आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्मुखतेचे आनंदवन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही एका परिचितांकडे गेलो होतो. त्यांचा छोटा नातू दिवाणखान्यातच टीव्हीसमोर बसला होता. आम्ही टीव्हीच्या आवाजातच गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याने समाधान होईना त्यामुळे आजोबांनी त्याला टीव्ही बंद करून खेळायला जायला सांगितलं. पण नातवानं काही ऐकलं नाही. त्यानंतर समजून घालण्याची पाळी आजीची होती. शेवटी दोघांनी मिळून त्याला काहीतरी लालूच दाखवली. तरीही टीव्ही बंद करायला तो तयार नव्हता. बाहेर येऊन त्याच्या मम्मीनं त्याची आर्जवं केली, पण तो ऐकेना. शेवटी आजोबांनी थोडं रागाने त्याला दटावलं. यावर त्यानं रडण्याचं शस्त्र उपसलं. मम्मीनं यातून मार्ग काढला. ती सास-यांना म्हणाली, ‘दादाजी, त्यानं एकदा आकांत मांडला की मला स्वयंपाकही करू देणार नाही. त्यापेक्षा त्याला इथे बसून टीव्ही पाहू द्या.’ आणि मग मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत, कुरवाळत त्याला म्हणाली, ‘बेटा, तू बस टीव्ही पाहत, पण आवाज थोडा कमी कर ना.’ अशा रीतीने तोडगा निघाला. नातवाने उदारपणे टीव्हीचा आवाज कमी केला आणि आमचं बोलणं जणू काही झालंच नाही अशा पद्धतीनं पुढे तासभर चाललं.


हे दृश्य काही नवीन नाही. घरोघरी कमीअधिक प्रमाणात असंच चालतं, आजीआजोबांना पाहुण्यांच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीतही टीव्हीचा एकसुरी आवाज नको असतो. मम्मीला तिचं काम उरकण्यासाठी मूल किंवा मुलं एका जागी शांतपणे बसायला हवी असतात. यासाठी दुसरा कुठला पर्याय उपलब्ध नाही.


या प्रसंगानं साठसत्तर वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवली. घरात रेडिओ असणं ही मोठी गोष्ट होती त्या काळात. माझ्या वडिलांनी दीडशे रुपयांचा महागडा रेडिओ खरेदी केला होता. तो ठेवण्यासाठी भिंतीवर एक फळी ठोकण्यात आली होती. ती फळी आम्हा मुलांचे हात पोचणार नाहीत इतक्या उंचीवर बसवण्यात आली होती. वडिलांच्या हजेरीतच रेडिओ लागायचा आणि त्यांना जे कार्यक्रम ऐकायचे असत किंवा आम्हाला ऐकवायचे असत तेच स्टेशन लावले जाई. आम्ही रेडिओ लावायचा नाही अशी वडिलांची सक्त ताकीद होती. कारण? कारण आम्हाला त्यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही तो बिघडवून टाकू!


आता घरात कॉम्प्युटरचा प्रवेश झाला आहे. नातवंडं एखाद्या खेळण्याप्रमाणे तो चालवत असतात, त्यांनीच मला कॉम्प्युटरच्या अनोख्या जगाची ओळख करून दिली. पण त्या जगाशी माझी मैत्री होऊ शकली नाही. नातवंडांनी शिकवलेल्या धड्याप्रमाणे कॉम्प्युटर चालवयाचा प्रयत्न करावा, प्रत्येक वेळी काही मिनिटांतच तो बंद पडावा आणि मी एखाद्या नातवंडाला बोलावावं, हे असं काही दिवस चालल्यावर त्या पोट्ट्यांनी मला सांगून टाकलं, ‘आजोबा, तुमचं कॉम्प्युटरवर काही काम असलं तर आम्हाला सांगा, आम्ही करून देऊ. तुम्ही चालवायला जाऊ नका, तुमच्या हातून तो बिघडतो.’


माझी खात्री आहे की, ब-याच ज्येष्ठ नागरिकांना कमीअधिक प्रमाणात अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. आज जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बाल्यावस्थेत आणि किशोरावस्थेत त्यांना वळण लावायचं काम आईवडिलांपेक्षा आजीआजोबांकडे असायचं. ती त्यांची जबाबदारी असायची. संयुक्त कुटुंब ही जगरहाटी होती आणि अशा मोठ्या परिवारात आजीआजोबा केंद्रस्थानी असत. आता समाजरचना पूर्णपणे बदलली आहे. संयुक्त कुटुंब ही संस्था नामशेष होत चालली आहे. काही कुटुंबात आजीआजोबा राहत असतात, पण त्याला संयुक्त कुटुंब म्हणता येणार नाही. अशा कुटुंबांतून आजीआजोबा केंद्रस्थानातून बाजूला झाले आहेत. त्यांची जागा परिघावर आहे, आता नातवंडासमोर आदर्श म्हणून आईवडील आहेत. हा बदल अनेक कारणांनी झाला आहे. हे दबाव मान्य करण्यावाचून पर्याय नाही. आता नातवंडांना तुम्ही हलक्या आवाजात सल्ला देऊ शकता, पण त्यांना सुधारण्याचे तुमचे प्रयत्न क्वचितच यशस्वी होतील. तुमच्या अशा प्रयत्नांना मुला-सुनेचा पाठिंबा असेल तर कदाचित नातवंडं मान्य करतील. नाहीतर तुम्ही गप्प बसायला हवं. अन्यथा मुलगा आणि सुनेशीही वाद होईल आणि अनुभवाअभावी मुलगा आणि सून जे सत्य जाणत नाहीत ते या वयात तुम्हाला कळलेलं असायला हवं. वादविवादाच्या आखाड्यात विजय कोणत्याच पक्षाचा होत नाही. दोघांचीही हार होते.


दुस-याला सुधारण्याच्या भावनेचा थोडा व्यापक विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्याला बिघाड किंवा सुधार समजता तो तुमच्या अनुभव आणि समज यांच्या सीमेवर थांबतो. अर्थात काही मूल्ये शाश्वत असतात आणि त्याबाबतीत बिघाड हा बिघाडच आणि सुधारणा ही सुधारणाच असते. पण आजच्या क्रांतिकारक म्हणता येईल अशा बदलांच्या लाटांवर आरूढ झालेल्या समाजात आपल्या काही धारणा पूर्वग्रहदूषित असतात. कोणत्या शाश्वत आणि कोणत्या शाश्वततेचा बुरखा धारण केलेल्या पूर्वग्रहदूषित आहेत हे आपणच ठरवलं तर त्यात चूक होण्याची शक्यता असते. हे कळलं तर मानसिक समाधान प्राप्त होतं. इतरांना सुधारण्याचा उत्साह मर्यादित ठेवावा. परिवारात काही अनुचित घडत आहे असं वाटत असेल त्या वेळी आपली स्पष्ट मतं व्यक्त करणं चूक नाही. असं मत व्यक्त करायलाच हवं. मात्र ते सगळ्यांना मान्य झालंच पाहिजे असा आग्रह धरणं चूक. हे जग आणि माणसाचं मन या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांना बाह्य उपचार सुधारू शकत नाहीत. माणूस आपल्या अनुभवानेच शिकतो, थोरांचे बोल, ग्रंथ इ. कुचकामी असतात.
अनुवाद - प्रतिभा काटीकर, सोलापूर