आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्‍ण्‍ामुर्ती एक परिचय: शिक्षकदिन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्या शिक्षकदिन... शिक्षकांविषयीच्या चर्चा देशभर होतील... शिक्षकांकडून सर्वांच्या अपेक्षा व्यक्त होतील... अशा वेळी साहजिकच शिक्षणावर इतके चिंतन करणारे जे. कृष्णमूर्तींनी शिक्षकांविषयी काय म्हटले होते याची नक्कीच सर्वांना उत्सुकता असेल... कृष्णमूर्तींइतके क्वचितच इतर कोणी तत्त्वज्ञ शिक्षकांशी आजपर्यंत बोलले असतील... कृष्णमूर्ती जेव्हा शाळांमध्ये येत तेव्हा मुलांशी आणि शिक्षकांशी आवर्जून बोलत. शिक्षक त्यांना प्रत्यक्ष अध्यापनातील शंका विचारत, मुलांच्या वर्तनातील प्रश्न विचारत... शाळेच्या चौकटीविषयी प्रश्न विचारत. कृष्णमूर्ती अतिशय मूलगामी चिंतनातून त्यांना उत्तर देत. आज परीक्षाच नसल्याने मुले अभ्यास करतील का हा सर्वत्र विचारला जाणारा प्रश्न त्यांना शिक्षकांनी अनेकदा विचारला होता...शिक्षक हेही शेवटी समाजाच्या समज- पूर्वग्रहाचेच प्रतिबिंब असल्याने त्यांनी प्रस्थापित भूमिकेतून त्यांना प्रश्न विचारले होते.


कृष्णमूर्तींच्या एकूण मांडणीत शिक्षकाच्या भूमिकेविषयी त्यांना खूप अपेक्षा आहेत. स्वत: संस्कारबद्धतेपासून मुक्त होऊन आपल्या विद्यार्थ्यांना संस्कारबद्धतेपासून मुक्त होण्यास मदत करणारा शिक्षक त्यांना अपेक्षित होता. शिक्षकावरील जबाबदारी सांगताना सुसंस्कृत व शांततामय समाजरचना निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे. शिक्षक हा या समाजातून आलेला असल्याने तोही इतरांसारखाच संस्कारबद्ध असणार आहे. पण त्याने जाणीवपूर्वक त्या संस्कारबद्धतेतून बाहेर पडून मुलांनाही संस्कारबद्धतेतून बाहेर पडायला मदत केली पाहिजे. त्यासाठी स्वत: चिकित्सक असायला हवे. स्वत:च्या वर्तनाचे निरीक्षण करायला हवे. आपण स्वत: धर्म, जात, राष्टÑ याच्या अस्मितेत कितपत अडकलेले आहोत. आपण राग, असूया, भीती या भावनांचे किती प्रमाणात गुलाम आहोत याची चिकित्सा शिक्षकाने करायला हवी. शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वातून मुलांपर्यंत भीती पाझरता कामा नये. तो निर्भय असावा. परमविश्वासाच्या प्रेममय वातावरणातच मुले स्वत:च्या भावभावनांचे निरीक्षण करू शकतील. आज ध्येयवादाने या पेशात येणा-यांची संख्या खूप कमी झाली आहे. तेव्हा तशा शिक्षकांच्या येण्याविषयी ते नाराजी व्यक्त करतात. शिक्षक कोणी बनावे हे सांगताना कृष्णजी म्हणतात की पैसा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून कोणीही या व्यवसायात येऊ नये. अशा व्यक्तीला स्थान असता कामा नये. अशी वृत्ती बाळगणे म्हणजे विद्यार्थ्यांची पिळवणूक करणे होय. पण कोणत्याही सुसंस्कृत समाजात शिक्षकाच्या उपजीविकेची जबाबदारी समाजानेच करण्याची गरज आहे.


शिक्षकाने कोणतीही ऐहिक महत्त्वाकांक्षा ठेवू नये. ती ठेवली तर समाजाला त्याला गुलाम करणे सोपे जाईल. शिक्षक असणे हीच त्याची सर्वोच्च प्रतिष्ठा असल्याने इतर महत्त्वाकांक्षा त्याने ठेवण्याची आवश्यकता नाही. खरा शिक्षक आंतरिकदृष्ट्या समृद्ध असल्याने सत्तेच्या किंवा बाह्य ऐश्वर्याच्या शोधात कधीच नसतो. शिक्षक व्यवसायाकडे सत्ता -प्रतिष्ठा मिळविण्याचे साधन जर त्याने बघितले नाही तर कोणीही त्याच्यावर अधिकार गाजविणार नाही. हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. पूर्वी राजाच्या काळात गुरूसमोर राजा उठून उभा राहत होता, पण आज आम्हा शिक्षकांची संख्या लाखात असूनही सरकारपुढे आम्ही दीन का आहोत... तुमच्या सत्त्वाचे सामर्थ्य बघून शासन आदर का देत नाही याचे कारणच नकळत कृष्णजी सांगून जातात. जर शिक्षक असा राहिला तर शासनही त्याच्यापुढे झुकेल व सुसंस्कृत समाजात अशा शिक्षकाचे स्थान फार वरचे आहे.


शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वातून तळमळीतून मुले बदलतात ही कृष्णजींची मांडणी मला सर्वाधिक भावते. शब्दांपलीकडे होणारा हा शिक्षक-विद्यार्थी संवाद मला सर्वात जास्त भावतो. एका विद्यार्थ्याने याबाबत विचारलेला प्रश्न मला जणू कविताच वाटतो... एक मुलगा त्यांना विचारतो की आम्हाला खेळण्यात जितका आनंद वाटतो तितका आनंद अभ्यासात का वाटत नाही... कृष्णजी त्याला उत्तर देतात... बाळा तुझ्या शिक्षकांना शिकवण्यात आनंद वाटत नाही म्हणून तुम्हाला शिकण्यात आनंद वाटत नाही... ते एक रूपक मांडतात. ते म्हणतात एखादी गायिका एखाद्या गावात गाण्याचा कार्यक्रम करण्यापूर्वी हजारो तास रियाज करते. गाणे तिचे श्वास झालेले असते म्हणूनच लोक तिचे गाणे नंतर अनेक दिवस गुणगुणत राहतात... बाळा असे तुझे शिक्षक जेव्हा त्यांच्या शिकवण्यावर प्रेम करतील तेव्हा शिकणे हे तुझ्यासाठी खेळण्याइतकेच आनंदाचे बनले असेल... यावर काही भाष्य करण्याची गरज आहे का...