आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजी: एक निरंतर गूढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गूढ मृत्यू आणि त्या घटनेशी निगडित कागदपत्रे हा केवळ सामान्य भारतीयांसाठीच नव्हे, तर केंद्रातील सत्ताधा-यांसाठीसुद्धा अत्यंत संवेदनशील विषय बनून राहिला आहे. एका बाजूला नेताजींबद्दल, त्यांच्या आणि गांधी-नेहरू-पटेलांमध्ये असलेल्या संघर्षाबद्दल अनेक दंतकथा प्रचलित असताना तत्कालीन यूपीए सरकारचे अनुकरण करत विद्यमान एनडीए सरकारनेही संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्यास नकार दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा वाद आणि या वादाच्या अनुषंगाने उपस्थित होत असलेल्या मुद्द्यांवर ‘महानायक’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक-अभ्यासक विश्वास पाटील यांची आमचे प्रतिनिधी सुजय शास्त्री यांनी घेतलेली मुलाखत...

रसिक : नेताजी सुभाषचंद्र बोस बेपत्ता झाल्याचे कळल्यानंतर ते सैबेरिया, युरोप आणि अन्य देशांत असल्याची अनेक वृत्तं येत होती. काही जण नेताजी योग्य वेळी भारतात येणार, असेही बोलत होते. तुम्हाला 'महानायक' कादंबरी लिहिताना या विषयाबाबत नेमके काय धागेदोरे सापडले?
उत्तर : माझ्या तर्कानुसार ते अपघातात गेले असावेत. १९९६मध्ये मी जपानमध्ये नेताजींच्या कार्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. मला या निमित्ताने तीन मुद्दे सांगायचे आहेत.
एक म्हणजे, जपानमध्ये रेंकोजी टेम्पलमध्ये नेताजींची रक्षा ठेवण्यात आली आहे. नेहरूंनी तेथे भेट दिलेली होती. मी त्या मंदिरात गेलो, तिथे मी त्यांच्या बेपत्ता होण्याचा शोध घेतला, पण ते जिवंत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. नेताजींवर दुस-या महायुद्धामध्ये ऑगस्ट १९४५मध्ये ताईहोकू (तैपेई) येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या संदर्भातला तेथील डॉक्टरांचा काही पानांचा अहवाल उपलब्ध आहे. त्यामध्ये नेताजींना जखमी अवस्थेत कसे दाखल करून घेतले होते, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली, त्यांना कोणती औषधे किती वेळाने दिली, याबाबत दोन डॉक्टरांचे खुलासेवार तपशील आहेत.
दुसरा मुद्दा म्हणजे, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानने शरणागती पत्करली होती. त्या वेळी अमेरिकन जनरल मॅक्आर्थर यांनी जपानवर ताबा मिळवला होता. मॅकआर्थर नेताजींच्या शोधासाठी वेडापिसा झाला होता. त्याने जपानमध्ये नेताजींचा कसून शोध घेतला; परंतु खूप प्रयत्नांनंतर त्याचे असे मत बनले की, सुभाषचंद्रांचा मृत्यू विमान अपघातात झाला असावा. त्यांनी तशाप्रकारे लिहिलेला गुप्त अहवाल युद्धकालीन कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे.
तिसरा मुद्दा म्हणजे, १९५१-५२च्या दरम्यान नेहरूसुद्धा काहीसे धास्तावले होते. सुभाषबाबू कदाचित जिवंत असावेत आणि ते परत आले तर निवडणुकीमध्ये वरचढ ठरू शकतील, या विचाराने त्यांनी आणि सरदार पटेल यांनी, १९५१मध्ये एस. ए. अय्यर यांना मुंबई राज्याच्या डायरेक्टर ऑफ पब्लिसिटीचा पदभार दिला. अय्यर यांना पूर्व आशियात नेताजींचा शोध घेण्यासाठी गुप्तपणे पाठवले गेले. अय्यर यांनी नेताजींच्या मंत्रिमंडळात प्रचारमंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी चार महिने शोध घेऊन एक अहवाल लिहिला होता. हा अहवाल दिल्लीतील त्रिमूर्ती भवनातील ग्रंथालयात उपलब्ध आहे. हे सगळे अहवाल आणि माहिती पाहून मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, दुर्दैवाने नेताजींचा अपघातात मृत्यू झालेला आहे.
रसिक : मुखर्जी कमिशनचा नेताजींच्या गूढ मृत्यूबद्दल एक अहवाल आहे, ज्याची चर्चा अधिक चालते. त्या अहवालाबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर : मुखर्जी कमिशनचा अहवाल मी वाचलेला नाही; पण त्याच्या अगोदरचे शहानवाज कमिटी, खोसला कमिशनचे अहवाल मी वाचले आहेत.
रसिक : विद्यमान भाजप सरकारने नेताजींच्या मृत्यूबाबत ३९ क्लासिफाइड फाइल जाहीर करण्यास नकार दिला आहे, त्या नकारामागचे काय कारण असू शकते? या कागदपत्रांमधील कोणत्या नोंदी सरकारला अडचणीच्या वाटू शकतात?
उत्तर : या नोंदी का जाहीर केल्या जात नाहीत, हे सांगता येणं कठीण आहे. १९६० पर्यंतची सर्व कागदपत्रे क्लासिफाइड झालेली असून ती लोकांसाठी उपलब्ध आहेत. तथापि नेताजी सुभाष व आझाद हिंद सेनेबाबतची कागदपत्रे अद्याप उपलब्ध केलेली गेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण मला असे वाटते की, अशा काही व्यक्ती या एकूण प्रकरणाशी संबंधित होत्या, ज्या ब्रिटिशांच्या बाजूने लढत होत्या; पण भारतात सत्तेचे हस्तांतरण झाल्यानंतर त्यापैकी काही जणांना प्रशासनात समाविष्ट करण्यात आले. अशा व्यक्तींचे हितसंबंध वादग्रस्त असू शकतात.
त्या भूमिकेतून या प्रकाराकडे पाहिलं पाहिजे. संपूर्ण नेहरू वाङ‌्मयाचे जे अनेक खंड प्रकाशित करण्यात आलेले आहेत, त्या वाङ‌्मयाच्या दुस-या मालिकेत नेहरूंनी त्या वेळी देशातील प्रत्येक राज्यपालांना लिहिलेली पत्रे आहेत. ही पत्रे उपलब्ध आहेत. या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की, आझाद हिंद सेनेतील जे जवान आहेत, त्यांना सरकारी नोकरीमध्ये घ्या; पण त्यांच्याकडे सुरक्षेच्या संदर्भात कोणतीही जबाबदारी देऊ नका. ते संघटित होणार नाहीत, याबाबत काळजी घ्या. याचा एक अर्थ असा की, स्वातंत्र्यानंतर सत्ताधा-यांना वेळोवेळी नेताजींची भीती वाटत होती. म्हणून मी ‘महानायक’ लिहीत असताना असे म्हटले की, ‘ते जिवंत असताना ब्रिटिश घाबरले त्यांच्या सामर्थ्याला आणि ते नसताना स्वकीय घाबरले त्यांच्या सावलीला.’ नेहरूंचा आझाद हिंद सेनेविषयीचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नव्हता. स्वातंत्र्यानंतर २५ वर्षे नेताजींच्या सहका-यांना स्वातंत्र्यसैनिकाचाही दर्जा दिला गेला नव्हता. १९७१मध्ये इंदिरा गांधी यांनी आझाद हिंद सेनेतील जवानांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा दिला. त्यांना निवृत्तिवेतन सुरू केले. एक मात्र खरे, सरकारकडून राखून ठेवलेल्या फायलींमध्ये काही तरी संवेदनशील असलं पाहिजे. १०-१५ वर्षांपूर्वी मी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दिल्लीतील रामकृष्णपुरम येथील लष्कराच्या ग्रंथालयात या प्रकरणाच्या फायली होत्या. एकेदिवशी त्या फायलींची अनुक्रमणिका मला वाचायला मिळाली, पण त्या वेळी ग्रंथपालांनी माझ्याकडून ती हिसकावून घेतली. अनुक्रमणिकासुद्धा कुणाला पाहण्याचा अधिकार नाही, असे मला सांगण्यात आले. वेळोवेळी अनेकदा मागणी होऊनही, यासंदर्भातील फायली तमाम जनतेसाठी उपलब्ध केल्या जात नाहीत, याचा अर्थ त्यात आंतरराष्ट्रीय हित गुंतलेले असावे व अति गुप्त दर्जाची, संवेदनशील माहिती लपलेली असावी.
रसिक : गांधी-नेहरूंचे राजकारण फॅसिझमच्या विरोधातले होते. ब्रिटिशांना त्यांनी दुस-या महायुद्धात दिलेला पाठिंबा, हा फॅसिस्ट शक्तींना विरोध करण्यासाठी होता. पण काहींच्या मते, बरोबर नेमकी उलटी भूमिका नेताजींची होती...
