आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकी संस्कृतीचा परिचय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘सामान्यांतले असामान्य’ हा सुधा मूर्तींचा कथासंग्रह. उमा कुलकर्णी यांनी या कथांचा अनुवाद केला आहे. उत्तर कर्नाटकच्या संस्कृतीशी त्या पुरेपूर परिचित असल्यामुळे या कथासंग्रहातील अर्क मराठी वाचकांपर्यंत पोचवणे त्यांना सहज शक्य झाले आहे.

उत्तर कर्नाटकाची संस्कृती आणि वेगळा असा थाट, या प्रदेशाचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य, त्या संदर्भातील काही व्यक्तींविषयी काही कथा या कथासंग्रहात आहेत. या कथांबद्दल सुधा मूर्ती सांगतात की, ‘आमच्या गावात माणसं आत एक आणि बाहेर एक असा विचारच करत नाहीत. वरवर ओबडधोबड वाटलं तरी आमचं हे उत्तर कर्नाटक मृदुपणा आणि भावनाशीलतेमध्ये परिपूर्ण आहे.’ आणि हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की सुधा मूर्ती अगदी खरं सांगत आहेत. या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या व्यक्ती वरवर बघता अत्यंत सामान्य आहेत. तरीही त्यांच्यामध्ये असामान्य गुण आहेत. या सर्व व्यक्ती मध्यम-निम्न मध्यम आर्थिक परिस्थितीतल्या असल्यामुळे उत्तर कर्नाटकातील सर्वसामान्य जीवनाचा प्रत्यय आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर येतो. पहिल्याच कथेत आपल्याला भेटतो ‘बंडल बिंदाप्पा.’ दिसायला देखणा असा हा बिंदाप्पा तरुणपणी सिनेमात नट होता असं कोणी सांगितलं, तर नाही म्हणायचं कारणच नाही!! सुधा मूर्तींच्या आजीने केलेली त्याची डेफिनेशन विचित्र आहे, ‘बिंदाप्पा म्हणजे एकाचं चार करणारा माणूस! दोनशेचं चारशे करणारा.’ बंडल बिंदाप्पा प्रत्येक गोष्ट फुगवून सांगणारा, तोंडातून नकारात्मक बोल न निघणारा. पण याच बिंदाप्पाला उत्तर कर्नाटकच्या इतिहासाविषयी खूप आदर आहे. पुढे अनसूया-तिचं नाव अनसक्का - हिची कथा आली आहे. अनसक्का म्हणजे गावातला ऑ ल इंडिया रेडिओ. या अनसक्काच्या तोंडातून कधीच कोणासाठी चांगले शब्द निघाले नाहीत. अशा या अनसक्काचा नवरा मात्र तिच्या एकदम विरुद्ध आहे. शांत स्वभावाचा, मृदू आणि अजिबात धैर्य नसलेला. मनात घर करणारी पुढची गोष्ट येते ती नलिनीची. डबेवाली नलिनीची, जिला कामाच्या व्यापामुळे घरी स्वयंपाक करायला वेळ नाही. त्यामुळे तिच्यासाठी गावातल्या कुठल्याही घरातून डबा यायचा. याच डब्यामुळे पुढे नलिनीचे लग्न कसे जमले, या गोष्टीचे वर्णन छान केले आहे. अशाच अनेक चांगल्या कथा या पुस्तकात आल्या आहेत. प्रत्येक कथा वाचताना या सर्व व्यक्ती आपल्या समोर जिवंत उभ्या राहतात. सुधा मूर्तींना या सर्व व्यक्तींसोबत जे अनुभव आले ते वाचताना मन भरून येते.

appurva.rajput@gmail.com