आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचय जे कृष्‍णमुर्तींचा : संवेदनशीलता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘धर्मशील असणे म्हणजे वास्तवतेला संवेदनक्षम असणे होय’’
दिल्लीत घडलेली एक घटना मला विसरताच येत नाही... फुटपाथवर राहणारी एक महिला. रस्ता ओलांडताना एका गाडीने तिला उडवताच ती मरण पावली. वेळ रात्रीची. कुणी बघायला नाही. तिच्या मृत शरीरावरून गाडी तशीच घातली. मागच्या थांबलेल्या गाड्यांनीही नंतर तेच केले. रात्रभर तिच्या शरीरावरून गाड्या तशाच जात राहिल्या. सकाळी तिचे शरीर चिपाड झाले होते. मला ही घटना आपल्या सामाजिक असंवेदनशीलता आणि कोडगेपणाचा कडेलोट वाटतो... आपल्या माणूसपणाच्या अध:पणाची ही परिसीमा वाटते....केदारनाथ दुर्घटनेच्या ‘देवभूमीत’ मृतदेहांवरील दागिने लुटल्याच्या बातम्या आल्यात. या सर्वांचे जवळचे विश्लेषण संवेदनशीलतेचा -हास हेच वाटते. शिक्षणाचे वाढते प्रमाण आणि संवेदनशीलतेचा होणारा -हास यातील सहसंबंधही शिक्षणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करतात.


आजच्या सर्व क्लिष्ट होत जाणा-या प्रश्नांच्या मुळाशी कमी होत जाणारी संवेदनशीलता हे महत्त्वाचे कारण आहे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘संवेदनक्षम असणे म्हणजे सर्व वस्तुमात्रांविषयी मनात ऋजू भावना असणे होय.’’ ते संवेदनशीलतेची इतकी साधी सरळ व्याख्या करतात. प्राणी, पक्षी, निसर्ग, माणूस आणि त्याचबरोबर जिव्हाळ्याने वागणे याला ते संवेदनशीलता म्हणतात. आपल्याला सजीवांशी जिव्हाळ्याने वागणे समजू शकते, पण याचबरोबर निर्जीव वस्तूंशी प्रेमाने वागणे समजणे कठीण जाते. पण वस्तूंना स्पर्श हळुवार करण्यातूनही संवेदनशीलता संवर्धित होत असते.


आचार्य रजनीशांनी यासंदर्भात एक गोष्ट सांगितली आहे. एक विदेशी भक्त एका गुरूच्या दर्शनाला गेला. त्याने खोलीत जाताना दार जोराने आपटले. तेव्हा गुरू त्याला म्हणाला, तू दाराशी फारच असंस्कृत वागलास. त्या दाराची माफी माग. त्या शिष्याने लिहिलेय की मला ती गोष्ट मूर्खपणाची वाटली. पण जेव्हा मी दाराला हळुवार स्पर्श करून माफी मागितली. तेव्हा दारात काहीच बदल झाला नाही, पण माझ्यात आतून काहीतरी हलले असे मला वाटले. ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे.
यात केवळ वस्तूंशी हळुवार वागणेच अपेक्षित नाहीतर वस्तूंशी नासाडी न करणंही अभिप्रेत आहे. संतपुरुषांमध्ये ही संवेदनशीलता प्रामुख्याने जाणवते. ज्ञानेश्वरांनी आत्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांची लक्षणे सांगताना, तो पाऊल उचलताना किडाही मरू नये याचा विचार करतो असे सांगतात. रामकृष्ण परमहंस चालताना हिरवळीवरूनही कधी चालत नसत. त्यांना गवताला तुडवणेही क्लेशदायक वाटे असा उल्लेख आहे. तेव्हा ही वाढणारी संवेदनशीलताच व्यक्तिमत्त्वाला उन्नत करत असते.


पण ही संवेदनशीलता वाढवण्याचे कोणतेच औषध कृष्णमूर्ती देत नाहीत. ते म्हणतात, ‘संवेदनशील होण्याचा मुद्दाम प्रयत्न करणे हाच असंस्कृतपणा होईल. पण असंस्कृतपणा म्हणजे काय हे समजून घेण्यासच मी सुरवात केली. रोजच्या जीवनात निरीक्षण केले तर पालट घडून येते. तुम्ही तुमच्या नोकरांशी कसे बोलता हे पाहा. राज्यपालांना तुम्ही केवढा मोठा आदर दाखवता तेही पाहा आणि ज्या मनुष्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही त्याला किती तुच्छतेने वागवता ते ही पाहा....तुम्ही किती मूर्ख आहात ते तुम्हाला समजू शकेल आणि त्या मूर्खपणाच्या बोधातच शहाणपणा, संवेदनशीलता असते...’’
थोडक्यात कृष्णमूर्ती शॉर्टकट सांगत नाहीत. ते सातत्याने आपल्या कृतींचे, आपल्या भावनांचे निरीक्षण करायला सांगतात. आपल्या असंस्कृततेचे आकलन करायला सांगतात. त्यातूनच आपली संवेदनशीलता विकसित होत जाते.


शाळांमधून विद्यार्थ्यांमधील संवेदनशीलता संवर्धित व्हायला हवी. ती पुन्हा एखाद्या पीरियडने होणार नाही, पण आपल्याला वातावरण तर नक्कीच निर्माण करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकाचे प्रेममय व्यक्तिमत्त्व हेच त्याचा आधार आहे. शिक्षकाने दिवसभर स्वत:ला आनंदी ठेवले, मुलांना प्रेमाने स्पर्श केला, डोळ्यातून करुणा पाझरली तरी मुलांवरचे प्रेमच मुलांना संवेदनशील बनवू शकेल. वस्तू हळुवार हाताळणे, वस्तूंशी नासाडी न करणे, आदळआपट न करणे, मुलांना एकांताची संधी उपलब्ध करून देणे, सूर्योदय-सूर्यास्त रोज बघायला लावणं, सातत्याने मुलांना निसर्गात नेणं यातून संवेदनशीलता फुलू शकेल.
कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘धर्मशील असणे म्हणजे वास्तवतेला संवेदनक्षम असणे होय...’’ धर्मशीलतेची इतकी साधी आणि तरल व्याख्या यापेक्षा कोणती असू शकेल...