आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी अमृता देवेंद्र फडणवीस (कव्हर स्टोरी)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौटुंबिक-व्यावसायिक आघाड्यांचा समतोल साधण्याची क्षमता महिलांमध्ये असतेच. त्यामुळं त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध जरूर घ्यावा. पतीचं पद, पैसा आिण प्रतिष्ठेच्या वेष्टनातच पत्नीनं स्वत:चा सन्मान गृहीत धरू नये. स्वत:ची मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर तो कमवावा...
आपण सोबतच जेवण करूयात म्हणजे मला तुमच्यासाठी व्यवस्थित वेळ देता येईल,’ असं अमृता फडणवीस जेव्हा म्हणतात तेव्हाच मुंबईतल्या पवई या उपनगरातल्या रेनेसाँ या अकरा मजली पंचतारांकित हॉटेलच्या काॅन्फरन्स सेंटरमध्ये वावरताना मनावर येणारं दडपण दूर होतं. शांत स्वरात आपलं म्हणणं मांडण्याची त्यांची पद्धत आणि संयमित देहबोली यामुळे आपोआपच मोकळेपणा येतो व एका सेलिब्रिटीची मुलाखत घेत आहोत हे आपण विसरून जातो. हळूहळू टेबल नंबर ८१ वर गप्पांची मैफल रंगत जाते. आणि समोर येते एक अशी व्यक्ती जिला तिचं करिअर प्रिय आहे. जिचं कुटुंबावर खूप प्रेम आहे. आणि जिला मुख्यमंत्र्याची पत्नी यापलीकडे जाऊन स्वत:ची अशी एक ओळख जपायची आहे.

‘माझं एमबीए पूर्ण झालं तेव्हापासून मी नोकरी करतेय. आमचं लग्न ठरलं त्या वेळी देवेंद्र यांची आमदारकीची दुसरी टर्म सुरू होती,’ बँकेत नोकरी करायला लागल्यापासून बँकेच्या असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट या पदापर्यंतचा प्रवास अमृता उलगडत होत्या. ‘देवेंद्रची बायको नोकरी करणारी नसावी, अशी त्यांच्या आईची इच्छा होती व ते त्यांचं राजकीय करिअर लक्षात घेता स्वाभाविक होतं. मात्र मी नोकरी करावी यावर देवेंद्र ठाम होते. स्वत:च्या क्षमतांवर स्वतंत्र अस्तित्व असणारी स्त्री त्यांना सहचारिणी म्हणून हवी होती. अर्थात लग्नानंतर सासूबाईंनीही या गोष्टीला संमती दिली. माझ्या स्वयंपूर्णतेसाठी मलाही नोकरी करणं महत्त्वाचं वाटत होतं. उलट मी तर म्हणेन की प्रत्येक स्त्रीला स्वत:चं अवकाश शोधण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. आपापल्या कुवतीनुसार प्रत्येकीनं स्वत:चा शोध घेण्यासाठी धडपड केली पाहिजे.

माझी स्पर्धा स्वत:शीच आहे, असं मी मानते. एक आई, पत्नी, सून आणि बँकेची अिधकारी म्हणून कालच्यापेक्षा आज मी स्वत:ला अधिकाधिक परिपूर्ण कशी बनवू शकेन हा माझा प्रयत्न असतो. त्या परिपूर्णतेसाठी स्वत:च्या क्षेत्राव्यतिरिक्तही इतर विषयांची माहिती असणं, वाचन आणि चिंतन हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आज अकरा-बारा तास काम केल्यानंतरही रात्री पुस्तकाची काही पानं वाचल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही,’ असं जेव्हा अमृता म्हणतात तेव्हाच त्यांच्या वेगळेपणाची खात्री पटते.

या गप्पांदरम्यान ओघानेच विषय निघाला महिला सक्षमीकरणाचा. प्रत्येक स्त्रीला स्वत:ची मतं मांडण्याचा अधिकार असलाच पाहिजे, असं अमृता यांना ठामपणे वाटतं. मात्र त्याच वेळी स्त्रियांनी सारासार विचार करून निर्णय घेण्याची हिंमत, परिणामांना सामोरं जाण्याचं धाडसही दाखवावं असं त्या म्हणतात. एखाद्या महिलेच्या यशाच्या प्रवासात, तिच्या करिअर ओरिएंटेड विचारसरणीची जडणघडण होण्यात कौटुंबिक वातावरणाचा मोठा वाटा असतो.

तिला ज्या पद्धतीनं, ज्या विचारात वाढवलं गेलंय ती बाब तिच्या भविष्याची दिशा ठरवण्यात महत्त्वाची असते. जिथे संस्काराचा, वैचारिक बैठकीचा पाया पक्का असतो तिथे, सहसा ‘चॉइस’ चुकत नाही, असंही त्या नमूद करतात.

