आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Introduction Of J. Krishanmurty: Teacher And Love

परिचय जे. कृष्‍णमूर्तींचा: शिक्षक आणि प्रेम...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णमूर्तींना बरेच जण खूप बौद्धिक समजतात... ते फक्त तत्त्वज्ञानाची बौद्धिक जड मांडणी करतात अशी तक्रार अनेकदा करतात... तुम्हाला कृष्णमूर्ती कसा काय समजतो हो, आमच्या तर डोक्यावरून जातो, अशी चेष्टाही करतात. पण मला उलट वाटते... कृष्णमूर्ती मला पुस्तकी बुद्धिवादापासून पूर्णत: दूर वाटतात. कृष्णमूर्ती मला जिवंत, रसरशीत वाटतात. ते कोणतेही जड तत्त्वज्ञांचे कोटेशन सांगत नाहीत... पुस्तकी पुरावे मांडत नाहीत. उपदेश तर अजिबात करत नाहीत... याउलट त्यांना निसर्गात रुची आहे. ते वेद आणि दर्शने बघत बसण्यापेक्षा एखाद्या गवताच्या पानाचे सौंदर्य बघत बसतात... धर्मांच्या झेंड्यांचे रंग बघण्यापेक्षा आकाशाचे बदलणारे रंग बघतात. ग्रंथ वाचण्यापेक्षा ते जीवनाचे पुस्तक वाचायला सांगतात. त्यांच्या एका पुस्तकाचे नावच मुळी ‘द बुक ऑफ लाइफ’ आहे...
ही सारी चर्चा करण्याचे कारण असे की शिक्षकाविषयी, शिक्षकाच्या जडणघडणीविषयी अनेक ठिकाणी वाचल्यावर लक्षात येते की शिक्षकाकडून बौद्धिक स्वरूपाच्या खूप अपेक्षा केल्या जातात. अमूर्त शब्दांत त्याला उपदेश केला जातो. पण कृष्णमूर्ती असे कोणतेच अमूर्त उपदेशाचे डोस शिक्षकांना पाजत नाहीत. शिक्षकांनी माहितीचा साठा बनावं अशी अपेक्षा ते करत नाहीत, तर बुकिश बनण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष रसरशीत जगून दाखवावं, अशीच त्यांची अपेक्षा आहे आणि इतकं साधं सरळ ते शिक्षकांशी बोलतात. ‘शिक्षक म्हणून जर स्वत:च सौंदर्य आणि कुरूपता व उभयतांविषयी संवेदनशील असला... जर तुमच्यामध्येच सौम्यता वसत असली तर तुमच्या विद्यार्थ्यांमध्येही स्नेहभावना व इतरांबद्दलही आदर तुम्ही निर्माण करू शकाल’... प्रेमाविषयी असे बोलताना ते खूप सहजतेने बोलतात. ‘प्रेमाचा प्रारंभ खरोखर शिक्षकांपासून, शिकवणा-यांपासून झाला पाहिजे. तुम्हाला गणित, भूगोल किंवा इतिहास यांची माहिती देण्याबरोबरच शिक्षकांच्या हृदयातही प्रेमभावना असेल आणि ते जर त्याबद्दल बोलतील... ते जर उत्स्फूर्तपणे रस्त्यावरील दगड बाजूला करतील... त्यांच्या संभाषणात, त्यांच्या कामात, खेळात तुमच्या संगतीत असताना किंवा एकटे असताना ही विलक्षण भावना त्यांना जर सतत जाणवत असली आणि ती ते लक्षात आणून देत असले तर तुम्हालाही प्रेम म्हणजे ते काय कळेल...’
मला सांगा, यात न कळण्यासारखे काय आहे....आपल्याच हृदयातले प्रेम फक्त ते उघड करायला सांगतात. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल संवेदनशील राहायला सांगतात. पुन्हा त्यांच्या प्रेमाची भाषा ही अमूर्त नाही तर अगदी रस्त्यावरील दगड उचलून टाकणे इतके सोपे प्रेमाचे प्रकटीकरण असते... शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वात सौम्यता असावी हे ते अगदी सहजतेने सांगतात. मला शिक्षक म्हणून हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो. माझ्यासारखे खूप बोलणारे, सतत मुलांच्या पाठीमागे लागणारे शिक्षक मुलांच्या मनावर तणाव निर्माण करतात, असे मलाच एकदा लक्षात आले. तेव्हा आपण जर शांत राहिलो.... सौम्यपणे, हळुवारपणे मुलांशी बोललो. सारखे त्यांच्या मागे न लागता त्यांचे निरीक्षण केले तर मुले जास्त फुलतात असे लक्षात आले. म्हणूनच तर रजनीश असे म्हणाले होते की फक्त स्त्रियांनाच या देशात शिक्षक होऊ द्यावे. कारण त्या सौम्यतेने मुलांशी वागतात. अर्थात ओशोंना स्त्रैणमन म्हणायचे आहे... साने गुरुजी पुरुष असूनही त्यांचे मन स्त्रैण कोमल होते... पुन्हा कृष्णमूर्ती शाळेत पूर्णकाळ मनात ही प्रेमाची भावना सतत ठेवण्याचेही सांगतात. ही इतकी साधी गोष्ट किती महान पण म्हटलं तर अतिशय कठीण आहे.... मी रोज एक संकल्प शाळेत जाताना करतो की मुलांपुढे दिवसभर चेहरा हसरा ठेवायचा... किंचितही वैतागायचं नाही... पण नाहीच जमत.. कृष्णमूर्तींना प्रेम हेच शिक्षकाचे सामर्थ्य वाटते.... त्याच्या प्रेममय व्यक्तिमत्त्वानेच मुले नकळत बदलत जातात... प्रेमाच्या परिघात शिक्षकाने आपल्या शिकविण्यावर, विषयावर प्रेम करणेही अपेक्षित
आहे. ते म्हणतात, ‘‘तुमच्या शिक्षकांचे खरंच प्रेम असेल तर तुमच्यावर काय परिणाम होईल....तुम्ही अनन्यसाधारण व्यक्ती व्हाल. तुम्हे केवळ खेळ व अभ्यासावर प्रेम कराल असे नाही तर फुलांवर, नदीवर,
पक्ष्यांवर प्रेम कराल....’’ कृष्णजींची ही प्रेमाची भाषा हेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे.