आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Introduction Of Krishnamurti : What Does Mean Love

ओळख कृष्‍णमुर्तींची : प्रेम म्हणजे काय असतं...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुमचा चेहरा साधासुधा असो किंवा सुरेख असो, त्यावर एक विलक्षण तेज झळकते. प्रेम करणे ही जीवनातील सर्वात महान गोष्ट आहे आणि प्रेमाबद्दलच बोलणे ती भावना बाळगणे त्याला जपणे हे फारच महत्त्वाचे आहे. अन्यथा ते ओसरून जाईल. कारण, जग फार क्रूर आहे. लहानपणी जर तुम्हाला प्रेम भावना नसेल. तुम्ही लोकांकडे, प्राण्यांकडे, फुलांकडे प्रेमळपणे पाहत नसाल तर मोठे झाल्यावर जीवन पोकळ, रिकामे आहे असे तुमच्या अनुभवास येईल. तुम्हाला अतिशय एकटे एकटे वाटेल आणि भीतीच्या काळ्या छाया तुमचा सतत पाठलाग करतील, पण ज्याक्षणी तुमच्या हृदयात ही प्रीती नावाची अनन्यसाधारण भावना असेल त्या वेळी जगाचे रूपच तुमच्यापुरते पार पालटून जाईल.’’


प्रेमाची कृष्णजींची संकल्पना तरुणांना कदाचित अपेक्षाभंग करणारी वाटेल, पण त्यांच्या प्रेमाची भावना ही एखाद्या व्यक्तीत अडकणारी नाही. ती विशिष्टांसाठी व्यक्त होणारी भावना नाहीच. ती मानवाच्या वृत्तीचा भाग आहे. लहानपणापासून तो व्यक्तिमत्त्वाचा अपरिहार्य असणारा भाग ते मानतात. लहानपणापासून प्रत्येक प्राणीमात्र, झाडे, जीव यांच्याशी प्रेमाची भावना ठेवायला ते सांगतात. लहानपणापासून ते प्रेमाविषयीच चर्चा करायला सांगतात. या क्रूर जगात प्रेमाची चर्चासुद्धा त्यांना खूप महत्त्वाची वाटते. इतकी त्यांना ही भावना महत्त्वाची वाटते.


गर्दीतही माणसांना वाटणारा हा एकटेपणा हा प्रेमाच्या अभावी असतो. प्रेमाच्या अभावी माणसे एकटी होऊन त्यांना भीती वाटत राहते. थोडक्यात त्यांचे विश्लेषण हे वृत्तीच प्रेममय होण्याविषयी आहे.


या प्रेमाचा उदय मनात जिव्हाळ्याने होतो, असे ते सांगतात. लहान मुलांच्या ठायी हा जिव्हाळा वसत असतो व त्या जिव्हाळ्यातूनच वागण्याची प्रेरणा मिळत असते. लहान मुलांना कुत्र्याला थोपटावेसे वाटते, वस्तूंकडे न्याहाळावेसे वाटते आणि कोणाकडेही प्रेमाने हसता येते. कृष्णमूर्तींचे निरीक्षण हे आहे की जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी ही जिव्हाळ्याची भावना लोप पावते. जगण्यातली ही सहजता कोमेजून जाते. याचाच अर्थ आपल्यातील प्रेमभावना संपत जाऊन आपल्या भावना निबर बनतात. तेव्हा कृष्णमूर्तींना हा जिव्हाळा अंत:करणात टिकवून ठेवणे हेच महत्त्वाचे आव्हान वाटते. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘जिव्हाळा नसेल तर आयुष्य हे रिकामे व पोकळ असेल.... तुम्हाला मुले, बाळे असतील तुमचे छानपैकी घर असेल, मोटारगाडी वगैरे सारे वैभव असेल, पण हा जिव्हाळा नसेल तर जीवन हे निर्गंध फुलासारखे होते आणि त्या जिव्हाळ्यातून अपार आनंद मिळतो. ज्या जिव्हाळ्यातून प्रीती उदयाला येते, तो जिव्हाळा प्राप्त व्हावा हे शिक्षणाचे अंग असते...’’


याठिकाणी कृष्णजी नेमकेपणाने शिक्षणाच्या जबाबदारीची जाणीव करून देतात. जिव्हाळा हा जर जीवनात इतका महत्त्वाचा व निर्णायक असेल तर तो जिव्हाळा लहानपणापासून योग्य रीतीने टिकावा, यासाठी शाळांची जबाबदारी सर्वांत महत्त्वाची आहे. त्यासाठी किमान तो जिव्हाळा कोमेजणार नाही, यासाठी तरी प्रयत्न करायला हवा. बालपणीचे जे निसर्गाशी जोडलेले जे स्वप्नाळू जग आहे ते गोंजारण्याचे काम शाळांना करावे लागेल. हजारो रुपयांपेक्षाही पुस्तकात जाळी पडलेले पिंपळपान महत्त्वाचे वाटणा-या मनाची मूल्यव्यवस्था जपायला हवी. सोन्यापेक्षाही डोंगरावरच्या जमवलेल्या दगडांना संपत्ती मानणारे, तासन्तास आकाशाकडे बघणारे, कुत्रे-मांजरांना कुटुंबाचा घटक मानणारे हे बालपण शाळेत आपण कसे जपणार आहोत.... आमचा अभ्यासक्रम, शिस्त याचा जरासाही धक्का या बालमनातील भावविश्वाला लागू नये म्हणून आपण काय करणार आहोत.


शाळेतल्या अभ्यासक्रमात हा जिव्हाळा टिकविणारे उपक्रम आखायला हवेत, पण केवळ हे उपक्रमांनी होणार नाही. शिक्षक व पालकांतील जिव्हाळ्याची भावनाच संक्रमित होणार आहे. शिक्षक, पालक, मुलांशी इतरांशी कसे वागतात. शिपाई, गरिबांशी कसे वागतात, याचेही निरीक्षण मुले करत असतात. मोठ्यांच्या नजरेतून प्रेम पाझरायला हवे. सजीवच काय निर्जीव वस्तूंना स्पर्श हळूवारपणे करायला हवा. इतक्या छोट्या गोष्टीतून जिव्हाळा संक्रमित होत असतो.
प्रेमाचा जिव्हाळा या भावनांकडे कृष्णजी इतक्या सहजपणे व नैसर्गिकरीतीने बघतात. आपण त्या भावना गमावल्याने आपल्याला त्या कठीण वाटतात व आपण त्या निखा-यांवर शब्दांच्या धार्मिक तत्त्वज्ञानाची राख जमा करतो.....