नोकरी, करिअर करणा-या स्त्रिया आज व्यावसायिक पातळीवरच्या चर्चेत निर्भीड मत व्यक्त करतात. आपले विचार, संकल्पना स्पष्टपणे मांडतात. कंपनीच्या भविष्यातील नियोजनात, धोरणात्मक पातळीवरील निर्णयाच्या अंमलबजावणीत सक्रिय योगदान देतात. मात्र त्याच स्त्रिया करिअरविषयक स्वत:चे काही निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा कौटुंबिक अथवा भावनात्मक पातळीवर विचार करतात, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. उदा. पदोन्नती घेताना अनेक जणी घराचं कसं होईल, हा विचार करून पदोन्नतीला हो किंवा नाही, बहुतेक वेळा नाहीच, म्हणतात. ही स्थिती बदलण्यासाठी भावनात्मक पातळीवरही स्त्री सक्षमतेचा आग्रह अमृता धरतात.

अमृता यांच्या माहेरी, रानडे परिवारात राजकारणाचा कुठलाच वारसा नाही. घरी सगळे डाॅक्टर. याउलट देवेंद्र यांच्या रूपात फडणवीस कुटुंबातली तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्यास, तो आपल्याच घरात राहावा यासाठी आपल्याच पत्नीला तिकीट मिळवून देण्याचा प्रघात हल्ली सर्वच पक्षांत आहे. त्या पार्श्वभूमीवर, जर अशी वेळ आली तर काय कराल, यावर त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या वैचारिक स्पष्टतेची साक्ष देऊन गेलं. ‘पक्षासाठी विविध पातळ्यांवर तळमळीनं राबणा-या अनेक महिला कार्यकर्त्या आहेत. आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे या महिलांनी पक्षासाठी दिलेली आहेत. अशा वेळी जर केवळ माझा नवरा राजकारणात आहे म्हणून मी निवडणुकीला उभी राहणार असेन तर तो त्या महिलांवर अन्याय होईल. त्यामुळे परििस्थती निर्माण झालीच तर अशा कार्यकर्तींपैकी एखादीला संधी द्यायला मला जास्त आवडेल,’ असं अमृता म्हणतात.

कॉर्पोरेट कल्चरमधला ताण, कामाच्या अनियमित वेळा, सहका-यांकडून काम करून घेण्याची कसरत, राज्याच्या कारभाराची जबाबदारी असलेला नवरा या सगळ्यांमधून हे सेलिब्रिटी कपल एकमेकांसाठी कधी आणि कसा वेळ काढत असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता अर्थातच होती. ‘माझं आॅफिस, जाण्यायेण्यातला वेळ, देवेंद्र यांच्या बैठका, घरी सतत असलेली पाहुण्यांची, भेटायला येणा-यांची रांग यातून दिवसभरातून जेमतेम पंधरा मिनिटं आम्हाला एकमेकांसाठी मिळतात. दिवसभरातून इतर वेळी अगदीच काही महत्त्वाचं असेल तर आम्ही एसएमएस करतो. परंतु आमच्या दोघांसाठीही ही पंधरा मिनिटं खूप मौल्यवान असतात. ती आम्हाला पुढच्या चोवीस तासांसाठी ऊर्जा पुरवतात. त्यामुळे या वेळात काय बोलायचं याची मी अनेकदा यादीच करून ठेवते, नाहीतर अनेक गोष्टी ऐन वेळी आठवतच नाहीत.’

मुलांना वेळ देता येत नाही ही रुखरुख आणि त्याच वेळी आपलं वेगळं काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी अशा दोलायमान मानसिकतेतून प्रत्येक स्त्रीला जावं लागतं. “पण माझ्या मनाला अशी अपराधीपणाची टोचणी कधीच लागली नाही. एक तर सासूबाई सोबत असतात. त्या दिविजाला आई-बाबांची अनुपस्थिती जाणवू देत नाहीत. सुदैवाने माझा कामाचा आठवडा पाच दिवसांचा असतो, त्यामुळे शनिवार व रविवार पूर्णपणे दिविजा आणि कुटुंबासाठी असतात,’ असं त्या सांगतात.

लग्नानंतर नागपूरहून मुंबईला बदलीचा मुद्दा असो किंवा चालक परवाना नूतनीकरण, अमृता यांनी कधीही बँक व्यवस्थापन किंवा इतर कार्यालयांतील अधिकारी-कर्मचा-यांकडून विशेष वागणुकीची अपेक्षा ठेवली नाही. किंबहुना जे नियमानुसार असेल ते आणि तेवढंच आपल्याला मिळावं, असं त्यांना वाटतं. मुलाखतीदरम्यानच्या तास-सव्वा तासात त्यांनी एकदाही फोनकडे पाहिलं नाही, हे आवर्जून नोंद घ्यावं असं

वैशिष्ट्य. इतकेच नव्हे तर जेवून परत निघताना हॉटेल व्यवस्थापनाला जेवणाच्या बिलासंबंधी त्यांनी विचारलं, तेव्हाच त्यांचा साधेपणा, समंजसपणा आणि जबाबदारीच्या जाणिवेचा प्रत्यय आला. गावोगावच्या नगरसेवकांच्या पत्नीचा रुबाब आपण पाहिलेला/ऐकलेला असताे, मग उच्चपदी विराजमान झालेल्यांची कथाच वेगळी. अमृता देवेंद्र फडणवीस या बाबतीतही कौतुकास्पद अपवाद आहेत, हे महाराष्ट्राच्या नागरिकांचं सुदैवच म्हणायला हवं.
vandana.d@dbcorp.in
फोटो : संदीप महाकाळ, मुंबई
बातम्या आणखी आहेत...