आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिच का समता?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कूलर्स भाड्याने मिळतील’पासून ‘दारू सोडवा’पर्यंत आणि ‘बोअरिंग मशीन’पासून ‘काशी के पंडित’पर्यंत काय वाट्टेल त्या विषयावरील छोट्या जाहिरातींकडे आजपर्यंत कधी माझं लक्ष गेलंच नव्हतं. एक महत्त्वाची बातमी वाचत असताना अवधानाने डावीकडे नजर वळताच ‘विवाहविषयक’ या मथळ्याखाली महाराष्‍ट्रातील एका जुन्या व सुप्रसिद्ध संस्थेच्या दोन जाहिराती वाचून मी स्तब्ध झालो. एका जाहिरातीचं म्हणणं होतं, ‘परीकथेतील राजकुमार स्वप्नातून सत्यात उतरावा ही मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू होतात तेव्हा तुम्हाला आमची अमुक अमुक योजना मदत करेल.’ तर दुसरी जाहिरात सांगत होती, ‘पतीच्या कर्तृत्वास सर्वतोपरी साथ देईन, संसारासाठीही हातभार लावेन, अशा विचारांच्या तुमच्या कन्येसाठी आमच्या अमुक अमुक योजनेचा लाभ घ्या.’


परीकथेतील राजकुमार काय किंवा कर्तृत्ववान पती काय, दोघंही पुरुषच. पुरोगामीपणाचा टेंभा मिरविणा-या महाराष्‍ट्रातील नामवंत संस्थेने विवाह जुळविण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत स्त्रीच्या अस्तित्वाची साधी दखलही घेऊ नये हे बघून मी अवाक् झालो. आदर्श पुरुष आपला पती व्हावा, अशी स्वप्नं बघण्याची गरज फक्त स्त्रीलाच असते का? परीकथेतील परी आपली जीवनसाथी व्हावी, असं पुरुषांना वाटत नसतं का? आणि वाटल्यास त्याने विवाह मंडळांचे उंबरठे झिजवायचे नसतात का? पतीच्या कर्तृत्वास जर पत्नीच्या साथीची नितांत गरज असते तर पत्नीच्या कर्तृत्वास पतीने सर्वतोपरी साथ द्यायची नसते का? ‘जाहिरात छोटी-आशय मोठा’ हे खरं ठरविणा-या व शब्दांची मर्यादा न ओलांडणा-या त्या जाहिरातींमुळे मला अनेक प्रश्नांनी छळण्यास सुरुवात केली आणि माझं ‘मन वढाय वढाय’ भूतकाळाचा फेरफटका मारायला निघालं.
माझ्या एका मित्राला तो लग्न करण्याच्या वयाचा झाला आहे असा साक्षात्कार झाल्यामुळे त्याला ‘मुलगी बघणे’ नावाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची इच्छा झाली. उपवधू मुलाचा मित्र असल्यामुळे मी त्या कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्याने मला गळ घातली. माझ्या डोळ्यांसमोर नकळत जनावरांच्या बाजारातील दृश्य तरळू लागले. जनावरांच्या आठवडी बाजारात वेगवेगळी जनावरं बघून पसंतीस उतरलेल्या जनावराचा सौदा केला जातो.

त्यात त्या जनावराच्या इच्छे-अनिच्छेचा काहीही संबंध नसतो. मुलीला बघायला जाणे, मुलाने तिला काही अत्यंत भंकस व ख-या आयुष्याशी सुतराम संबंध नसलेले प्रश्न विचारणे, मुलीने शक्य तितक्या खाली मान घालत व आपल्या शालीनतेचा परिचय देत त्या प्रश्नांच्या लायकीचीच उत्तरे देणे आणि हे सर्व साग्रसंगीत पार पडल्यानंतर मुलाला मुलगी पसंत पडल्यास त्याने खूप मोठे उपकार केल्याच्या थाटात होकार कळवणे यात व जनावरांच्या बाजारात माझ्या दृष्टीने काडीचाही फरक नसल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण मित्रकर्तव्य आड आल्यामुळे कार्यक्रमात सहभागी होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मुलगी बघणे नामे कार्यक्रमास प्रारंभ झाला. बटाटे-पोहे, चहा, प्रश्नं, उत्तरं, सुशिक्षित मुलीच्या जन्मदात्यांचे विनाकारण लाचार झालेले चेहरे, मित्राने स्वत:चा स्मार्टनेस सिद्ध करण्यासाठी केलेले काही पांचट विनोद इ. साग्रसंगीत पार पडल्यानंतर त्या महान कार्यक्रमाची सांगता झाली.

‘लवकरच कळवतो’ असं म्हणून मुलीकडच्यांना अनिश्चित काळासाठी आशेच्या हिंदोळ्यांवर लटकवून त्या परीकथेतील राजकुमाराने सर्वांचा सुहास्यवदनाने निरोप घेतला. त्यानंतर आयुष्यात कधीही मुलगी बघण्याच्या रानटी कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मी निश्चय केला. स्वत:ची लायकी न ओळखलेल्या मित्राने मुलगी नापसंत केली व फोनचा सुळसुळाट न झालेल्या त्या काळात मुलीच्या घरी जाऊन ‘योग नाहीत’ हा निरोप पोहोचवण्याची अत्यंत अवघड कामगिरी मित्र या नात्याने माझ्यावर सोपवण्यात आली.


आज वर्तमानपत्रातल्या विवाहविषयक जाहिराती वाचल्यानंतर माझ्याभोवती त्या मुलीच्या मातापित्याचे विलक्षण खिन्न झालेले चेहरे फेर धरून नाचू लागले. नकार ऐकल्यानंतर त्या मुलीच्या तोंडातून बाहेर पडलेला हुंदका अनेक वर्षांनतर पुन्हा कानांच्या पडद्यांना छळू लागला. ‘शेकडो मुलींना मी नकार दिला,’ असं अत्यंत अभिमानाने सांगत गल्लोगल्ली फिरणारे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिनिधी परीकथेतील राजकुमारांच्या रूपात अस्तित्वात असताना मान वर करून समतेच्या गप्पा मारण्याचा आम्हाला खरंच अधिकार आहे?


shrikantpohankar@gmail.com