आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Introduction Of J Krishnmurti: Excitment Of Life

ओळख जे कृष्‍णमूर्तींची: उत्कटतेने जगणे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्यात 10वी, 12वीचे निकाल लागल्यावर आपल्याकडे व्यवसाय मार्गदर्शनाची विशेषत्वाने चर्चा होते. करिअर कौन्सिलर यांना यामुळे खूप महत्त्व आले आहे. अ‍ॅप्टिट्यूड टेस्टलाही खूप महत्त्व आले आहे. व्यवसाय निवडीकडे जास्तीत जास्त पैसा मिळवण्याची सुरक्षित संधी म्हणूनच बघितले जाते. आवडीचे क्षेत्र निवडण्याचे आणखी अर्थ फारसे काढले जात नाहीत. पण कृष्णमूर्तींच्या विचारांच्या मांडणीत मला याचे वेगळेच अर्थ लागतात. आपण जे काम करतो किंवा करणार आहोत त्याचे जीवनात नेमके महत्त्व काय आहे... का इतके त्याला महत्त्व आहे. कृष्णमूर्ती उत्कटतेने जगण्याला जास्त महत्त्व देतात. आपल्या भावना, आपला जोश, तीव्र संताप अतिशय उत्कट असला पाहिजे. भावनांशी आपण खेळले पाहिजे असे ते नेहमी म्हणत.


करिअरची निवड या प्रकाशात बघायला हवी. त्या करिअरमधून मला पैसा किती मिळेल हा आमचा निवडीचा निकष असता कामा नये. मला खरोखर त्यात रुची आहे का... ते काम केल्याशिवाय मी राहूच शकणार नाही अशी माझ्या अंत:करणाची स्थिती आहे का..... हा निकष असला पाहिजे. भले मला जर चित्रकार होण्यात रुची असेल तर घरचे काय म्हणतात याचा मी विचार करणार नाही... त्यातून मला उदरनिर्वाहाचे साधन मिळेल की नाही याचा मी विचार करणार नाही तर त्याचीच निवड करीन. इतकी साधी मांडणी जगण्याची झाली पाहिजे.


अर्थात कृष्णमूर्ती केवळ व्यवसायाच्या उत्कटतेविषयी बोलत नव्हते तर आपल्या प्रत्येक भावनेविषयी बोलत होते हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक भावना ही उत्कट असायला हवी. ते म्हणतात... ‘‘तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल उत्कटता असली पाहिजे. ही उत्कटता केवळ एखाद्या दुसºया गोष्टीबद्दल असून भागणार नाही. अशी उत्कटता असेल तर क्षुद्र गोष्टींचे भरताड तुमच्या जीवनात भरून राहणार नाही. राजकारण, नोकरी, नोकरीतील बढती या गोष्टी अशाच क्षुल्लक आहेत. पण तुमच्या भावना उत्कट असतील, त्यात तुम्ही सर्व प्राण ओताल. सारा जोम जर त्यात ओतलेला असेल तर तुम्ही गहन शांतीच्या अवस्थेत राहाल... मन स्वच्छ, निर्मल होईल. माणसे वयाने मोठी झाली की ती मनाची ही भावनाशील अनुकंपा, इतरांबाबतचा कनवाळूपणा, जिव्हाळा गमावून बसतात आणि देवळात जातात किंवा दारू पितात...’’


थोडक्यात ही उत्कटता ही सर्व स्तरांवर गरजेची आहे. ही केवळ त्या व्यवसायाची गरज नसते तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची गरज असते. जर आपल्या भावना उत्कट नसतील तर आपण दुभंगलेले जीवन जगतो. आपले व्यक्तिमत्त्व विभाजित होते. त्यामुळे शारीरिक -मानसिक व्याधीही जडू शकतात. याच दुभंगलेपणातून आयुष्य बेचव होऊन कशातच आनंद मिळत नाही. आपण करत असलेल्या कोणत्याच कृतीत जेव्हा आनंद मिळत नाही तेव्हा सनसनाटीपणाची गरज वाटू लागते. इतर प्रेरणा त्या कामात मिसळल्या जातात. त्यातून व्यक्तिमत्त्वात दांभिकता निर्माण होते. आपल्यालाच आपण अनेक चेहरे घेऊन वावरतो आहोत असे जाणवायला लागते.


इतके दूरगामी परिणाम या उत्कटतेने न जगण्याचे आहेत. तेव्हा शालेय स्तरावर मुलांना त्यांच्या सर्व भावना उत्कटतेने व्यक्त करून त्या भावनांचे निरीक्षण करायला शिकवण्याची गरज आहे. याचा अर्थ लगेच विपरीत घेतला जातो. मुलांना काय मारामारी करावीशी वाटली तर ती करू द्यावी का, असे विचारले जाते. पण असे त्यात अनुस्यूत नसते. भावनांना मनाच्या स्तरावर मुक्तपणे प्रकट होऊ देणे व त्या भावनेचे पूर्णत: दर्शन घेणे अवलोकन करणे असे म्हणावयाचे असते. ही भावना चांगली व ती भावना वाईट असे शिक्षण शाळेतून कोणत्याही पातळीवर देता कामा नये. त्यातून मुले त्या भावनांचे दमन करतात व त्यातून अनेक विकृती निर्माण होतात. सेक्ससारख्या भावनांबाबत हे घडले आहे. तेव्हा भावनांना नाव न देता त्याबाबत कोणताही न्यूनगंड निर्माण न होऊ न देता कृतीचे नव्हे तर भावनेचे निखळ अवलोकन मुले करू शकतील इतके शाळेचे वातावरण सुरक्षित, मायेचे व प्रेमाचे असणे गरजेचे आहे. तरच मुले भावी जीवनात उत्कटतेने जगू शकतील.


herambrk@ rediffmail.com