आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊर्जाप्रवाही शोधग्रंथ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शब्दांच्या कलाकुसरीत आणि पारलौकिक आशयात अडकलेल्या मराठी कवितेला सामाजिक चेहरा देऊन तिला जनमानसाच्या दुःखाशी जोडण्याचे काम ज्या ज्या कवींनी केले, त्यांचा अभ्यासपूर्ण पट सांगोलेकरांनी प्रस्तुत ग्रंथात मांडला आहे...

जोपर्यंत ‘समाज’ या संज्ञेची सांस्कृतिक अर्थाने व्यापक व्याख्या मराठी संशोधनात येत नाही, तोपर्यंत मराठी साहित्यसमीक्षा समाजशास्त्रीय दृष्टीने विकसित करता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे...

सा वित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा ‘मराठी सामाजिक कविता ः शोध आणि बोध’ हा संशोधनात्मक ग्रंथ औरंगाबादच्या स्वरूप प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. १८५४ ते १९९० या सव्वाशे वर्षांतील मराठी कवितेतील सामाजिकतेचा शोध डॉ. सांगोलेकर यांनी या ग्रंथात घेतला आहे.

या ग्रंथाच्या निमित्ताने सांगोलेकरांनी जे प्रश्न समोर ठेवले आहेत, ते मराठी कवितेच्या अभ्यासकांसाठी अधिक महत्त्वाचे आहेत. शब्दांच्या कलाकुसरीत आणि पारलौकिक आशयात अडकलेल्या मराठी कवितेला सामाजिक चेहरा देऊन तिला जनमानसाच्या दुःखाशी जोडण्याचे काम ज्या ज्या कवींनी केले, त्यांचा अभ्यासपूर्ण पट सांगोलेकरांनी प्रस्तुत ग्रंथात मांडला आहे. सामाजिक कवितेचे आद्यजनकत्व सावित्रीबाई फुले यांना देऊन म. फुले, केशवसुत, मुक्तिबोध, करंदीकर, सुर्वे, ढसाळ ते सुरेश भट असा सामाजिक कवितेचा आढावा या ग्रंथात लेखक घेतात. संशोधनाच्या शिस्तीत शतकातील सामाजिक कवितेचा आढावा घेणे ही गोष्ट सोपी नाही. बऱ्याचदा कवितेविषयी लिहिताना विशेषतः सामाजिक कवितेविषयी लिहिताना संशोधक अभिनिवेशी होण्याची शक्यता असते. परंतु या संशोधनात डॉ. सांगोलेकरांनी आपल्यातला कवी आणि कार्यकर्ता या दोन्ही अंगांना बाजूला ठेवून तटस्थपणे हे संशोधन केले आहे.

सामाजिक कवितेच्या उगमाची पार्श्वभूमी सांगताना मुकुंदराज, ज्ञानेश्वर, महदंबा असे संतकाव्याचे दाखले देत पंडिती आणि शाहिरी काव्याच्या विकासात सामाजिक कवितेची मुळे कशी आहेत, याविषयी या ग्रंथात अनेक दाखले मिळतात. संत चोखा मेळा आणि संत तुकारामांच्या काव्यातील सामाजिक आशय अधोरेखित करून मराठी कवितेला समाजभान कसे मिळाले, याचे सार्थ विवेचन वाचायला मिळते. कविवर्य केशवसुत, कवी अनिल, मुक्तिबोध आणि कुसुमाग्रज यांच्यापर्यंतच्या कवितेतील सामाजिक आशयाचा नेमकेपणाने वेध डॉ. सांगोलेकर घेतात. विशेषतः कुसुमाग्रजांच्या कवितेतील सामाजिक अन्वयार्थ त्यांनी नेमकेपणाने मांडला आहे. १९६० ते १९९० या काळात दलित कवितेने जे वादळ आले, त्या वादळाने मराठी कवितेचा चेहरा बदलला. चंद्रात प्रेयसी शोधणाऱ्या कवितेला भाकरीचा चंद्र माहीत करून दिला गेला. त्या अनुषंगाने नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, यशवंत मनोहर ते प्रज्ञा पवार अशा अनेक दलित कवींचे दाखले देत सांगोलेकरांनी ज्या नोंदी केल्या आहेत, त्या मराठी कवितेतील सामाजिकतेचा इतिहास मांडण्यासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. डॉ. सांगोलेकर हे प्रसिद्ध गजलकार आहेत. गजलअभ्यासक अशी त्यांची सर्वदूर ख्याती आहे. या ग्रंथात त्यांनी सुरेश भटांच्या गजलांच्या निमित्ताने गजलकाव्यातील जो सामाजिक आशय मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तोही खचितच महत्त्वाचा आहे.

समाजातील सुख-दुःखे, व्यथा-वेदना, प्रश्न-समस्या, घडामोडी, चळवळी-आंदोलने यांना सामाजिक कवितेत महत्त्वाचे स्थान असते, असे अधोरेखित करून डॉ. सांगोलेकर समाज, धर्म आणि राजकारण या गोष्टींना वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करतात. संशोधनाच्या सोयीसाठी हे सोयीचे असले, तरी जोपर्यंत ‘समाज’ या संज्ञेची सांस्कृतिक अर्थाने व्यापक व्याख्या मराठी संशोधनात येत नाही, तोपर्यंत मराठी साहित्यसमीक्षा समाजशास्त्रीय दृष्टीने विकसित करता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे. धर्म, रूढी आणि आध्यात्मिक परंपरेने समाजाला जे जखडून ठेवले होते, त्याला तोडण्याचे काम सोळाव्या शतकात तुकारामांनी केले, कबीरांनी केले, पुढे फुले आणि सावित्रीबाईंनी केले, ही सामाजिक सुधारणेची काव्यपरंपरा डॉ. सांगोलेकरांनी अधोरेखित केली आहे, हे या ग्रंथाचे सामाजिक संचित म्हणावे लागेल.

सामाजिक कविता लिहिण्यासाठी कवीने सामाजिक कार्यकर्ता असणे आवश्यक असते, असे नाही. इहवादी विचारकोशात सामाजिक कविता जन्मते, तिचा कर्ताकरविता परमेश्वर नसून व्यक्ती असते. मानवता, बुद्धिप्रामाण्यता आणि विज्ञाननिष्ठता यातून सामाजिक कवितेची तात्त्विक बैठक तयार होते. यातूनच उद्याचे सुधारणायुग जन्म घेते. मराठी कवितेत या सुधारणायुगाची परंपरा कशी विकसित झाली, हे सूत्ररूपाने लेखकाने मांडले आहे. ही परंपरा तुकारामांकडे जेवढी नेता येईल तेवढी ती सम्यक होईल, हा सांगोलेकरांनी केलेला निर्देश नव्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचा आहे.

मात्र, १९९० नंतरच्या मराठी कवितेतील सामाजिकतेविषयी डॉ. सांगोलेकरांनी फारसे विस्ताराने लिहिलेले नाही. खरे तर त्यांनी तसे प्रस्तावनेत नमूद केलेही आहे. पण १९९० नंतरच्या सामाजिक कवितेच्या अनुषंगाने त्यांनी जी काही मते मांडली आहेत, ती आजच्या वास्तवात समजून घेणे महत्त्वाची आहेत. त्यांच्या मते, जागतिकीकरण हे भांडवलशाहीचे विस्तारित रूप आहे. त्यामुळे आज माणसाच्या सांस्कृतिक जगण्यावर प्रचंड प्रभाव आणि हस्तक्षेप करण्याचे काम जागतिक भांडवली व्यवस्था करते आहे. या प्रभावामुळे आपल्या लेखनपरंपरा, लेखनप्रक्रिया आणि ग्रंथव्यवहार सारे काही बदलले आहे. अशा काळात आपल्या सामाजिक आंदोलनांचे आणि सामाजिक कवितेचे काय, हा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून या ग्रंथात १९९० नंतरच्या सामाजिक कवितांचा आढावा घेतला गेला असता, तर जागतिकीकरणातल्या सामाजिक कवितेचा बोध होण्यास अधिक मदत झाली असती. तरीही “१९६० नंतर उदयाला आलेल्या दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी वाङ‌्मयप्रवाहांमुळे मराठी कविता अधिकाधिक समाजाभिमुख होत गेली. १९९० नंतर एकूणच जागतिक पातळीवर काही लक्षणीय घटना घडल्या आणि आमच्या समाजजीवनात पुन्हा संक्रमण आले.” हे डॉ. वासुदेव मुलाटे यांचे या ग्रंथाच्या मलपृष्ठावरील निरीक्षण ही चर्चा पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे आहे.

डॉ. सांगोलेकर यांनी विचारव्यूहाच्या काठावर उभे राहून काहीशा तटस्थपणे या संशोधनग्रंथाचे लेखन केले आहे. कदाचित त्यांच्या संयत, संयमी आणि काहीशा अलिप्त स्वभावाचे ते वैशिष्ट्य आहे. या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणाला संदर्भ आणि टीपा देऊन ग्रंथाच्या शेवटी जवळजवळ दोनशे महत्त्वाच्या ग्रंथांची संदर्भसूची दिली आहे. नव्या संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी
डॉ. सांगोलेकर यांचे हे पुस्तक जसे संशोधनाची ऊर्जा देणारे आहे; तसेच महाराष्ट्रातील
सामाजिक चळवळींना व त्यातील बारकाव्यांना बारकाईने अधोरेखित करणारा हा ऐतिहासिक दस्तऐवजही आहे.
m.kasbe1971@gmail.com
बातम्या आणखी आहेत...