आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणची टाइल- कला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्वाधिक उपद्रवमूल्य राखून असलेला तसेच बलाढ्य अमेरिकेला जाहीर आव्हान देणारा इराण हा देश वेगवेगळ्या प्रकारची खनिजे व उपरत्नांमुळे अतिशय समृद्ध आहे. कधीकाळी इराणी चिनी मातीची भांडी आशियात प्रसिद्ध होती. झिलई लावलेल्या या इराणी भांड्याची कला मध्ययुगापासून सर्वत्र प्रसिद्धीस पावलेली आहे. इमारतींना रंगीत टाइल्स लावून त्या सुशोभित करायची पद्धत इराणने फारच छान विकसित केली.


केओलिन व भांड्यांना लागणारी पांढरी माती इराणमध्ये मुबलक मिळते. मध्ययुगापासून ते 1905 पर्यंत चुना व इतर मिश्रणाचा वापर करून इराणी कारागीर उत्तम दर्जाच्या साध्या व रंगीत विटा बनवत असत. इराणच्या सफवी राजवटीत या कलेला उत्तेजन मिळाले, असे मानले जाते. अनेक धार्मिक इमारतींना सुशोभित करण्यासाठी या टाइल्सचा वापर त्या काळी होत असे. सप्तरंगातील टाइल्स या त्या काळात घडवल्या जाऊ लागल्या. कलाकारांनी अनेक तंत्रे वापरून आपली वेगवेगळी रूपके या टाइल्सवर वापरली. या टाइल्सवरील रूपके नैसर्गिक रंगाने रंगवली जात. नंतर या टाइल्स भट्टीत नीट भाजत व त्यावर पुन्हा पारदर्शक झिलई लावली जात असे. इमारतीचा आराखडा पाहून या टाइल्सचे डिझाइन ठरवले जाई. या टाइल्स तुकड्यातुकड्यांनी इमारतींना लावत. या सर्व पॅनलमधून एक अखंड चित्र तयार होत असे. या टाइल्सकरिता फिरोजा, लेपिस, जॅस्पर यांसारख्या उपरत्नाचे रंग वापरल्यामुळे या टाइल्सचे सौंदर्य अबाधित राहत असे.


त्या काळात मुख्यत्वे फुलाचे डिझाइन, संपूर्ण निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अरेबिक भाषेत वचने लिहिलेल्या टाइल्स व संपूर्ण हिरव्या व निळ्या अशा रंगाच्या इराणी टाइल्स प्रसिद्ध होत्या. काजार घराण्याच्या राजवटीत याच प्रकारच्या रंगीत टाइल्स प्रामुख्याने बांधकामात वापरल्या जात. सातव्या शतकामध्ये इराणमध्ये केरमान, मशहद व शिराज ही टाइल्सचे उत्पादन करणारी इराणमधील प्रमुख केंद्रे बनली. 13व्या शतकात इराणात रंगीत विटा व टाइल्सचा वापर करून सजवलेल्या इमारती आजही अस्तित्वात आहेत. 14व्या शतकात निशापूर येथे टाइल्स व भांडी यावर कवितांच्या ओळी उद्धृत केल्या जात. फिरदोसी, मौलाना रुमी अफजली काशानी यांच्या कविता मध्ययुगात टाइल्सवर झळकत. इराणी लोकांनी चिनी कलेच्या भांड्यांपासून नंतरच्या काळात प्रेरणा घेऊन आपल्या टाइल्सचे तंत्र अधिकाधिक विकसित केले. ज्याप्रमाणे वास्तू सुशोभित करण्यासाठी विविध प्रकारच्या टाइल्स इमारतींना बाहेरून लावत, त्याचप्रमाणे वास्तूच्या आतमध्ये अंतरंग सजावटीसाठीही या टाइल्स वापरल्या जात. भारतात इराणमधून आलेल्या बहामनी घराण्याने गुलबर्ग व बिदर येथे राज्य केले. बहामनी काळात बांधलेल्या अनेक वास्तूंना या प्रकारच्या झिलई लावलेल्या रंगीत टाइल्स वापरल्या आहेत. या इमारतीमध्ये मेहमूद गावानची मदरसा वास्तुशास्त्राचा व टाइल्स कामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. सिंध व पंजाब प्रांत हे इराणला जवळ असल्याने मध्ययुगात येथेही टाइल्सने सुशोभित केलेल्या अनेक वास्तूंची निर्मिती झाली. आजही या कलेचे नमुने तेथे आपल्याला पाहायला मिळतात.

