आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Introduction Of J. Krishanmurty : What Is Teaching ?

परिचय जे. कृष्‍णमूर्तींचा: शिकवणे म्हणजे काय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकणे म्हणजे काय यात जे. कृष्णमूर्तींना काय अपेक्षित आहे हे आपण मागील लेखात पाहिले. आता कृष्णमूर्ती नेमके शिकवणे कशाला म्हणतात हे पाहू. शिकवण्याच्या केंद्रस्थानी हा शिक्षक असतो, पण कृष्णमूर्ती विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या शिकण्यालाच महत्त्व देतात त्यामुळे शिक्षकाची भूमिका त्याअर्थाने मर्यादित आहे. शिक्षक हा केवळ मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे अवलोकन करणारा व त्यांना प्रेमाने समजावून घेणारा आहे. या शिकण्याच्या प्रक्रियेत ते शिक्षक-विद्यार्थी संबंधाला सर्वाधिक महत्त्व देतात. जर हे नाते प्रेममय असेल तर आणि तरच शिकणे चांगले होऊ शकेल असा त्यांचा आग्रह आहे. ते म्हणतात, ‘शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आत्मीयतेच्या भावनेतच शिक्षण अस्तित्वात येऊ शकते. परस्परांशी आपण काही भावनांची देवाण-घेवाण करतो. सहभागी होतो. केवळ शाब्दिक पातळीवर नवे तर बौद्धिक पातळीवरही परस्परांशी सहभागी होतो आणि खूपच अधिक सूक्ष्मपणाने खोलपणाने खोलवर सर्व गोष्टी अनुभवतो... त्या अवस्थेत सर्व पातळ्यांवर त्या वातावरणात त्या जवळकीच्या भावनेत शिक्षक व विद्यार्थ्याचे शिकवणे घडते...’ अत्यंत नेमकेपणाने कृष्णजी शिकणे कुठे आणि कसे घडते हे स्पष्ट करून सांगतात. यात आपली अनेक गृहीतके कोसळतात... शिक्षकाची हुशारी, त्याचा व्यासंग याला आपण जास्त महत्त्व देतो, पण कृष्णमूर्ती त्याहीपेक्षा जास्त महत्त्व संबंधांना देतात.

आज तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना शिकविण्यावर भर दिला जातो आहे, पण कृष्णमूर्ती जर संबंधांच्या नात्यात शिकणे घडत असेल असे मानत असतील तर तंत्रज्ञानाच्या अध्यापनाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या शिक्षणात ऑनलाइन शिकण्यात शिक्षक जर वजा होत असेल तर ते चालेल का याचाही या निमित्ताने विचार करण्याची गरज आहे. कारण, कृष्णमूर्तींना शिकणे ही प्रक्रिया केवळ डोक्यात माहिती कोंबणे वाटत नाही तर ते दोघांनी मिळून काही शोध घेण्याला शिक्षण म्हणत आहेत म्हणून दोघेही समान पातळीवर असणे व प्रेमाच्या धाग्याने बांधले जाणे महत्त्वाचे आहे. हा प्रेमाचा धागा ते इतका जादूचा मानतात की त्यातून मुलात आमूलाग्र परिवर्तन घडू शकते.


एक शिक्षक त्यांना विचारतो की, मला मुलाबद्दल जर केवळ ममता असेल तरीही मुलगा शिकण्यास तयार नाही. जर त्याला शिक्षणाची आवडच नाही असे असेल तर काय करायचे? कृष्णजी त्याला उत्तर देताना उलट विचारतात की, मुलाचा जर तुमच्यावर विश्वास असेल तेव्हा त्याने जो विषय शिकावा असे तुम्हाला वाटते तो शिकणार नाही असे तुम्हाला वाटते की काय? इतकी टोकाची त्यांना विद्यार्थी नातेसंबंधात बदलण्याची खात्री आहे... शिकवताना स्वत: शिक्षकाने स्वत:ची विचार करण्याची यंत्रणा तपासली पाहिजे, तरच विद्यार्थ्यांच्या ठिकाणी कोणतीही चौकसपणे विचार करायची क्षमता निर्माण होते. ही सावधानता पाळणे आवश्यक आहे. पुढे ते म्हणतात की, शिकण्यात आणि शिकविण्यात स्वभावत:च एक विनम्रता असते. तुम्ही शिक्षक असता, पण त्याचवेळी तुम्हीही शिकत असता. त्या वेळी तिथे शिक्षक विद्यार्थी असा भेदच नसतो. मी स्वत: शिकत असतो आणि स्वत:ला शिकवत असतो. आजकाल शिक्षकांमध्ये प्रयोगशीलता उपक्रमशीलता याची खूप चर्चा चालते. कोणत्या पद्धतीने शिकवावे याचीही चर्चा होते. केवळ पद्धतींची चर्चा करणे त्यांना यांत्रिक वाटते. ते म्हणतात की, पद्धतींवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक मुलाचा वैयक्तिक अभ्यास करणे जास्त महत्त्वाचे आहे.आपला संबंध हा यंत्रांशी नसून हा जिवंत मुला- मुलींशी आहे. ही मुले भीती, अनुकरण, प्रेम, राग या भावनांमध्ये गुरफटलेली आहेत. तेव्हा त्यांना त्यातून बाहेर काढायला खूप समजूतदारपणा, खूप संयम आणि प्रेमाची आवश्यकता आहे. या दीर्घकालीन उपायापेक्षा आपण एखादी पद्धती शोधून पळवाट शोधत असतो असे ते शिक्षकांना बजावतात. केवळ उपक्रमांनी मुले बदलत नाहीत तर शिक्षक विद्यार्थी नात्यानेच ते बदलतात असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.