आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Introduction Of J. Krishanmurthi: Chief Guest Of School

ओळख जे. कृष्‍णमूर्तींची: शाळेतील प्रमुख पाहुणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमशून्य समाज हा नद्या नसणा-या
प्रदेशासारखा असतो...
शाळा मुलांच्या मनात उच्च-नीचतेची भावना पेरत असतात. पण शाळांमधून विषमतेचे संस्कार होऊ नयेत. मुलांमध्ये, माणसामाणसांत कोणत्याही पातळीवर भेदभावाची भावना निर्माण होऊ नये. संवेदनेच्या पातळीवर समतेचा दृष्टिकोन रुजवण्याची कृष्णमूर्तींची मांडणी शिक्षक-पालकांना उपयुक्त आहे. अर्थात ते आमच्या रूढ सामाजिक परिघावर बोलत नाहीत, तर व्यक्तिमत्त्वाच्या एकसंघतेची
गरज संवेदनशीलतेचा मुद्दा स्पष्ट करताना ते ही मांडणी करतात.
शाळांमध्ये नेहमी श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांनाच कार्यक्रमांना बोलावले जाते. प्रतिष्ठा ही पुन्हा राजकारणानेच वाढत असल्याने कुठले तरी राजकीय-सामाजिक क्षेत्रातील लोकच बोलावले जातात. यशस्वी माणसांच्या व्याख्याही पुन्हा पैसा मिळवणे व त्या पैशातून सत्ता किंवा सत्तेच्या वर्तुळाजवळ असणे अशा असतात.
एखादा शेतकरी जर कष्ट करून श्रीमंत झाला असेल तर तो शाळेचा पाहुणा होत नाही. एखादा कष्टकरी प्रामाणिक जगत असेल तर तो यशस्वी गणला जात नाही. काही विशिष्ट पेशांनाच फक्त प्रतिष्ठित गणले जाते. त्यातून वाईट गोष्ट अशी होते की, त्या लहानग्या वयात जगात यशस्वी होणे म्हणजे केवळ या पदांवर जाणे असेच मुलांवर ठसते. आज डॉक्टर, इंजिनिअरपेक्षा जास्त पैसा मिळवणारी अनेक क्षेत्रे आहेत, पण लहानपणापासून ते प्रतिष्ठित बघितल्याने तेच व्हावेसे वाटते.
कृष्णमूर्ती नेमक्या या मानसिकतेवर आघात करतात. ते म्हणतात, ‘ एखादी महत्त्वाची व्यक्ती, अधिकारी इमारतीची कोनशिला बसवण्यासाठी येणे ठीकच आहे, पण त्या सगळ्या घटनेमागची जी मनोवृत्ती आहे तीच कीड लावणारी आहे. तुम्ही खेडवळ माणसांना भेटण्यासाठी कधी जात नाही. त्यांच्या भावनांशी समरस होत नाही. त्यांना किती थोडे अन्न खायला मिळते. ते दिवसांमागून दिवस अविश्रांतपणे शेवटपर्यंत काबाडकष्ट करतात. ते स्वत: जाऊन पाहत नाहीत....ग्रामस्थांशी जाऊन बोला. त्यांच्या मुलांसोबत खेळा. मग तुम्हाला असे दिसेल की, अगदी निराळ्याच प्रकारचा समाज अस्तित्वात येईल. कारण मग देशात प्रेम असेल. प्रेमशून्य समाज हा नद्या नसणा-या प्रदेशासारखा असतो. तो वाळवंटासारखा असतो. आपण बहुतेकजण निष्प्रेम वातावरणात वाढतो. त्यामुळेच आपण समाजातील कुरूप लोकांसारखाच समाजही विद्रूप बनवला आहे....’
कृष्णमूर्ती मला भावतात ते यासाठी. शाळेत पाहुणा कोण बोलावला इतक्या साध्या घटनेचे इतके धारदार आणि सखोल विश्लेषण ते करून आपल्या दांभिकतेची आणि असंवेदनशीलतेची चिकित्सा ते करतात. गरिबांशी बोलणे त्यांना समाजसेवेची टूम म्हणून अपेक्षित नाही तर तुमच्यातील संवेदनशीलता, प्रेमाचे ते नैसर्गिक प्रकटीकरण म्हणून ते त्याकडे बघतात. त्यांच्या वेदनेशी एक माणूस म्हणून तुमचे हार्दिक नाते कोणतीही विशेष पोझ न घेता असले पाहिजे असे ते सुचवतात आणि म्हणूनच त्याला ते समाजसेवाही म्हणत नाही. कारण समाजसेवा म्हटले की, तुम्ही विशेष काहीतरी करता हा भाव त्यात असतो. एके ठिकाणी ते म्हणतात की, रस्त्यात दगड दिसला की तुम्ही सहजपणे तो बाजूला फेकता आणि विसरूनही जाता. तेव्हा आपण काही विशेष करतो आहोत अशी भावना मनात नसते. लोकांच्या दु:खात सहभागी होताना इतकी सहजता असली पाहिजे.
शाळा आणि कुटुंबव्यवस्था किती चुकीचे संस्कार मुलांवर करत असते हे यातून लक्षात येते. माजी विद्यार्थी म्हणून शाळा पुन्हा त्याच मुलांचा उदोउदो करते की, जे या प्रकारचे प्रतिष्ठित होतात. चांगला शेतकरी, कुशल सुतार, कष्टकरी यात येत नाहीत. यातून चुकीचा संदेश मुलांपर्यंत जातो.
कृष्णमूर्ती थेट अंत:करणाच्या प्रेमाशी हा विषय जोडतात. अशा विषम मनोवृत्तीचा भाव हा प्रेमशून्यतेचे लक्षण त्यांना वाटते.
आचार्य रजनीशांनी शिक्षक दिनावर केलेले भाष्य या ठिकाणी आठवते. ते म्हणाले होते, राधाकृष्णन राष्‍ट्रपती झाले म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करणे यात शिक्षकाचा सन्मान नाही, तर सत्तेविषयी आपल्या मनातील अतीव आदराची ती पूजा आहे. जेव्हा एखादा राष्‍ट्रपती शिक्षक होईल तेव्हा तो शिक्षकांचा सन्मान असेल.
थोडक्यात, आमच्या प्रेमशून्यतेने आम्ही शिक्षणाला व सामाजिक मूल्यांना सत्तेचे पुजारी केले आहे. कृष्णमूर्ती मुलांना यापासून मुक्त करायला व प्रेम हीच जगण्याची भाषा बोलायला सांगतात.