पाकिस्तानात उचह शरीफ येथील मध्ययुगीन टाइल्सच्या चोरीचे प्रकरण फार गाजले होते. एका पुरातन इमारतीवरून या टाइल्स काढून त्या काळी परदेशात पाठवण्यात आल्या होत्या. मुघल काळातही इराणी टाइल्सचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या इमारती सुशोभित करून घेण्यासाठी केला होता. तैमुरलंगच्या काळातील निळ्या व हिरव्या रंगाची झिलई लावलेल्या टाइल्सच्या समकंद येथील सुंदर इमारती व बांधकामे आजही रसिकांचे व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात.


मध्ययुगीन वास्तुशास्त्राच्या अभ्यासकास वास्तुशास्त्राबरोबर टाइल्सच्या कलेचा इतिहास अभ्यासणे अनिवार्य असते. ‘सदबी’ व ‘क्रिस्तीज’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित लिलाव कंपन्यांनी केलेल्या लिलावात या मध्ययुगीन टाइल्सचे नमुने भरमसाट किमतीला विकले जातात. विसाव्या शतकात इराणमध्ये प्रामुख्याने इमारतीच्या आतील भागाचे सुशोभीकरण करण्यासाठी चित्रांच्या टाइल्सचा उपयोग होऊ लागला. हळूहळू या टाइल्सच्या निर्मितीत आधुनिक तंत्र वापरून बदल झाले. सुरुवातीला टाइल्सवर हाताने चित्र रंगवण्याची पद्धत काळाच्या पडद्याआड जाऊन रंगीत चित्रे टाइलवर छापून मग त्या टाइल्स आधुनिक भट्टीत प्रोसेस केल्या जाऊ लागल्या. पारदर्शक झिलई लावली जाऊ लागली. इस्फहान येथील मरजन टाइल्स कंपनी ही या क्षेत्रात सुप्रसिद्ध आहे. घराच्या आत लावायच्या रंगीत टाइल्सचे उत्पादन व विक्री ही कंपनी करते. युरोपच्या बाजारपेठेकरिता ही कंपनी एक सचित्र कॅटलॉग प्रसिद्ध करत असे. या कंपनीच्या एका कॅटलॉगचे निरीक्षण केल्यास, साधारणपणे खालील प्रकारच्या टाइल्स समाविष्ट केल्या आहेत. कंपनीच्या अनेक टाइल्सवर इराणचा सुप्रसिद्ध चित्रकार फरश चिआन याने काढलेले हाफिझचे काव्य, उमर खय्यामच्या रुबाया, इतर इराणी कल्पनांवर आधारित चित्रे मुद्रित केली आहेत. या टाइल्स साधारण 4-8-12-16 अशा संचात असतात. टाइल्सचे सर्व तुकडे भिंतीवर लावले म्हणजे एक सुंदर चित्र तयार होते. अशा चित्रामुळे सर्व दिवाणखान्याचा नूरच बदलून जातो. याव्यतिरिक्त धार्मिक वचने असणा-या, पारसी धर्मीय किंवा झरतृष्टी विषयावरील टाइल्स तसेच निसर्गचित्राच्या व फुलपत्तीचे काम असणा-या अनेक टाइल्स उपलब्ध आहेत.


इस्फहानमध्ये मुहंमद मासुमजादे व हुसेन काशीतराश यांचा टाइल्स निर्मितीचा खानदानी व्यवसाय आहे. टाइल कापणारे म्हणून हुसेन यांचे आडनाव काशीतराश असे पडले आहे. अनेक जण इस्फहानला येऊन त्यांच्याकडून टाइल्स नेत असत. इराणी टाइल्सवर येणा-या प-या, सुंदर स्त्रिया व विविध चित्रे- विषयांमुळे या टाइल्स अतिशय सुंदर अशा कलेचा आविष्कार म्हणून जगप्रसिद्ध होत्या. परंतु तेथील सरकारने या टाइल्सवर स्त्रियांची चित्रे छापण्यास पूर्णपणे मनाई केल्याने मागणीप्रमाणे उत्पादन केल्या जाणा-या टाइल्सची निर्मिती आता थांबली व भविष्यात याची निर्मिती केव्हा चालू होईल, याची शाश्वती नाही. अशीच बंदी चालू राहिली, तर इराणी टाइल्सच्या कलेचा हा अध्याय काळाच्या पडद्याआड जाईल.