आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळी शाई खरेच काळी असते काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजून तुम्ही शाईचे पेन वापरत असाल तर काळी शाई खरेच काळ्या रंगापासून बनवलेली आहे काय हे शोधून काढण्यासाठी एक सोपा प्रयोग करून पहायचा आहे. या प्रयोगातून तुम्हाला रंग कसे वेगळे करायचे हेसुद्धा समजेल. रंगीत गोळ्यांमधील रंग एकच आहे की निरनिराळे रंग मिसळून गोळीवरील रंग बनला आहे हेसुद्धा याच प्रयोगातून समजेल.


साहित्य - पाच काळ्या शाईची फाउंटन पेन्स. बॉल पॉइंट पेन नको. कारण बॉलपॉइंट पेनची शाई पाण्यामध्ये विरघळत नाही. जाड पेपर नॅपकिन किंवा टिश्यू पेपर, कातरी, पाणी, उंच काचेचा पारदर्शक ग्लास. काळी पेनची शाई उपलब्ध न झाल्यास बडीशेपेच्या रंगीत गोळ्या. हा प्रयोग रंग कसे तयार झाले आहेत हे शोधण्यासाठी आहे.
सर्वात आधी पेपर नॅपकिनचे अडीच सेमी रुंदीचे तुकडे कापून घ्या. लांबी सुमारे 15 सेमी असावी. एका कडेपासून सुमारे 2 सेमी अंतरावर शिसपेन्सिलची एक रेघ आखून घ्या. ज्याचे रंग तुम्हाला वेगळे करून पहायचे आहेत त्याचे पाण्यातील मिश्रण या रेघेवर आपल्याला ठेवायचे आहे. काळी शाई भरलेले पेन तुमच्याकडे असल्यास शिसपेंसिलीच्या रेघेवर पेनचे नीब टेकवा. शाई कागदावर ओढली जाईल. फार मोठा शाईचा ठिपका येणार नाही याची काळजी घ्या. शाईचा ठिपका आपण पंचिंग मशीनने कागदाला छिद्र पाडतो त्याहून मोठे व्हायला नको. ओढली गेलेली शाई कोरडी होईपर्यंत थांबा. आण्खी एकदा पेनचे नीब कोरड्या ठिपक्यावर टेकवा. बडीशेपेच्या वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या पाण्यात विरघळवा. प्रत्येक रंगाच्या गोळीचे द्रावण वेगवेगळे ठेवा. घरातील लाकडी टूथपिक रंगीत गोळीच्या पाण्यात बुडवा आणि शाईच्या ठिपक्याशेजारी सुमारे 3 सेमी अंतरावर रंगीत गोळीच्या पाण्याचे ठिपके नॅपकिनवर उमटूद्या. एकाच नॅपकिनवर तुम्हाला दोन्ही प्रयोग करता येतील. ठिपके कोरडे झाल्याशिवाय त्यावर दुसरा ठिपका द्यायचा नाही याची काळजी घ्या. प्रत्येक रंगासाठी वेगेळी टूथपिक वापरा नाहीतर रंगांचे मिश्रण तयार होईल.
पेपर नॅपकिनवरील ठिपके कोरडे झाले म्हणजे उंच ग्लासमध्ये 1-5 सेमी पाणी घाला. ग्लासच्या कडेस पाणी लागायला नको. पाणी थेट तळाशी गेले पाहिजे. ज्या नॅपकिनच्या कडेस आपण रंग वेगळे करण्यासाठी ठिपके दिले आहेत त्याच्या विरुद्ध बाजूस छिद्र पाडून त्यात एक दोरा ओवा. आता ठिपके दिलेली बाजू ग्लासच्या तळाकडे पण पाण्यात बुडेल अशी ठेवा. रंगीत ठिपका पाण्याच्या पातळीच्या वर रहायला हवा. विरुद्ध बाजूचा दोरा ग्लासच्या काठावरून बाहेर घ्या. ग्लासवर झाकण लावा.


थोड्या वेळात नॅपकिन खालून ओला व्हायला लागेल. पाणी जसे वर चढेल तसे रंग वेगळे होत आहेत हे तुम्हाला दिसेल. सु 10-12 सेमी कागद ओला झाला म्हणजे तो बाहेर काढा. कागद उन्हामध्ये किंवा सावलीत कोरडा करा. काळ्या शाईच्या ठिपक्यामध्ये दोन किंवा तीन वेगेवेगळे रंग आहेत हे तुम्हाला दिसेल , तसेच बडीशेपेच्या गोळीवरील रंग त्यातल्यात्यात हिरवा, जांभळा, पारवा किती रंगांनी बनले आहेत ते तुम्हाला कळेल. या प्रयोगाचे नाव वर्णलेखन (क्रोमॅटोग्राफी) रंग वेगळे करण्यासाठी आपण कागद वापरला आहे म्हणून याला पेपर क्रोमॅटोग्राफी असे म्हणतात. हिरव्या पानातील क्लोरोफिल किती रंगानी बनले आहे हे शोधून काढा आणि मला कळवा. फक्त पाने खलबत्त्यामध्ये बारीक करून त्यामध्ये पाणी घाला. द्रावण फिल्टर कागदातून गाळून घ्या आणि त्या द्रावणाचे ठिपके कागदावर द्या म्हणजे झाले.