून मराठी रंगभूमीशी माझी नाळ तुटली, असे नाही. वर्षभराच्या आत मी एक नवीन मराठी नाटक रंगभूमीवर आणणार आहे. विश्वशांतीभोवती गुंफलेले एक नाटक मला करायचे होते, जे वेळेअभावी राहून गेले. आता पुन्हा त्यासाठी प्रयत्न करायची माझी इच्छा आहे.