उत्तर : हे सगळं थोतांड आहे. नेहरूंना फॅसिझमची भीती वाटत नव्हती, तर त्यांना नेताजींच्या बलदंड व्यक्तिमत्त्वाची धास्ती वाटत होती. कदाचित नेताजी परत आले, तर देशातील बहुतांश जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील, ही शक्यता त्यामागे होती. त्या संदर्भात पंडितजींनी १९४६च्या दरम्यान तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद यांना लिहिलेले सात पानी दीर्घ पत्रसुद्धा नेहरू वाङ‌्मयामध्येच उपलब्ध आहे. १९४६मध्ये सिंगापूर येथे नेताजींच्या सहका-यांनी एक स्मारक बांधले होते. सिंगापूर ताब्यात घेताना माउंटबॅटन यांनी डायनामाइट लावून हे स्मारक उडवून दिले; पण हे स्मारक पुन्हा उभे करण्यात आले. त्याच्या उद्घाटनासाठी नेहरूंना आमंत्रण देण्यात आले होते. १९४६च्या दरम्यान नेहरू खास या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी सिंगापूरला गेले होते, पण त्या वेळी बर्मा एरिया आर्मीचे (नंतर ते शेवटचे गव्हर्नर जनरल झाले) प्रमुख लष्करी कमांडर माउंटबॅटन होते. त्यांना कळले की, नेहरू या कार्यक्रमासाठी आले आहेत. त्यांनी नेहरूंना निरोप दिला की, अगोदर माझी भेट घ्या. तेव्हा नेहरू आणि माउंटबॅटन या दोघांमध्ये जी खासगी चर्चा झाली, त्यामध्ये मुत्सद्दी माउंटबॅटनने नेहरूंना त्यांच्या भविष्यातल्या धोक्याच्या जागा दाखवून देताना “सुभाषचंद्रांचा प्रमाणाबाहेर गौरव करण्याच्या फंदात पडू नका. उद्या तुम्ही देशाचे पंतप्रधान होणार आहात, त्या वेळी वाढणारा हा ‘सुभाषीझम’ तुम्हाला भविष्यात खूप अडचणीचा ठरू शकतो. तुम्ही त्यांना एवढे महत्त्व देऊ नका, तिकडे जाऊ नका,’’ असे म्हटले. नेहरू त्यामुळे कार्यक्रमासाठी गेले नाहीत. पण, रात्री दीड-दोन वाजता नेहरूंना झोप येईना. त्यांनी रात्रीचेच जाऊन त्या समुद्रकाठावर स्मारकाचे दर्शन घेतले. तिथे ‘सुभाष’ असे नाव कोरलेला एक छोटा दगडाचा तुकडा त्यांना मिळाला. तो नेहरूंनी स्वत:कडे ठेवून नंतर आझाद हिंद सैनिकांच्या ताब्यात दिला. हे संपूर्ण कथानक कपोलकल्पित नसून नेहरूंनी स्वत: मौलाना आझाद यांना लिहिलेल्या सहा पानी पत्रात त्या घटनेचा उल्लेख केला. एखाद्या नाटकात किंवा कादंबरीमध्ये शोभावा, असा हा तपशील आहे. या घटनेचा एक साक्षीदार असलेले कॅप्टन के. व्ही. चंद्रन मला १९९५मध्ये मद्रासमध्ये भेटले होते. यावरून लक्षात येतं की, सुभाषबाबूंच्या व्यक्तिमत्त्वाला देशातील अनेक राजकारणी वचकून होते. सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात गेल्याची बातमी २१ ऑगस्टला भारतात आली. त्या वेळी पुण्यातील उरळी कांचनमध्ये गांधीजींचा मुक्काम होता. गांधीजींची सायंकालीन प्रार्थना सुरू होती. प्रार्थनेवेळी त्यांच्या समोरच्याच बाजूला नेहमी एक तिरंगी झेंड्याचे निशाण फडकवले जायचे. काका गाडगीळ पुण्यातून टांगा घेऊन उरळी कांचनला गेले व त्यांनी गांधीजींना नेताजी गेल्याची बातमी सांगितली. गांधीजींनी आपली प्रार्थना आटोपती घेतली. ते रडवेले होत म्हणाले, तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा गेला.
रसिक : १९५२मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. स्वातंत्र्यानंतरच्या सात वर्षांत नेताजींबाबत अशाच वेगवेगळ्या बातम्या पसरत होत्या. पण आपण असे ठामपणे म्हणू शकतो का, की नेहरूंना नेताजींची धास्ती वाटत होती?
उत्तर : नेहरूंच्या पत्रव्यवहारातून तसे अनेकदा स्पष्टपणे जाणवते. शिवाय, नेहरूंनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा दिला नव्हता.
रसिक : पण याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो का की, नेहरूंना विरोध करण्यासाठीच नेताजींची प्रतिमा अशा पद्धतीने उभी केली गेली?
उत्तर : असं काही नाही. नेताजींची प्रतिमा आपसूकच उभी राहिलेली होती. ऐंशीच्या दशकाच्या आधीपर्यंत कुटुंबात जन्माला येणा-या मुलांमध्ये एकाचे तरी नाव सुभाष असे ठेवले जात असे. आपल्याकडे देवांची नावे ठेवण्याची प्रथा आहे. देव सोडले तर सुभाषबाबूंशिवाय एखाद्या राजकीय नेत्याचे नाव काश्मीरपासून कन्याकुमारीपासून घराघरांत दिलेले मला दिसत नाही. त्यांची प्रतिमाच हिमालयासारखी उत्तुंग झाली होती.
