आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळख पोलिस उपनिरीक्षक पदाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस उपनिरीक्षकांच्या कामाविषयी जरी समाजात आकर्षण असले तरी या परीक्षेच्या तांत्रिकतेविषयी मात्र विद्यार्थ्यांना खूप कमी माहिती आहे. या लेखातून पोलिस उपनिरीक्षक पदाविषयी लागणारे सर्व तांत्रिक तपशील काय आहेत. ते आपण पाहणार आहोत.


राज्य शासनाच्या मागणीनुसार गट ‘ब’ संवर्गातील (अराजपत्रित) पदे या परीक्षेतून भरली जातात. राज्य शासनाच्या पोलिस दलाच्या महाराष्‍ट्रातील कोणत्याही कार्यालयात या अधिका-यांची नियुक्ती केली जाते. 9,300 ते 34,800 रुपये इतके वेतन या अधिका-यास असून 4300 रुपयांचा महागाई भत्ताही दिला जातो. ज्येष्ठता पात्रतेनुसार या अधिका-याला उच्च पदावर काम करण्याची बढतीची संधी उपलब्ध करून दिली जाते.
परीक्षेचे टप्पे : ही परीक्षा एकूण चार टप्प्यात घेतली जाते. (1) पूर्व परीक्षा - 300 गुण, (2) मुख्य परीक्षा - 400 गुण, (3) शारीरिक चाचणी - 200 गुण, (4) मुलाखत - 75 गुण. यातील पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी घेतली जाते. आयोगाने घोषित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते. मात्र पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत. तसेच पूर्वपरीक्षेचे गुणही उमेदवारांना कळविले जात नाहीत. हाच नियम मुख्य परीक्षेसाठीदेखील लागू पडतो. मुख्य परीक्षेकरिता आयोगाने ठरविलेले किमान किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतात. शारीरिक चाचणीमध्ये किमान 100 गुण मिळणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात. जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतात. त्यांनी मुलाखतीच्या वेळेस सर्व मूळ कागदपत्रे बरोबर ठेवणे गरजेचे असते.
पात्रता : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा महाराष्टÑ शासनाने मान्यता दिलेली समान पदवी त्या उमेदवाराने मिळविलेली असावी. उमेदवारास मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान असावे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेला उमेदवार पूर्वपरीक्षेस पात्र ठरतो. मात्र मुख्य परीक्षेस बसण्याकरिता त्याने पदवी मिळवलेली असावी.
शारीरिक पात्रता : पुरुष उमेदवाराकरिता 165 सें.मी. कमीत कमी उंची असावी. छाती न फुगविता 79 सें.मी. असावी व फुगवण्याची क्षमता ही 5 सें.मी. असावी. महिला उमेदवारांची उंची मात्र 157 सें.मी. असावी. या परीक्षेचा अंतिम निकाल घोषित होण्यापूर्वी शासनामार्फत उमेदवाराची शारीरिक तपासणी करण्यात येते. या तपासणीस उमेदवार पात्र नसल्यास त्यास अपात्र ठरविले जाते. या परीक्षेस खुल्या गटातील उमेदवारास पूर्व परीक्षेसाठी 260 रुपये तर मुख्य परीक्षेसाठी 310 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारास पूर्व परीक्षेकरिता 135 व मुख्य परीक्षेकरिता 160 रुपये फी आकारली जाते. क्रिमीलेअर गटातील उमेदवार हे खुल्या गटात पकडले जातात. देशसेवेला योगदान देणा-या प्रमुख सेवेमधील एक सेवा असणा-या या पोलिस सेवेतील उपनिरीक्षकपदाचा अभ्यास नेमका कसा करावा याचा तपशील पुढील लेखात देण्यात येईल.
क्रमश: