आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिचय कृष्णमूर्तींचा : स्वातंत्र्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य हा शब्द शिक्षणक्षेत्रात अनेकदा वापरला जातो. शिक्षकांना स्वातंत्र्य द्या. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या वातावरणात शिकू द्या.... शिक्षण हे स्वतंत्र असले पाहिजे. अशा अनेक प्रकारे शिक्षण आणि स्वातंत्र्य यांची सांगड घातली जाते. पण स्वातंत्र्य नेमके कशाला म्हणायचे याबाबत स्पष्टता होत नाही. स्वातंत्र्य नसणे म्हणजे काय हे आपल्याला समजते पण स्वातंत्र्याची सकारात्मक व्याख्या कृष्णमूर्तींकडूनच समजावून घ्यावी लागते. स्वातंत्र्य हा शब्द आपण राजकीय स्वातंत्र्य या अर्थाने वापरतो. कृष्णमूर्ती स्वातंत्र्याची वेगळी व्याख्या करतात. स्वातंत्र्याची गरज सांगताना कृष्णमूर्ती म्हणतात, ‘तुम्ही जर मुक्त नसाल तर तुमचे व्यक्तिमत्त्व कधीही बहरणार नाही. पक्षी मुक्त नसेल तर उडू शकणार नाही. भूमीतून फुटून ढेकूळ बाजूला सारून बीजाला वर येण्याचा मोकळेपणा नसला तर ते जगूही शकणार नाही. प्रत्येक गोष्टीला मोकळेपणा पाहिजे...’ स्वातंत्र्याची गरज ते अशाप्रकारे स्पष्ट करतात. स्वातंत्र्य या संकल्पनेची ते मानसिक पातळीवर उकल करतात.


मानसिक परावलंबनापासून मुक्त होणे याला कृष्णमूर्ती स्वातंत्र्याची पूर्वअट मानतात. ते म्हणतात, ‘स्वातंत्र्य म्हणजे परावलंबनाची समस्या समजावून घेणे असते ... आपण सुखासाठी दुस-यावर अवलंबून असतो.... मनाने, भावनेने अवलंबून असतो आणि त्यापासून आपण तथाकथित सुख मिळवितो. अशाप्रकारे तुम्ही कोणावर तरी अवलंबून असलात तर तुम्ही गुलाम बनता... सर्व मानसिक परावलंबन नीट समजून घेवून आपण जोपर्यंत त्यापासून खरोखरी वेगळे होत नाही तोपर्यंत आपण खरोखरी स्वतंत्र होऊ शकत नाही कारण केवळ त्या बोधातच स्वातंत्र असू शकते... पालक आणि शिक्षक मुलांना कोणासारखे यशस्वी व्हायला सांगतात. अशावेळी मुले कधीच स्वतंत्र असू शकत नाहीत...’ आपण मुलांवर महत्त्वाकांक्षा लादल्या की मुले परावलंबी होतात हे ते लक्षात आणून देतात. मुलांना ज्यात आवड आहे त्या गोष्टी करू देणे. विशिष्ट बाबींचा आग्रह न धरणे हे मुलांच्या स्वातंत्र्याची सुरवात आहे. यशस्वी होण्याच्या आपल्या संकल्पना इतरांच्या नजरेत आपण यशस्वी ठरणे असल्याने इतरांवर अवलंबून राहणे आहे. तेव्हा अशावेळी स्वत:ची अंत:प्रेरणा बाजूला ठेवून जगावे लागते. तडजोडी कराव्या लागतात व सतत प्रसिद्ध म्हणून मिरवावे लागते त्यासाठी अनेक क्लृप्त्या कराव्या लागतात.


जो स्वतंत्र असतो तो या मानसिक परावलंबन, इतरांच्या अपेक्षा यापासून मुक्त असतो. सिकंदराला भारतीय साधू बघायचा होता. सैनिक साधूकडे गेले आणि राजाने बोलावले असे सांगितले. साधुने नकार दिला. शेवटी रागाने सिकंदर तिथे आला आणि म्हणाला, तुझे मुंडके उडवेन....तेव्हा साधूच्या नजरेत त्याला कसलीही भीती दिसली नाही... हे स्वातंत्र्य आहे. तो भीतीपासून स्वतंत्र आहे. तो राजेपणाच्या दडपणापासून स्वतंत्र आहे आणि स्वत:चा सन्मान राखणारा आहे.


माझ्या विद्यार्थ्यांना मी या स्वातंत्र्याची प्रेरणा मी कशी देऊ शकेन.... सर्वात प्रथम त्यांना काहीतरी बनण्याच्या स्वप्नापासून मी मुक्त केले पाहिजे. त्याला आदर्शाचे गुलाम करता कामा नये. त्याला जे बनायचे ते मी बनण्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यानंतर समाजाच्या चाकोरीबद्ध नैतिकता, चालीरीती यांचा आग्रह फार धरता कामा नये. त्याला शिकण्याची सक्ती भीतीने न करता त्याला त्या विषयाची आवड निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे.
या बाह्यात्कारी गोष्टी करतानाच कुठल्याही धार्मिक कुटुंबातील जातीय परंपरा, अभिनिवेशाच्या संकल्पनाचे मूल गुलाम होणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल. त्याला प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायला शिकवावे लागेल. प्रत्येक परंपरेची चिकित्सा करायला शिकवावे लागेल. म्हणजेच त्याला विचार करायला शिकवावे लागेल. जो विचार करतो तो कशाचाच गुलाम बनणार नाही.


म्हणूनच कृष्णमूर्तींनी एके ठिकाणी शिक्षणाची व्याख्या अशी केली आहे....‘‘मुक्त मनांची निर्मिती करते ते शिक्षण ...’’ यात त्यांना कोणत्याच मानसिक साच्यात न अडकणारे मन अपेक्षित आहे.
यासाठी मुलांशी सातत्याने बोलावे लागेल. मुलांना सातत्याने शंकेखोर बनवावे लागेल. कुतूहल, जिज्ञासा, संशय या सततच्या बाबीच त्याला स्वातंत्र्याकडे घेऊन जातील....


herambrk@ rediffmail.com