रसिक: एवढे सत्यापर्यंत पोहोचणारे अहवाल आजपर्यंत आले असताना नेताजींच्या मृत्यूचा शोध घेण्याची अजूनही गरज आहे का? एक लेखक म्हणून तुम्हाला काय वाटते?
उत्तर : इतिहासातील एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा शोध कुणी थांबवू शकत नाही. आजही राम व कृष्ण अस्तित्वात होते का नाही, हे माहीत नसतानाही त्यांच्यावर लेखन केले जाते. हा शोध शंभर वर्षे, हजार वर्षेही चालू राहील. मला असे वाटते की, पहिल्या पाच-दहा वर्षांमध्ये जो शोध घेण्याची, गांभीर्य दाखवण्याची गरज होती, ते झाले नाही, १९५५ पर्यंत या विषयाला विराम मिळायला हवा होता.
रसिक : सध्या देशात नेहरू विरुद्ध पटेल असे चित्र उभे केले आहे. तसेच चित्र नेताजी विरुद्ध नेहरू केले जात आहे का? उत्तर : नेहरू व नेताजी यांच्यात संघर्ष होताच; पण या सर्व प्रकरणाची सुरुवात त्यांच्या मैत्रीतून झाली आहे. सुरुवातीला हे दोघे गांधीजींच्या विरोधात होते. १९२७च्या मद्रासच्या, १९२८च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनापासून हे दोघे एकत्र होते. ‘हिंदुस्थान के दो लाल सुभाषलाल-जवाहरलाल’, अशी इथल्या तरुणांची घोषणा होती. मी माझ्या कादंबरीत एका प्रकरणात लिहिलेय की, गांधीजींनी हेतुपुरस्सर नेहरूंना तोडून सुभाषबाबूंना आपल्याजवळ केलं. याचं कारण असं की, गांधीजींना लहानपणी पाहिलेली एक सर्कस आठवायची. या सर्कशीत सिंहाचे दोन छावे एवढा धुमाकूळ घालायचे की, प्रेक्षकांना ते घाबरवून सोडायचे. रिंगमास्टर हुशार होता, त्याला वाटलं या दोघांना आपण जोपर्यंत वेगळं करू शकत नाही, तोपर्यंत ही सर्कस आपल्याला पाहिजे तशी इच्छेनुसार चालवता येणार नाही. गांधीजींना देश आपल्या इच्छेनुसार न्यायचा होता. त्यामुळे नेहरू व नेताजी यांना एकत्र आणणं त्यांना परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांनी या दोघांमध्ये फूट पाडली; पण भारताची फाळणी झाल्यानंतर मात्र गांधीजींना सुभाषबाबूंची खूप आठवण येत होती. ते सुभाष असा उल्लेख करत नसत, ते ‘नेताजी’ असा आदराने उल्लेख करत. फाळणीदरम्यान हा मुलगा (नेताजी) आपल्याबरोबर असता तर बरं झालं असतं, असे उद््गार त्यांनी काढलेले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात आझाद हिंद सेनेच्या कार्याचा साधा उल्लेख केला नाही; पण हे तिघांच्या संबंधातील नाट्य होते. नेहरूंच्या एका पत्रसंग्रहात मला एक वाक्य सापडलं. ते म्हणतात, The relations between us, we trimurivate is taking an unavoidable shape of a Shakespearean tragedy (आपल्या तिघांमधील नातेसंबंधांना शेक्सपिअरच्या एखाद्या अटळ शोकांतिकेसारखा आकार येऊ लागलेला आहे.) जन्मत:च उत्तुंग उंची घेऊन आलेल्या त्या तिघांनाही आपल्यातील एक-दुस-याच्या सामर्थ्याची आणि योग्यतेची पूर्ण कल्पना होती, हे विशेष.
हेंडरसन ब्रुक्स-भगत रिपोर्ट
१९६२च्या चीन युद्धात भारताची हार कोणत्या कारणांमुळे झाली, याची चौकशी करण्यासाठी त्या वेळी लेफ्ट. जन. हेंडरसन ब्रुक्स, ब्रिगे. प्रेमिंद्र सिंग भगत यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल गेली ५० वर्षे सरकारने गोपनीयतेच्या कारणास्तव प्रसिद्ध केलेला नाही. या अहवालात नेताजींच्या चीन भेटीची माहिती असण्याची शक्यता आहे. नेताजींच्या मृत्यूचा शोध न्या. मुखर्जी यांच्या समितीनेही घेतला होता. या समितीने नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नसल्याचे मत दिले होते.

authorvishwaspatil@gmail.com